नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक मनपाच्या अग्निशमन विभागाने रामसेतून पुलावरुन गोदावरी नदीच्या प्रवाहात पडलेल्या व्यक्तीला वाचवले. रविवारी रामकुंड गोदावरी नदी येथे राम सेतू पुलाजवळ गोदा महाआरती असल्याने सदर ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अग्निशमन दलाचे जवान आपल्या साहित्यासह नियुक्त करण्यात आले होते. सदर गोदावरी नदी पात्रात सुरक्षिततेच्या दृष्टीने दोर बांधून किनाऱ्यालगत सर्व कर्मचारी स्टॅन्ड बाय थांबून सर्वत्र नजर ठेवून होते. ज्यावेळी महाआरती सुरू झाली साधारणपणे सात वाजून पाच मिनिटांनी रामसेतू पुलावरून रविंद्र नारायण ठाकरे अंदाजे (५०) ही व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात पडली. ती पाण्याच्या वेगात वाहून जात असताना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या बरोबर असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना वेळीच सावध केले. त्यानंतर पाण्याच्या प्रवाहात उड्या घेऊन सदर व्यक्तीस सुखरूप बाहेर किनाऱ्यावर आणून तिला सीपीआर देऊन ॲम्बुलन्स येईपर्यंत ताबडतोब अग्निशमन दलाच्या बोलेरो जीपमध्ये नाशिक महानगरपालिका अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात येथे घेऊन जात असता गाडीत तिला सीपीआर देणे सतत चालू ठेवून वेळीच पोहोचवल्याने व डॉक्टरांचे उपचार लागलीच मिळाल्याने सदर व्यक्तीचे प्राण वाचले.
या व्यक्तीस वाचविताना अग्निशमन दलाचे लीडिंग फायरमन संदीप जाधव उमेश गोडसे तसेच ट्रेनी फायरमन दिनेश चारोस्कर साकेत भवार यांनी पाण्यात उड्या घेऊन ठाकरे या ५० वर्षीय व्यक्तीस सुखरूप किनाऱ्यावर आणले.या घटनास्थळी केंद्र अधिकारी दत्तात्रय रामभाऊ गाडे मुख्य अग्निशमन केंद्र शिंगडा तलाव यांचे नेतृत्व खाली संपूर्ण टीम कार्यरत होती, त्यांचे सहकारी पंचवटी केंद्र अधिकारी संजय कानडे लीडिंग फायरमन किशोर पाटील प्रमोद लहामगे संतोष बेंद्रे तसेच शिवाजी मतवाड व इतर संपूर्ण टीम सदर ठिकाणी कार्यरत होते. ठाकरे वपण्याच्या पाण्यात वाहून जात असताना अग्निशमन जवानांनी केलेल्या पर्यटनाचा व्हीडिओ समोर आला आहे.मनपाच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख संजय बैरागी आणि सर्व अधिकारी कर्मचारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे आदींनी या मोहिमेत सहभागी झालेल्या अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन केले.