नाशिक – वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय अनेकदा मुलं पुढे चालवतात. पण आज अनेक क्षेत्रात वडिलांचा व्यवसाय सक्षमपणे मुली पुढे नेताना दिसतात. याबाबतीत नाशिकमध्ये एक नाव अग्रक्रमाने पुढे येतं ते म्हणजे एसएसके सॉलिटीअरच्या एक्सिक्युटिव्ह डायरेक्टर रंगोली कुटे. वडिलांनी सुरू केलेला हॉटेल व्यवसाय रंगोली कुटे यांनी अतिशय कमी वयात हातात घेतला आणि आज सक्षमपणे त्या पुढे नेत आहेत.
इंडिया दर्पण फेसबुक लाइव्हमध्ये महिला दिन विशेष कार्यक्रमात त्यांचा प्रवास, त्यांची यशोगाथा उलगडण्यात आली. बागेश्री पारनेरकर हिने मुलाखत घेतली. या व्यवसायात कशा आल्या याविषयी सांगताना त्या म्हणाल्या की, २०१६ मध्ये वडिलांनी मला हॉटेलच्या मॅनेजमेंटसाठी मुंबईहून बोलावून घेतलं. तेव्हा मला वाटलं नव्हतं की मी पूर्णपणे हॉटेल व्यवसाय सांभाळू शकेल. कारण मी एमबीए केलं होतं आणि हॉटेल व्यवसायाशी संबंधित मला काहीही माहीत नव्हतं. माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होत. पण हळूहळू मला हे काम आवडायला लागलं. नाशिकमध्ये मी रमले. पण सुरुवातीचा काळ माझ्यासाठी आव्हानात्मक होता. स्टाफशी बोलण्यापासून, कोणते रिपोर्ट्स असतात, कोण काय काम करेल, हॉटेल इंडस्ट्री नेमकी कसं काम करते हे सगळं समजून घ्यावे लागले. आणि मुळात त्यावेळी हे क्षेत्र पुरुषी क्षेत्र म्हणून ओळखले जायचे. मुली खूप कमी होत्या, त्यामुळे थोडं जड गेलं. पण नंतर एक एक गोष्टी समजत गेल्या आणि काम करणं सोपं झालं.
नाशिकमधील हॉटेल व्यवसायाच्या सद्यस्थितीविषयी त्या बोलल्या की, मुंबई पुण्याबरोबरच आता नाशिककडे उद्योग व्यवसाय वळत आहे. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. मोठमोठ्या कंपन्या आता नाशिकमध्ये येत आहे आणि हॉटेल व्यवसायासाठी ही चांगली गोष्ट आहे. सध्या लोकांची टेस्ट बदलत आहे. आधी लोकं फक्त भारतीय पदार्थ खाण्यासाठी बाहेर पडायचे. पण आता लोकं विविध देशातील पदार्थ खाण्यासाठी उत्सुक असतात. आणि हॉटेल व्यावसायिक म्हणून लोकांची टेस्ट बदलवणं ही आमची जबाबदारी आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगाविषयी त्यांनी सांगितले की, कोणत्याही क्षेत्रात स्पर्धा ही महत्त्वाची असते. आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अपडेट असणं गरजेचं आहे. आणि मला जे आवडतं जे नवीन शिकते ते मी सतत हॉटेलमध्ये आणण्याचा प्रयत्न करते. लोकांचा पण चांगला प्रतिसाद मिळतो. एकदा हॉटेलमध्ये आलेला ग्राहक पुन्हा नवीन पदार्थ खाण्यासाठी कसा येईल यासाठी आमची टीम कार्यरत असते.
आजच्या तरूणाईसाठी खासकरून मुलींसाठी रंगोली कुटे या प्रेरणास्थान आहेत पण त्यांची प्रेरणा कोण आहे. याविषयी त्यांनी सांगितले की, माझे सगळ्यात मोठे प्रेरणास्थान माझे आई वडील आहेत. त्यांच्याकडे बघत बघतच मी मोठी झाली आहे. या क्षेत्रात येण्याविषयी त्यांनी सांगितले की आज हॉटेल इंडस्ट्री वाढत आहे. आणि मला अभिमान वाटतो की माझ्या स्टाफमध्ये मोठ्या संख्येने मुली आहेत. आणि क्षेत्रात नक्कीच मुलींनी यावं, मलाही जमेल का, मी हे करू शकेल का असा विचार मुलींनी करू नये. वेळ बदलत आहे तर त्या वेळेचा सदुपयोग आपण करायला हवा, असे मत त्यांनी मांडले.