शेगाव शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिर्डीतील साईबाबा संस्थान आणि शेगांव येथील श्री संत गजानन महाराज देवस्थान रामनवमी उत्सवासाठी सज्ज झाले आहेत. या दोन्ही तीर्थस्थळी भाविकांची मोठी गर्दी होत असते. उत्सवात महाराष्ट्रासह बाहेरच्या राज्यातील भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित होतात.
शिर्डीतील साईबाबा संस्थानाचा रामनवमी उत्सव आजपासून (२९ मार्च) सुरू झाला आहे. २९ ते ३१ मार्च या कालावधीत इथे तीन दिवसीय रामनवमी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. विविध धार्मिक कार्यक्रम या दरम्यान होतील. शिवाय रामनवमीला अर्थात ३० मार्चला साई मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. शिर्डीत दाखल झालेला एकही भाविक दर्शनाशिवाय परत जाणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाणार आहे. यामुळे मंदिर परिसरात होणाऱ्या गर्दीवरही सहज नियंत्रण मिळविता येणार आहे.
शिर्डीत लाखो भाविक
रामनवमी उत्सवाचा भाग म्हणून २९ मार्चला साईबाबांची काकड आरती आणि पोथी मिरवणुक पार पडली. या उत्सवासाठी राज्यभरातून शेकडो पालख्यांसोबत साईभक्त पायी दाखल झाले आहेत. अमेरिकेतील दानशूर साईभक्त शोभा पै यांच्या देणगीतून समाधी मंदिर आणि परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाईदेखील करण्यात आली आहे.
शेगाव येथे स्वाहाकार याग
शेगांव येथील श्री संत गजानन महाराज देवस्थानाच्या वतीने रामनवमीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गुढीपाडव्यालाच या उत्सवाला प्रारंभ झाला असून रामनवमीला मोठा उत्सव होणार आहे. त्याचाच भाग म्हणून २८ मार्चला गजानन महाराज मंदिरात अध्यात्म रामायण स्वाहाकार यागाला प्रारंभ झाला आहे. रामनवमी उत्सवासाठी शेगांवमध्येही राज्यभरातून शेकडो दिंड्या दाखल झाल्या आहेत.
Ramnavami Festival Shirdi Saibaba Shegaon Gajanan Maharaj Temple