मुंबई – ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे वयाच्या ९८ वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रमेश देव यांनी मराठी व हिंदीतील अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी चित्रपटात अभिनयाबरोबर निर्माता, दिग्दर्शक म्हणून काम केले.
रमेश देव यांनी आंधळा मागतो एक डोळा या चित्रपटातून चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले होते. हिंदी चित्रपट आनंद मधील राजेश खन्ना व अभिताभ बच्चन बरोबरची भूमिका संस्मरणीय ठरली. त्यांचे लग्न अभिनेत्री सीमा देव यांच्यासोबत झाले. या दोघांनीही अनेक चित्रपटांत सोबत काम केले. त्यांचा जन्म ३० जानेवारी १९९२९ रोजी कोल्हापुरत झाला होता.
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
“ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनाने मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीचा एक गौरवशाली अध्याय संपला आहे. देखणं व्यक्तिमत्त्व, अष्टपैलू अभिनयाच्या बळावर मराठी नाट्य-चित्रपट रसिकांच्या हृदयसिंहासनावर अनेक दशकं अधिराज्य करणारा महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. रमेश देव यांच्या अभिनयानं मराठी कलारसिकांच्या पिढ्यांना मनमुराद आनंद दिला. मराठी कलासृष्टी समृद्ध करण्याचं काम रमेश देव यांनी केलं. सीमा आणि रमेश देव यांचं वास्तवातलं तसंच पडद्यावरचं दांपत्य जीवन महाराष्ट्रासाठी आदर्श होतं. त्यांच्या निधनाने एक महान कलावंत, आदर्श माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्याचं निधन ही मराठी कलासृष्टीची मोठी हानी आहे. रमेश देव यांच्या कुटुंबियांच्या, रसिक चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. रमेश देव साहेबांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली…,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करीत त्यांना श्रध्दांजली वाहिली.