इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी काल विधान परिषदेत गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत सावली रेस्टॉरंट अँड बार असून या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला. या कारवाईत मुली ताब्यात घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आज शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी हे आरोप फेटाळून लावत परब यांच्यावर अर्धवट वकील म्हणत पलटवार केला आहे.
ते म्हणाले की, १९९० पासून सावली बार सुरू असून माझ्या पत्नीच्या नावे आहे. शेट्टी नावाच्या व्यक्तीला ३० वर्षांपासून ते चालवायला दिलं आहे. या ३० वर्षात आम्ही तिथे पायही ठेवला नाही. पण तिथे १४ महिलांचं परमिशन आहे. तो डान्सबार नाही. अनिल परब यांनी डान्सबार आहे सांगून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाहणी केली तेव्हा एका गिऱ्हाईकाने लेडीज वेटरवर पैशाची उधळण केल्याचं कळलं. म्हणून आम्ही ताबडतोब शेट्टीला बाहेर काढलं. त्याच्यावर कारवाई केली. मुलींचं वेटरचं लायसन्स रद्द केलं. आम्ही आर्केस्ट्राचं लायसन्स होतं तेही रद्द केलं. आणि गेल्या दोन महिन्यांपासून ते हॉटेलही बंद केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ते म्हणाले की, अॅग्रीमेंटवर हॉटेल किंवा बार चालवतो त्याची जबाबदारी असते. मालकाची जबाबदारी नसते. हेतुपुरस्सर माझ्या पत्नीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मी सर्व लायसन्स पोलिसांना दिले. यापेक्षा अजून काय करणार. अनिल परब यांच्यासाठी नियम बदलणार का? मालक जबाबदार नाही. चालक जबाबदार आहे. कायद्यात म्हटलं आहे. मग रामदास कदमांच्या पत्नीला बदनाम करण्यासाठी नियम बदलणार का. रामदास कदमांच्या पत्नीने व्यवसाय करणं गुन्हा आहे का असेही त्यांनी सांगितले.