मुंबई – माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्या अनिल परब यांच्यावरील आरोपासंदर्भात कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याप्रकरणी कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सहा ऑक्टोबरला सहा पानी पत्र लिहून आपल्या वेदना मुख्यमंत्र्यांना कळवल्या आहेत. तसेच प्रकृती अस्वास्थामुळे ते यंदाच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याचे कळविले आहे.
कथित ऑडिओ क्लिपमुळे रामदास कदम व्यथित झाले असून, पक्षप्रमुखांना आपली बाजू मांडण्यासाठी त्यांनी पत्र लिहिले आहे. पक्षात आपली बदनामी करण्याचे षडयंत्र रचल्याचा दावा कदम यांनी पत्रातून केला आहे. मुख्यमंत्र्यांना ते आठवडाभरात व्यक्तिशः भेटून आपल्या भावना व्यक्त करणार असल्याचे समजते. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. सोमय्या यांना शिवसेनेच्याच नेत्याने रसद पुरविल्याचा आरोप केला जात आहे. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी या प्रकरणात थेट रामदास कदम यांचेच नाव घेतले आहे.
कदम तीन महिन्यांपासून आजारी
गेल्या तीन महिन्यांपासून रामदास कदम आजारी आहेत. त्याच्यावर ब्रीच कँडी रुग्णालय आणि घरी उपचार सुरू आहेत. संसर्ग टाळण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना गर्दी न जाण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ते आज षण्मुखानंद हॉल येथे होणार्या दसरा मेळाव्यात उपस्थित राहणार नसल्याबाबत त्यांनी पत्राद्वारे कळविले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रामदास कदम यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मेळाव्यात त्यांना प्रवेश मिळेल की नाही याबाबत चर्चा सुरू झाली होती.