नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महापालिका आयुक्तपदाची सूत्रे रमेश पवार यांनी आज स्विकारली आहेत. म्हाडा घोटाळ्याप्रकरणी राज्य सरकारने कैलास जाधव यांची तडकाफडकी बदली केली आहे. पवार यांचे आज सकाळी महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन येथे आगमन झाले. जाधव यांच्याकडून त्यांनी आयुक्तपदाची सूत्रे घेतली आहेत.
पवार हे मुळचे देवळा तालुक्यातील भऊर गावचे आहेत. तसेच, सटाण्याचे ते जावई आहेत. म्हणजेच, जन्मगाव आणि सासरवाडी अशी दोन्ही गावे ही नाशिक जिल्ह्यातीलच आहेत. तसेच, त्यांना नाशिक शहरासह जिल्ह्याची उत्तम जाण आहे. त्याशिवाय ते कर्तव्यदक्ष अधिकारीही आहेत. त्यामुळे नाशिककरांच्या त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
पवार हे मुंबई महापालिकेत सुधार विभागाचे सहआयुक्त होते. पवार यांनी इंजिनिअरींगची पदवी घेतली आहे. तसेच, त्यांनी मुंबईतील व्हीजेटीआय संस्थेमधून पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांना महापालिकेतील कामकाजाचा तब्बल ३० वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी महापालिकांमध्ये उपायुक्त, सह आयुक्त, सहाय्यक आयुक्त अशा विविध पदांवर काम केले आहे. मुंबई महापालिकेच्या कामकाजाचा त्यांना उत्तम अनुभव आहे. मुंबई मनपामध्ये अजॉय मेहता आणि प्रवीण परदेशी हे आयुक्त असताना पवार यांच्याकडे आयुक्त कार्यालयाची जबाबदारी होती. त्यांनी ती उत्तमरित्या सांभाळली. तसेच, कोरोनाच्या संकटकाळात मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. मुंबई महापालिकेचा कोरोना लढा यशस्वी होण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. मुंबई महानगरामध्ये विविध नव्या योजनांची संकल्पना, त्यांचे नियोजनात आणि अंमलबजावणी यात त्यांची भूमिका महत्वाची राहिली आहे. परिणामी, त्याचा अनुभव नाशिक महापालिकेमध्ये त्यांना उपयुक्त ठरणार आहे. मुंबई महापालिकेतील सहआयुक्त (सुधार) हे पद अतिशय महत्त्वाचे आहे. या विभागाअंतर्गत मालमत्ता, बाजार, अग्निशमन, गृहकर्ज, चाचणी व लेखापरीक्षा या महत्वाच्या विभागांचा समावेश होतो. याच पदावर ज्येष्ठ सनदी अधिकारी अजॉय मेहता, सिताराम कुंटे, आर. ए. राजीव, सतिश भिडे, श्रीमती राधा यांनी जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे पवार यांच्या प्रदीर्घ मनपा कामकाजाचा नाशिकच्या विकासात मोठा उपयोग होईल, अशी अपेक्षा राज्य सरकारला आहे.