मुंबई – केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी अॅलोपॅथिक औषधांच्या विरोधात योग गुरू रामदेव बाबा यांचे विधान दुर्दैवी असल्याचे सांगत आपले शब्द परत घेण्याचे आवाहन रामदेव बाबांना केले आहे. त्यानंतर काही तासांतच रामदेव बाबांनी आपले विधान मागे घेतले. उपचारपद्धतिच्या संघर्षावर उद्भवलेल्या वादाला विराम देऊन मी आपले विधान मागे घेत आहे, असे रामदेव यांनी म्हटले आहे.
सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीयोत इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे की रामदेव यांनी अॅलोपॅथी उपचारपद्धतीला मुर्ख विज्ञान म्हटले आहे. रेमडेसिविर, फॅबिफ्ल्यू आणि भारतातील औषध महायंत्रकद्वारा मान्यता असलेली इतर औषधे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात अपयशी ठरले आहे, असे रामदेव यांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर अॅलोपॅथिक औषधांमुळे लाखो रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असेही रामदेव म्हणतात. अर्थात पतंजली योगपीठ ट्रस्टने आयएमएच्या व्हिडीयोतील दावे खोटे असल्याचे म्हटले आहे. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रामदेव यांचे विधान कोरोना योद्ध्यांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. या विधानामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. अश्याप्रकारच्या भूमिकांमुळे आरोग्यसेवकांचे मनोबल खचेल आणि कोरोनाविरुद्धचे आपले युद्ध कमकुवत होईल, असेही डॉ. हर्षवर्धन यांनी रामदेव यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.
रामदेव यांना नोटीस
इंडियम मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने रामदेव बाबा यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटिशीत आधुनिक उपचार व अॅलोपॅथिच्या डॉक्टरांशी संबंधित रामदेव यांनी केलेले विधान दुर्दैवी असल्याचे म्हणत रामदेवव यांनी दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी केली आहे.