इंडिया दर्पण विशेष लेखमाला
रामायण यात्रा दर्शन (भाग -८)
वनवासातील साडे अकरा वर्षे
|| निसर्गरम्य चित्रकूटधाम ||
मंदाकिनी नदीच्या किनार्यावर वसलेले चित्रकूट हे भारतातील सर्वांत प्राचीन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे.उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांचा विस्तृत भाग व्यापणारे चित्रकूट शांत,सुंदर आणि निसर्गरम्य अशी परमेश्वराची निर्मिती आहे असं मानलं जातं.
नजर जाईल तिथवर विंध्याचल पर्वताची घनदाट वृक्ष राजिंनी व्यापलेली गगनाला भिडणारी उंचच उंच शिखरं आणि उंच डोंगर कड्यावरून जमिनीवर झेपावनारे शेकडो जल प्रपात यामुळे प्राचीन कालापासून हा परिसर निसर्गसंपन्न आणि समृद्ध झालेला आहे.
येथे मंदाकिनी नदीवर अनेक सुंदर देखने घाट आहेत. यातील सुप्रसिद्ध रामघाट आणि विंध्याचल पर्वताच्या कुशीत दडलेले कामतानाथ मंदिर या दोन पवित्र ठिकाणी भाविक आणि पर्यटक यांची वर्षभर गर्दी असते. पापक्षालन करण्यासाठी आणि पुण्यप्राप्ती होण्यासाठी प्रत्येक अमावस्येला येथे मंदाकिनीत स्नान करण्यासाठी हजारो भाविक येतात. दिवाळीच्या अमावस्येला तर ही संख्या लाखांच्या वर जावून पोहचते. वनवासाच्या 14 वर्षापैकी साडे अकरा वर्षे श्रीराम,सीता आणि लक्ष्मण येथे राहिले होते असे म्हणतात. म्हणजे साक्षांत भगवंतालाही भुरळ पडणारा इथला निसर्ग आहे असे म्हणता येईल.
चित्रकूटचं आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे अत्री ऋषि आणि सती अनसूया यांचा आश्रम देखील येथेच होता. येथेच ब्रह्मा,विष्णु आणि महेश या त्रिदेवांचे सती अनसुयेने लहान बालकांत रूपांतर केले आणि येथेच श्रीदत्तात्रेयाचा जन्म झाला होता. चित्रकूटला लागूनच राजापुर नावाचे एक ठिकाण आहे महाकवी तुलसीदास यांची ही जन्मभूमी आहे.येथे तुलसीदासजी यांनी लिहिलेल्या रामचरितमानस या विख्यात ग्रंथाची मुळप्रत जतन करून ठेवलेली आहे असे म्हणतात.
कुठे आहे चित्रकूट?
अयोध्येपासून २३७ किमी. प्रयागराज पासून १३२ किमी, लखनौ पासून २३८ किमी भोपाळ पासून ५१० किमी आणि दिल्ली पासून ६७६ किमी अंतरावर असलेले चित्रकूट उत्तर प्रदेश आणि मध्य परदेश यांच्या सीमेवर आहे. मंदाकिनीच्या उत्तरे कडील भाग उत्तर प्रदेशात असून दक्षिणे कडील भाग मध्य प्रदेशात येतो. मध्य प्रदेशातील चित्रकूट सतना जिल्ह्यात असून उत्तर प्रदेशातील भागाला चित्रकूट जिल्हा असे नाव देण्यात आले आहे.
विंध्याचल पर्वताच्या डोंगर रांगामधून धावणार्या मंदाकिनी नदीवर चित्रकूट येथे अनेक घाट आणि मंदिरं आहेत. येथे दरवर्षी सुमारे ५० लाख भाविक आणि पर्यटक येतात. भाविक आणि पर्यटक यांना आकर्षित करणारी अनेक धार्मिक आणि निसर्गरम्य ठिकाणे येथे आहे.
चित्रकूटधामची आकर्षक स्थळे
रामघाट
चित्रकूट मधील प्रमुख धार्मिक आणि पवित्र स्थानात सर्वप्रथम रामघाटाचा समावेश केला जातो. या परिसरांत श्रीराम, सीता आणि लक्ष्मण साडे अकरा वर्षे राहिले होते. त्यामुळे या परिसरातील प्रत्येक भाग त्यांनी पायी पदाक्रांत केला होता असे मानतात.मंदाकिनीच्या घाटामध्ये सर्वांत प्रसिद्ध आहे तो रामघाट.याच ठिकाणी श्रीराम दररोज स्नान करीत असत अशी श्रद्धा आहे.
या घाटावरच ‘राम-भरत मिलन’ मंदिर आहे. याच ठिकाणी श्रीराम आणि भरत यांची भेट झाली होती येथेच भरताने श्रीरामाला अयोध्येत परत येवून राज्याभिषेक करण्याचा आग्रह केला होता. त्यामुळ चित्रकूट मध्ये हे सर्वांत प्रमुख मंदिर मानले जाते.या घाटावर भगव्या वस्त्रातील साधू,संत वावरताना पाहून मन धार्मिक आणि अध्यात्मिक भावाने प्रसन्न होते.या घाटावर अनेक प्रकारचे धार्मिक विधि केले जातात त्यामुळ या ठिकाणी दिवसभर भाविकांचा राबता असतो. सायंकाळी वाराणशीतील गंगेप्रमाणे हजारो भाविकांच्या उपस्थित मंदाकिनीची आरती केली जाते. मन शांत आणि प्रसन्न करणारे वातावरण असते.
जानकी कुंड
रामघाटापासून सुमारे २ किमी अंतरावर जानकी कुंड आहे. जनक राजाची कन्या असल्याने सीतेला जानकी देखील म्हणतात. या कुंडात सीता माता स्नान करीत असे. म्हणून या कुंडाला ‘जानकी कुंड’ असे म्हणतात. जानकी कुंडा पासून जवळच राम जानकी रघुवीर मंदिर आणि संकट मोचन ही मंदिरं आहेत.
स्फटिक शिला
जानकी कुंडा पासून जवळच पांढरया रंगाची विशाल शिला आहे. या शीलेवर बसून श्रीराम आणि जानकी चित्रकूटच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत असत असे येथील पुजारी ठामपणे सांगतात. या पांढरया शिलेवर सीतेची पावलं उमटलेली आहेत असे म्हणतात. एकदा सीता येथे उभी असतांना एका कावळयाने सीतेच्या पायांवर चोच मारली त्यामुळे रागावलेल्या श्रीरामने त्याच्यावर बाण रोखला परंतु शरण आल्यामुळे श्रीरामाने त्याला माफ़ केले असे सांगतात.येथून मंदाकिनी नदी आणि तिच्या भोवतालचा घनदाट हिरवा निसर्ग मन मोहक दिसतो.
कामदगिरी
चित्रकूट मध्ये कामदगिरी पर्वत अतिशय पवित्र मानला जातो. अनेक झाड झुडुप आणि वृक्ष वेली यांनी समृद्ध झालेल्या या पर्वतावरच श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांचे सुमारे साडे अकरा वर्षे वास्तव्य होते. त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या कामदगिरी पर्वताला प्रदक्षिणा घातल्यावर सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी दृढ़ श्रद्धा असल्याने दररोज हजारो भाविक कामदगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालतांना दिसतात.
विविध प्रकारच्या घनदाट झाड़ीनी वेढलेल्या या पर्वताच्या पायथ्याशी अनेक लहान मोठी मंदिरं आहेत. यात कामतानाथ आणि भरत मिलाप मंदिर सर्वाधिक लोकप्रिय आहे. येथे भाविक आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात.
सती अनसूया आणि अत्री ऋषिंचा आश्रम
स्फटिक शीले पासून सुमारे ४ किमी अंतरावर घनदाट वृक्ष राजीमध्ये अत्री ऋषि आणि सती अनसूया यांचा आश्रम आहे. या ठिकाणी अत्री ऋषि,सती अनसूया ,श्रीदत्तात्रेय आणि दुर्वास ऋषि यांच्या दगडी मूर्ती आहेत. एकांतात असलेले हे स्थान अतिशय शांत आणि प्रसन्न आहे. येथे ब्रह्मा,विष्णु आणि महेश यांनी बालक होवून दत्त रुपांत जन्म घेतला या विचाराने मन अदभुत आनंदाने प्रसन्न होते.
गुप्त गोदावरी
चित्रकूट मध्ये कामदगिरी पर्वता इतकेच दुसरे लोकप्रिय ठिकाण आहे ते म्हणजे गुप्त गोदावरी. मंदाकिनी काठी गोदावरी हाच एक चमत्कार म्हणता येईल. चित्रकूटधाम पासून सुमारे १८ किमी अंतरावर हे पवित्र स्थान आहे. हा सगळा परिसर डोंगर दरया आणि घनदाट झाड़ीनी व्यापलेला आहे.
याठिकाणी डोंगर कपारीत दोन गुफा आहेत. एक गुफा रुंद आणि भरपूर उंच आहे. गुफेचे प्रवेशद्वार अरुंद असल्याने आत जातांना अडचण येते पण आत गेल्यावर ही गुफा अतिशय प्रशस्त आहे. श्रीराम वनवासात चित्रकूट येथे येणार असल्याचे समजल्यावर सर्व देव देवता येथे आल्या त्यांनी श्रीरामाच्या जन्मापुर्वीच श्रीरामासाठी ही गुफा तयार केली असे सांगतात. या गुफेचे वैशिष्ट्ये म्हणजे हल्लीच्या एसी सारखी ही गुफा हिवाल्यात उबदार तर उन्हाळ्यात थंड असते. या गुफेच्या शेवटी एक लहानसा तलाव आहे यालाच गुप्त गोदावरी असे म्हणतात.
या गुफेला लागूनच दुसरी गुफा आहे.ती भरपूर लांब परंतु अरुंद आहे.या गुफेच्या शेवटी राम लक्ष्मण यांचा दरबार भरत असे असे सांगितले जाते. या दोन्ही गुफा पाहण्याची भाविकांना अतिशय उत्सुकता असते. यामुळे चित्रकूटला येणारे अनेक भाविक या पवित्र गुफांचे दर्शन अवश्य घेतात.
हनुमान धारा
अयोध्येच्या हनुमान गढ़ी एवढीच चित्रकूटची हनुमान धारा हे ठिकाण प्रसिद्ध आहे. चित्रकूटला आल्यावर हनुमान धारा पहिल्या शिवाय चित्रकूट पाहिल्याचे समाधानच मिळत नाही. विंध्याचल पर्वताच्या उंच शिखरावर हनुमान धारा नावाचे प्राचीन मंदिर आहे. हा डोंगर हिरव्यागर वृक्ष राजींनी संपन्न आहे.
शिखराच्या सर्वोच्च ठिकाणी असलेल्या मंदिरात हनुमानाची भव्य मूर्ती आहे. मूर्ती समोरच्या तलावात झर्यातुन सतत पाणी वाहत असते.लंका दहन करुन आलेल्या हनुमानाला विश्रांती मिळावी यासाठी श्रीरामाने हे स्थान निर्माण केले असे म्हणतात. पहाडाच्या शिखरावर ‘सीता रसोई’ आहे.या डोंगर शिखरावरुन चित्रकूट नगराचे विहंगमावलोकन करता येते. पूर्वी येथे पायी जावं लागायचं.पण आता रोप-वे सुरु झाली आहे. रिक्षाने जाण्यायेण्यासाठी ७०० रूपये घेतात. रोप-वे ने जाण्यायेण्यासाठी १३० रूपये भाड़े आहे.
भरत कूप
चित्रकूट हे ठिकाणच श्रीराम आणि भरतभेटीसाठी प्रसिद्ध आहे. भरताने श्रीरामाला राज्याभिषेक करण्या साठी अनेक तीर्थांचे पवित्र जल आणले होते.पण श्रीराम 14 वर्षे वनवासाला गेले अत्री ऋषींच्या सूचनेनुसार ते पाणी एका विहिरीत ठेवण्यात आले. तेव्हापासून या ठिकाणाला भरतकूप या नावाने ओळखले जाते. भरत कुपाजवळ श्रीरामाचे एक मंदिर आहे.
बाकेसिद्ध : येथे एक नैसर्गिक गुहा असून, ‘वाक्सिद्धी’ या शब्दापासून बाकेसिद्ध हे नाव रूढ झाले. येथे तपश्चर्या केल्याने वाणी शुद्ध होते असे म्हणतात. चातुर्मासात श्रीराम व सीता यांचे वास्तव्य येथे असे.
देवांगना पंपापूर : हे ठिकाण कोटितीर्थापासून थोड्या अंतरावर असून, देव-देवता श्रीरामाच्या भेटीला आल्यावर येथे राहत असत, असे मानले जाते. इंद्रपत्नी शची येथे येऊन राहिली होती. मेनका या अप्सरेने येथे तपश्चर्या केली होती. सुरभी, चक्रतीर्थ, रामशय्या ही चित्रकूटजवळील इतर ठिकाणेही फिरण्यासारखी आहेत.
सतना जिल्ह्यातील आणखी काही ठिकाणे :
रामवन : हा भाग दंडकारण्यात येतो. येथूनच श्रीराम अमरकंटक येथे गेले असे म्हणतात. येथे हनुमानाचे पुरातन मंदिर आहे व तुलसीदासांच्या हस्तलिखितांचे संग्रहालयही आहे. हे ठिकाण सतनापासून १४ किलोमीटर अंतरावर आहे.
चित्रकूट संग्रहालय : रामायणातील घटना डोळ्यांसमोर उभ्या करणाऱ्या प्रदर्शनासह येथे प्राणिसृष्टीही उभी करण्यात आली आहे. वास्तवातील जंगलात प्राण्यांचे हुबेहूब पुतळे बसवण्यात आले आहेत.
शबरी फॉल्स : सतना जिल्हा सिमेंट उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. येथे चुन्याचे खाणींचे प्रमाणही मोठे आहे. चित्रकूट येथे भरपूर हॉटेल्स, धर्मशाळा असून, मध्य प्रदेश पर्यटन विभागातर्फेही राहण्याची उत्तम सोय आहे. उत्तर प्रदेश पर्यटन विभागाची यात्री निवासही खूप चांगली आहेत. नोव्हेंबर ते मार्च हा येथे जाण्यासाठी योग्य कालावधी आहे.
कसे जावे?
चित्रकूट येथे रामायणाशी निगडित पाहण्यासारखी अनेक ठिकाण आहेत. भाविक आणि निसर्गप्रेमी यांच्यासाठी अतिशय सुंदर असे हे ठिकाण आहे. मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात हे ठिकाण आहे.सतना पासून ८० किमी अंतरावर चित्रकूट आहे.
येथे येण्यासाठी ८ किमी अंतरावर रेल्वे स्टेशन आहे. देशातील प्रमुख शहरातून येणार्या जवळ जवळ सर्वच रेल्वे येथे थांबतात. शिवरामपुर रेल्वे स्टेशन पासून चित्रकूट ४ किमी अंतरावर आहे. बसेस आणि टू थ्री व्हिलरनेयेथे येता येते.
चित्रकूट येथील बस मार्गही अतिशय चांगले आहेत. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश मधील अनेक मोठी शहरं बस मार्गाने चित्रकूटला जोडलेली आहेत. बस,टैक्सी ,खाजगी वाहन व्यवस्था उत्तम आहे.
चित्रकूट मध्ये निवास आणि भोजनाच्या सर्व प्रकारच्या व्यवस्था उपलब्ध आहेत.धार्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून उप्र आमी मप्र सरकारने चित्रकूट विकासाकड़े विशेष लक्ष दिलेले आहे.चित्रकूटला दरवर्षी ५० लाख भाविक आणि पर्यटक भेट देतात. कारण चित्रकूटला येणं हाच एक मन प्रसन्न करणारा संस्मरणीय अनुभव असतो.
भारतीत प्रमुख तीर्थस्थळांपैकी चित्रकूट हे प्रमुख तीर्थस्थळ आहे. वनवासावेळी याठिकाणी राम, सीता आणि लक्ष्मणाने चित्रकूटाच्या घनदाट जंगलात मुक्काम केला होता, असा उल्लेख पुराणात आहे. कारवी, सीतापुर, कामता, कोहनी, नयागांव या पाच गावांचा संगम याठिकाणी आहे. नैसर्गिक पर्वतरांग, फेसाळत पडणारे धबधबे, नद्या, घनदाट जंगल पशू-पक्षी असे प्रफुल्लीत वातावरण याठिकाणी आहे.
कामदगिरी याठिकाणी भगवान रामाने वास केला होता त्यामुळे हे धार्मिकस्थळ बनले आहे. याचठिकाणी भरतमिलाप मंदिर आहे. श्रीरामाप्रती भक्ती असणारे श्रध्दाळू लोक याठिकाणी मनोभावे परीक्रमा करतात.
भरत कूप
याठिकाणे पवित्रकुंड भरताने बनविले आहे, असे सांगितले जाते. याठिकाणी ठिकठिकाणच्या पवित्र तीर्थस्थळावरील पाणी एकत्रित केले जाते.
जानकी कुंड
हे कुंड रामघाटावर आहे. नद्यांचा प्रवाह, हिरवळ असा निसर्ग पहाण्यासारखा आहे. शांत आणि सुंदर स्थान निसर्गाचा उत्तम नमूनाच म्हणावा लागेल. रामघाटावरून सुमारे 2 किमीच्या अंतरावर असणा-या जानकी कुंडाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. रामघाटावरून नावेतूनही जाता येते.
शाप्तिक शिला
मंदाकिनी नदीच्या किना-यापासून काहीच अंतरावर घनदाट जंगल आहे. येथील दगडांवर असणारे बोटांचे ठसे रामाचे असल्याचे मानण्या त येते.
गुप्त गोदावरी
डोंगरांच्या मधोमध मधोमध नैसर्गिक सौंदर्यांमध्ये ‘गुप्त गोदावरी’ हे स्थान आहे. डोंगरातील गुहांमध्ये राम आणि लक्ष्मणाचा दरबार भरत, असे मानण्यात येते.
हनुमान धारा
डोंगराच्या टोकावरून एक धबधबा वाहत येतो याठिकाणी विविध मंदिर आहेत. याठिकाणी दर्शनासाठी भक्तगणांची गर्दी होते. येथून चित्रकूटचा विशाल नजारा आपणास पाहता येतो.
Ramayan Yatra Vanvas 11 Years Chitrakut by Vijay Golesar