विशेष प्रतिनिधी, मुंबई
अभिनेता रणधीर कपूर यांचे दिवंगत बंधू राजीव कपूर यांची मालमत्ता कोणाकडे जाणार यासंबंधात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने रणधीर कपूर आणि त्यांची बहीण रिमा जैन यांना राजीव कपूर यांच्या घटस्फोटाचे कागद दाखल करण्यास सांगितले आहे. आपण हे कागद शोधत असल्याचे रणधीर यांनी न्यायालयाला सांगितले आहे. राजीव कपूर यांचे यावर्षी ९ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
मालमत्तेसंबंधातील प्रकरणी न्यायालयात रणधीर कपूर आणि रिमा जैन यांची सुनावणी सुरू असताना सोमवारी उच्च न्यायालयाने हे आदेश दिले. घटस्फोटाचे कागद लवकरच शोधून दाखल करू, असे न्यायालयाने त्यांच्याकडून लिहून घेतले आहे.
हे कागद सध्या सापडत नसल्याचे रणधीर यांनी एका मुलाखतीत सांगितले. राजीव कपूर हे कधी मुंबई तर कधी पुणे येथे रहात असत. त्यामुळे हे कागद त्यांनी कुठे ठेवले आहेत, याबद्दल आम्हाला कोणालाच काहीही कल्पना नाही. सध्या आम्ही हे कागद शोधतो आहोत. मालमत्तेसंबंधी काही निर्णय घेण्यासाठी त्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.
राजीव कपूर यांचा आरती सभरवाल यांच्याशी २००१ मध्ये विवाह झाला होता. २००३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. याबाबत रणधीर कपूर आणि रीमा जैन यांच्या वकील शरण जगतियानी यांनी सांगितले की, या संपूर्ण संपत्तीचा मालकी हक्क आता या बहीण भावांकडेच आहे. यासाठी घटस्फोटाच्या ज्या कागदांची आवश्यकता आहे, ते अद्याप मिळालेले नाहीत. आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला, पण ते काही मिळाले नाहीत.