जगदीश देवरे, नाशिक
नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर बीसीसीआय तर्फे सुरू असलेल्या प्रथम श्रेणी रणजी सामन्यात आजचा दुसरा दिवस गाजवला तो महाराष्ट्राने आणि या संघाचा कर्णधार असलेल्या ऋतुराज गायकवाड याने.
सामना सुरू होण्याआधी कागदावर बडोदा संघाचे पारडे जड असल्याचे दिसून येत होते. चर्चा देखील तशीच होती परंतु सामन्याचा पहिला दिवस गाजवला तो महाराष्ट्राच्या फलंदाजांनी आणि दुसरा दिवस गाजवला तो महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी. परिणामी या सामन्यात आता दिवस अखेर अद्यापही ८ फलंदाज खेळायचे शिल्लक असताना महाराष्ट्राने बडोद्यावर २७५ धावांची मजबूत आघाडी घेतली असून सामन्यावरची पकड आणखी घट्ट केली आहे.
कालच्या ६ बाद २५८ या धावसंख्येवरून महाराष्ट्राने खेळायला सुरुवात केली आणि अवघ्या ३९ धावांची भर घालून महाराष्ट्राचा संपूर्ण संघ तंबूत परतला. शिवलिंग शर्मा, शाश्वत रावत, राज लिंबानी, विष्णू सोळंकी आणि त्यांच्या जोडीला कुणाल पांड्या ही फलंदाजीतली मजबूत फळी बडोद्याकडे असल्यामुळे महाराष्ट्राची सर्वबाद २९७ ही धावसंख्या तितकीशी माफक असल्याचे प्रथमदर्शनी वाटत नव्हते. परंतु या धावसंख्येला प्रत्युत्तर देण्यासाठी बडोद्याचा संघ मैदानात उतरला आणि मग ही धावसंख्या बडोद्याला एखाद्या मोठ्या डोंगरासारखी वाटायला लागली. कारण देखील तसेच घडले. डावाच्या सहाव्या षटकातच शिवलिंग शर्माचा पहिला बळी महाराष्ट्राला मिळाल्यानंतर ठराविक अंतराने बडोद्याचा एक एक फलंदाज पॅव्हेलियन कडे परतू लागला आणि जेमतेम ३४ षटके देखील पूर्ण होत नाहीत तोवर अवघ्या १४५ धावांवर बडोद्याचा संपूर्ण डाव आटोपला. बडोद्याच्या फलंदाजीत अपवाद होता तो फक्त मितेश पटेलचा.
महाराष्ट्राच्या पहिल्या डावात यष्टीरक्षक सिद्धार्थ नवले याने सर्वाधिक ८३ धावा काढून संघाला मोठे योगदान दिले होते. त्याचाच कित्ता गिरवून बडोद्याचा यष्टीरक्षक मितेश पटेल याने एकाकी झुंज देत ६६ चेंडूत ६१ धावांची कामगिरी केल्याने बडोद्याला निदान शंभरी तरी पार करता आली. मुकेश चौधरी आणि रजनीश गुरबानी या डाव्या आणि उजव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या जोडीने बडोद्याच्या फलंदाजांना खेळपट्टीवर उभेच राहू दिले नाही. अष्टपैलू रामकृष्ण घोष यांने देखील आपल्या ८ षटकात अवघ्या ३४ धावा देऊन सलामीवीर जोत्स्नील सिंग आणि कर्णधार कुणाल पांड्या या दोघांचे महत्त्वपूर्ण बळी घेतले. महाराष्ट्राच्या गोलंदाजीचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य असे होते आपल्या ३३ षटकात महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी एकही नोबॉल किंवा एकही वाईड बाॕल टाकला नाही. गोलंदाजांच्या या यशामुळेच महाराष्ट्राला पहिल्या डावात १५२ धावांची मजबूत आघाडी मिळाली.
अशाप्रकारे या सामन्यातील संपूर्ण दबाव बडोद्याच्या डोक्यावर जाऊन बसल्यानंतर महाराष्ट्राच्या फलंदाजांनी आणि खास करून कर्णधार ऋतुराज गायकवाड याने दुसऱ्या डावात झंजावाती खेळ केला. आता दिवसअखेर खेळ थांबला त्यावेळेला २७५ धावांची मजबूत आघाडी महाराष्ट्राच्या खात्यात जमा झालेली आहे.
पहिल्या डावात ऋतुराज गायकवाडला चांगली कामगिरी करता आली नव्हती. परंतु दुसऱ्या डावात मात्र ऋतुराज झंजावाती फलंदाजी करून ही त्रुटी भरून काढली. डीप स्क्वेअर आणि डीप मिड विकेट यादरम्यान त्याने दोन उत्तुंग षटकार खेचून नाशिककर प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. हे २ षटकार आणि ९ चौकार यावर खास असा ऋतुराज गायकवाड नावाचा शिक्का मारलेला होता. ऋतुराजहा “रॉकेट राजा” या टोपण नावाने देखील का ओळखला जातो, याची झलक या फटक्यांमध्ये बघायला मिळाली.
पहिल्या दोनच दिवसात सामना अतिशय रोमहर्षक अवस्थेत जाऊन पोहोचलेला असून ६६ या धावसंख्येवर नाबाद असलेल्या ऋतुराज गायकवाड चे शतक होणार का? हा उद्या सकाळच्या सत्रातला आकर्षणाचा पहिला विषय राहील. त्यानंतर बडोद्याला दुसऱ्या डावात किती मोठ्या धावसंख्येचे आव्हान मिळते?… अजूनही मजबूत असलेला बडोद्याचा संघ कमबॅक करतो की पहिल्या डावाचीच पुनरावृत्ती करतो? या प्रश्नांची उत्तरे उरलेल्या दोन दिवसाच्या खेळातून उलगडतील आणि त्यानुसारच सामन्याचा निर्णय निश्चित होईल.