नाशिक – जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून कृषि विभागाच्या वतीने 9 ते 15 ऑगस्ट 2021 या कालावधीत जिल्ह्यास्तरीय रानभाजी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या जिल्हास्तरीय रानभाजी सप्ताहाचे उद्घाटन 12 ऑगस्ट रोजी राज्याचे अन्न, नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्हा पालकमंत्री छगन भुजबळ आणि कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार असून, शेतकरी व ग्राहकांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
शासकीय प्रसिध्दी पत्रकात नमुद केल्यानुसार, आदिवासी बहुल भागातील शेतकऱ्यांमार्फत पावसाळ्यात नैसर्गिकरित्या येणाऱ्या औषधी रानभाजीचे प्रदर्शन तसेच विक्री या सप्ताहाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. शहरातील नागरीकांना रानभाजीचे महत्व समजावे व आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण व्हावे हा या प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या कंदभाजी, हिरवी पालेभाजी, फुलभाजी, फळभाजी इत्यादी औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांचा समावेश या प्रदर्शनात करण्यात योणार आहे.
दैनंदिन आहारामध्ये रानभाजीचा जास्तीतजास्त समावेश व्हावा व जनजागृती व्हावी म्हणून जिल्हा व तालुकास्तरावर रानभाजी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून या सप्ताहात सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. सोनवणे आणि आत्माचे प्रकल्प संचालक श्री. निकम यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
असे असेल सप्ताहाचे आयोजन
सदर सप्ताहाचे जिल्हा व तालुकानिहाय आयोजन करण्यात आले असून, 9 ऑगस्ट रोजी पंचायत समिती आवार इगतपुरी, 10 ऑगस्ट रोजी पंचायत समिती आवार त्र्यंबकेश्वर, पंचायत समिती आवार सुरगाणा, तालुका कृषी अधिकारी कार्यालय परिसर सिन्नर, शासकीय रोपवाटीका चांदवड तसेच 11 ऑगस्ट रोजी पंचायत समिती आवार कळवण, मौजे अलियाबाद तालुका बागलाण व तहसिल कार्यालय दिंडोरी, 12 ऑगस्ट रोजी पंचायत समिती आवार त्र्यंबकरोड नाशिक, 13 ऑगस्ट रोजी पंचायत समिती आवार येवला, पंचायत समिती आवार नांदगाव, पंचायत समिती आवार निफाड, 14 ऑगस्ट रोजी कृषी विज्ञान संकुल शासकीय तंत्र विद्यालय मालेगाव, 15 ऑगस्ट रोजी पंचायत समिती आवार पेठ, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत देवळा या ठिकाणी रानभाजींचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.