इंडिया दर्पण विशेष लेखमाला
रामायण यात्रा भाग -२
नंदीग्राम अयोध्या
श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्ये पासून १५ किमी अंतरावर नंदीग्राम नावाचे एक लहानसे गाव आहे. मात्र पौराणिक,धार्मिक आणि ऐतिहासिक विशेषत: रामायणातील दृष्टीने नंदीग्राम हे अयोध्ये इतकेच महत्वाचे ठिकाण आहे. माता कैकेयीच्या आदेशानुसार भगवान रामाने सीता व लक्ष्मण यांच्या सह १४ वर्षांचा वनवास भोगला हे सर्वविदित आहे. परंतु श्रीरामाचे धाकटे बंधू भरत यांनी देखील राजवैभव सोडून १४ वर्षे नंदीग्राम येथे संन्यस्तवृत्तीने राहून एक प्रकारे वनवासच भोगला. वाल्मीकि रामायणात या प्रसंगाचे सविस्तर वर्णन केलेले आहे.
भगवान राम आपली पत्नी सीता आणि लहान बंधू लक्ष्मण यांचे सह वनवासाला निघाले त्यावेळी भरत देखील त्यांच्या सोबत वनवासात जाण्यासाठी हटून बसला.त्यावेळी श्रीरामानी त्याला खूप समजावून अयोध्येत रामाचा प्रतिनिधि म्हणून राहण्यास सांगितले. श्रीरामांनी समजावून सांगितल्या मुळे भरत येथे राहिले खरे पण ते देखील चौदा वर्षे अयोध्येत गेले नाहीत. अयोध्येच्या राजसिंहासनावर श्रीरामाच्या पादुकांची स्थापना करुन भरताने नंदीग्राम येथे रहूनच रामाचा प्रतिनिधी म्हणून चौदा वर्षे राज्य कारभार केला.
जो पर्यंत प्रभु राम वनवासातून अयोध्येला परत आले नाहीत तोपर्यंत सर्व राजवैभवाचा त्याग करुन भरताने देखील स्वेच्छेने संन्यस्त वृत्तीने राहून १४ वर्षांचा वनवासच भोगला.
श्रीराम, सीता आणि लक्ष्मण वनवासात जाताच त्यांचा वियोग सहन न होवून रामाचे पिता राजा दशरथ यांनी प्राणत्याग केला. त्यानंतर भरताने नंदीग्राम येथे एक कुंड निर्माण केले त्याच कुंडातील पाण्यात भरताने आपल्या पित्याचे दशरथ राजाचे श्राद्ध केले. तेव्हापासून हे कुंड ‘भरतकुंड’ नावाने प्रसिद्ध झाले आहे. या कुंडातील जल अतिशय पवित्र मानतात.
भरतकुंडा जवळ एक वेदी आहे तेथे पिंडदान करण्याची प्रथा आहे. पितरांचे पिंडदान करण्यासाठी नंदीग्राम बिहार मधील गया इतकेच प्रसिद्ध आहे.उत्तर भारतातील बहुसंख्य लोक आपल्या पितरांचे पिंडदान व श्राद्ध करण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात येतात.
भरत कुंडा जवळच एक प्राचीन शिवमंदिर आहे. येथे श्रावणात श्रद्धालु मोठ्या संख्येने येतात. सामान्यपणे शिव मंदिरांत शिवाच्या पिंडीकड़े मुख केलेला नंदी असतो. येथे मात्र नंदीचे मुख दुसरीकडे आहे.
श्रीराम -भरत भेट!
चौदा वर्षांचा वनवास संपवून सीता , लक्ष्मण आणि हनुमान वगैरे मंडळींसह अयोध्येला आलेले श्रीराम सर्वप्रथम नंदीग्रामला गेले. तिथे भरताला भेटले आणि त्याला सोबत घेउनच सर्व मंडळी अयोध्येला गेली असे वर्णन वाल्मीकि रामायणात केलेले आहे.
श्रीराम आणि भरत भेट हा रामायणातील अतिशय ह्रदय प्रसंग आहे.
हनुमान- भरत प्रथम भेट
हनुमानाची आणि भरताशी पहिली भेट नंदीग्राम येथेच झाली होती असे सांगतात, राम रावण युद्धात लक्ष्मणाला इंद्रजीत याने सोडलेली शक्ती लागली. तो मुर्च्छित होवून पडला तेव्हा राजवैद्याच्या सल्ल्या नुसार हनुमान हिमालयातून संजीवनी बुटी असलेला द्रोणागिरी पर्वत घेउन येत असतांना त्याची प्रचंड मोठी सावली अयोध्येवर पडली.त्यावेळी भरताने बाण मारून हनुमानाला जमिनीवर पाडले. हनुमान मुर्च्छित होवून जमिनीवर पडला त्यावेळी त्याच्या मुखातून ‘श्रीराम, श्रीराम’ असे शब्द निघत होते. भरताने हनुमानाला शुद्धिवर आणले. हनुमानाच्या मुखाने सर्व गोष्टी समजल्यावर भरताने रामभक्त हनुमानाची गळाभेट घेतली होती.
अयोध्या से लगभग 15 किमी की दूरी पर स्थित नंदीग्राम एक पवित्र कुंड है। माना जाता है कि यहीं पर भरत जी ने भगवान श्री राम के वनवास से जल्द लौटने के लिए तपस्या की थी। इस स्थान की निर्मलता कुंड में डुबकी लगाने के लिए आने वाले श्रदालुओं को मन्त्रमुग्द्ध कर देती है। #UPTourism pic.twitter.com/cZJniUJJcQ
— UP Tourism (@uptourismgov) October 12, 2019
रामायणातील हा महत्वाचा प्रसंग देखील नंदीग्राम येथे घडलेला होता. येथील एक मंदिरांत हनुमान आणि भरत भेटीची मूर्ती देखील आहे.
रामायाणातील महत्वाचे प्रसंग जेथे घडले त्या भारतातील सर्व ठिकाणाना भेट देणार्या आय आर सी टी सीच्या रामायण एक्सप्रेस या सुपर डिलक्स रेल्वेने प्रवास करतांना देखील अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी आणि इतर सर्व प्रमुख स्थानांचे दर्शन घेतल्या नंतर सर्व प्रवाशांना नंदीग्राम येथे आणले जाते.
खरं सांगायचं तर आजपर्यंत हे ठिकाण दुर्लक्षितच होते पण आता अयोध्येचे श्रीरामजन्मभूमी मंदिरा मुले पर्यटन विभाग हळूहळू याही स्थानांचा जीर्णोधार करीत आहे. अयोध्येतील गजबजाट आणि चहलपहल जरी येथे नसली तरी नंदीग्राम हे मनाला शांतता देणारे पवित्र स्थान आहे यात शंकाच नाही. भरता सारख्या निस्पृह भावाला भेटण्यासाठी भगवान श्रीराम जेथे आले ते हे नंदीग्राम. रामायणातील अजरामर भरत-राम भेटीचे हे एकमेवाद्वितीय ठिकाण म्हणजे नंदीग्राम.
-विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७
Ramayana Yatra Nandigram Ayodhya Importance by Vijay Golesar