मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – योगगुरू बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांनी आयुर्वेदिक उत्पादनांच्या प्रचार आणि प्रसारासाठी पतंजली आयुर्वेद कंपनी स्थापन केली. पतंजली आयुर्वेदमध्ये विविध आयुर्वेदिक औषधे आणि खाजद्यपदार्थांचे उत्पादन होते. ही पूर्णपणे स्वदेशी कंपनी आहे. परदेशी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी पतंजलीने विविध उत्पादने बाजारात आणली आहेत. पतंजलीमध्ये ४५ प्रकारचे सौंदर्य प्रसाधने आणि ३० विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे उत्पादने तयार केली जातात. याच पतंजलीच्या रूची सोया कंपनीने आता महत्त्वाची कामगिरी केली आहे.
पतंजली आयुर्वेद समुहाच्या नेतृत्वाखालील रूची सोया कंपनीने २,९२५ कोटी रुपयांचे कर्ज पूर्ण फेडले आहे. त्यानंतर आता कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे. बाबा रामदेव यांच्या रुची सोयाने नुकतेच एफपीओच्या माध्यमातून ४,३०० कोटी रुपये उभारले होते. कंपनीने या निधीचा वापर कर्ज फेडण्यासाठी केला आहे. रूची सोया आता कर्जमुक्त झाली आहे, अशी माहिती पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी ट्विट करून दिली आहे.
कंपनीचे प्रवक्ते म्हणाले, की कंपनी जवळपास १,९५० कोटी रुपयांचे कर्ज फेडणार असल्याची माहिती कंपनीने एफपीओसाठी जमा केलेल्या कागदपत्रांमध्ये दिली होती. कंपनीने कर्जदात्यांचे २,९२५ कोटी रुपयांची पूर्ण रक्कम फेडणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
शेअरचे भाव ९०० च्या वर
शेअर बाजाराच्या अखेरच्या सत्रात शुक्रवारी रूची सोयाच्या शेअरचा भाव ९२४.८५ रुपये होता. एका दिवसापूर्वीच्या तुलनेत १०६ रुपये किंवा जवळपास १३ टक्क्यांची वाढ दर्शवत होता. एफपीओ वाटपाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून रूची सोयाचे शेअर घेणाऱ्या ग्राहकांना ४० टक्क्यांहून अधिक प्रीमियम मिळाला आहे. कंपनीचा एफपीओ २८ मार्च रोजी बंद झाला होता. त्यासाठी मूल्य श्रेणी ६१५ ते ६५० रुपये प्रति शेअरपर्यंत ठरवण्यात आली होती. कंपनीच्या संचालक मंडळाने जारी किंमत ६५० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यास मंजुरी दिली होती.