नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकीकडे गोंदिया जिल्ह्यातील आमगावमध्ये बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला भाजपसोबत युती करणे फायद्याचे ठरले, पण नागपूर जिल्हातील रामटेक तालुक्यात शिंदे गटासोबत हात मिळविणे काँग्रेसला महागात पडले आहे.
रामटेक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची संपूर्ण राज्यात चर्चा आहे. कारण काँग्रेसचे आमदार सुनील केदार आणि शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या युतीचा सपशेल पराभव झाला आहे. केदार आणि जयस्वाल यांची चांगली मैत्री आहे. दोघेही त्यांच्या पक्षांचे या भागातील दमदार आणि प्रभावी नेते आहेत. त्यामुळे दोघे एकत्र आल्याने मोठा विजय नोंदविला जाणार असा कयास लावण्यात आला. पण, दोन दिग्गज नेत्यांचा सपशेल पराभव करीत केदार यांचे एकेकाळचे कार्यकर्ते सचिन किरपान यांनी ही निवडणूक एकतर्फी जिंकली आहे.
सचिन किरपान गटाने स्वतंत्र पॅनल लढवत १८ पैकी १४ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे दोन्ही दिग्गज नेत्यांचा त्यांच्याच गडावर दारुण पराभव झाला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. उर्वरित चार जागांवर भाजपप्रणित शेतकरी विकास सहकार गटाने विजय मिळविला आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जागा लढविल्या होत्या. परंतु, तिन्ही जागांवर त्यांच्या वाट्याला पराभवच आला आहे.
मांढळ, पारशिवनीत केदार चमकले
नागपूर जिल्ह्यातील रामटेकसह मांढळ आणि पारशिवनी येथील बाजार समित्यांसाठीही शुक्रवारी मतदान झाले होते. रामटेकमध्ये पराभव झाला असला तरीही मांढळ आणि पारशिवनीमध्ये काँग्रेस प्रणित (केदार गट) शेतकरी सहकार पॅनल विजयी झाले आहे. पारशिवनी आणि मांढळ येथे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत झाली.
इथे दमदार विजय
पारशिवनीच्या निवडणुकीत १८ पैकी १४ जागांसाठीच निवडणुक झाली. इतर चार जागा बिनविरोध निवडून आल्या. पण सर्व १४ जागांवर काँग्रेसने दमदार विजय मिळविला. तिथे शिंदे गटाला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. दुसरीकडे मांढळ येथे १८ पैकी १७ जागांवर काँग्रेसने तर एका जागेवर भाजपने विजय मिळविला आहे.
Ramtek APMC Election Politics Congress MLA Sunil Kedar Defeat