इंडिया दर्पण विशेष लेखमाला
रामायण यात्रा दर्शन (भाग -१२)
श्रीरामांची चतुर्भुज मूर्ती असलेले जगातील एकमेव मंदिर
|| श्री सीता रामचंद्र स्वामी मंदिर भद्राचलम ||
वनवासाच्या 14 वर्षांच्या काळात श्रीराम, सीता लक्ष्मण सतत अनवाणी फिरत असत. अत्री ऋषीच्या आश्रमात काही दिवस राहिल्यानंतर श्रीरामाने मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील घनदाट अरण्यात आपले आश्रयस्थान बनविले. या अरण्याला दंडकारण्य म्हणत असत. अत्री ऋषीच्या आश्रमा पासून दंडकारण्याची सुरुवात होत असे.
येथे काही काळ घालविल्यानंतर श्रीराम हल्लीचे जबलपूर, शहडोल (अमरकंटक) येथे गेले असावेत असा अंदाज आहे. येथे रामगड नावाचा पर्वत आहे. येथे ३० फूट उंची वरून पाण्याचा एक मोठा झरा खालच्या कुंडात पडतो .त्याला ‘सिताकुंड’ असे म्हणतात. येथे वसिष्ठ ऋषींची गुफा आहे. तर बाजूच्या दोन गुफांना ‘लक्ष्मण बोंगरा’ आणि ‘सीताबोंगरा’ असे म्हणतात. बोंगरा म्हणजे गुफा. शहडोलच्या दक्षिण पूर्वेला बिलासपूरच्या आसपास छत्तीसगढ आहे.
हल्ली सुमारे 92,300 वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या प्रांताच्या पश्चिमेला अबुझमाड पहाड तर पूर्वेकडील सीमेवर पूर्व घाट समाविष्ट आहे. दंडकारण्यात छत्तीसगढ़, ओडिसा आणि आंध्र प्रदेशाचा काही भाग समाविष्ट आहे दंडकारण्याचा विस्तार उत्तर दक्षिण 320 किमी तर पूर्व पश्चिम 480 किलोमीटर एवढा होता.
येथे दंडक नावाचा राक्षस राज्य करीत होता. त्याच्या नावावरूनच या भागाला ‘दंडकारण्य ‘ असे नाव पडले. रामायण काळात येथे रावणाचा सहयोगी बाणासूर याचे राज्य होते. त्याच्या राज्याचा विस्तार इंद्रावती, महानदी पूर्व समुद्र तट, गोइंदारी म्हणजे गोदावरी तटा पर्यंत तसेच अलीपूर, पारंदुली, किरंदुली, राजमतेंन्द्री कोयापूर, कोयानार पासून छिन्दुक कोया पर्यंत होता.
येथे हल्लीच्या बस्तर येथील ‘बारसूर ‘ या समृद्ध नगराची बांधनी बाणासूर याने केली आहे इंद्रावती नदीच्या काठावर त्याने ग्राम देवी कोयतर मातेची कन्या माता माय (खेरमाय) हिची स्थापना केली. या परिसरात बाणासुराने स्थापन केलेली देवी दांत तोना (उर्फ दंते वाडिन) प्रसिद्ध आहे. हे ठिकाण हल्ली दंतेवाडा नावाने प्रसिद्ध आहे.
सध्या येथे गोंड जातीचे लोक निवास करतात तसेच संपूर्ण दंडकारण्यात हल्ली नक्सलवादी चळवळी सुरु आहेत. दंडकारण्याच्या आंध्र प्रदेशातील भागात ‘भद्राचलम’ नावाचे शहर आहे. गोदावरीच्या काठावर वसलेल्या या नगरात श्री सीता रामचंद्र स्वामी मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर भद्रागिरी नावाच्या पर्वतावर आहे. आपल्या वनवास काळात काही दिवस ‘श्रीराम या भद्रागिरी पर्वतावर राहिले होते असा उल्लेख लोककथांमध्ये आहे.
दक्षिण भारतातील भद्राचलम येथे गोदावरी नदीच्या काठावर श्री सीता रामचंद्र स्वामी मंदिर आहे. या मंदिराला ‘भद्राचलम मंदिर’ असेही म्हणतात. तेलंगणा राज्यातील भद्रादी कोठागुडम जिल्हयात भद्राचलम आहे. गोदावरीच्या दिव्य क्षेत्रात या मंदिराचा समावेश केला जातो. या मंदिरामुळेच ‘भद्राचलम’ला ‘दक्षिण-अयोध्या’ असे म्हणतात. हे पवित्र ठिकाण जगभरातील लाखो भाविकांना आकर्षित करते.
अयोध्ये नंतर श्रीरामाचे हे देशातील सर्वांत मोठे मंदिर आहे.
श्री सीता राम स्वामी मंदिरातली श्रीरामाची मूर्ती चर्तुभुज आहे जी एकमेवा व्दितीय आहे. श्रीरामांनी येथे शंख, चक्र, बाण धारण केले आहेत. त्यांच्या मांडीवर सीता बसलेली आहे तर एक वेगळ्या आसनावर लक्ष्मण विराजमान आहेत, भगवान श्रीरामांची ही चतुर्भुज मूर्ती जगातली एकमेव मूर्ती मानली जाते. येथे श्रीरामांची शंख, चक्र धनुष्य-बाणधारी मूर्ती का आहे याविषयी एक आख्यायिका सांगितली जाते.
या परिसरात भद्रा नावाचे एक ऋषी होते. ते शबरी प्रमाणेच श्रीरामाचे कट्टर भक्त होते. सीतेच्या शोधात निघालेले श्रीराम येथे आले असता भद्रा बाबांनी त्यांना आपल्या डोक्यावर बसण्याची विनंती केली. श्रीराम त्यावेळी अत्यंत घाईत आणि सीता वियोगाच्या दुःखात होते त्यामुळे भद्रा भयुषींची इच्छा त्यांना पूर्ण करता आली नाही. परंतु ऋषींनी विष्णुच्या राम अवताराची एक झलक पाहण्यासाठी भगवान विष्णुची आराधना चालूच ठेवली. भद्रा ऋषींच्या तपस्येवर प्रसन्न होऊन श्रीरामांनी भद्रा ऋषींना भगवान विष्णुच्या रूपांत पत्नी सीता आणि बंधू लक्ष्मण यांचे सह दर्शन दिले. तसेच शंख वाजवून आपणच विष्णु असल्याचे सांगितले. यामुळे येथे श्रीरामांची येथे चर्तुभुज मूर्ती आहे.
दुसऱ्या एका लोककथेनुसार दमाक्का नावाच्या वनवासी महिलेला आपल्या मुलाच्या शोधात एका गुहेत गेल्यावर श्रीराम, सीता व लक्ष्मण यांची मूर्ती मिळाली. तिथल्या डोंगर माथ्यावर बांबू गवताचे एक छप्पर उभारून तिने त्या मूर्तीची पूजा सुरू ठेवली. पुढे हळू हळू वनवासी व नगरवासी या मंदिरात येऊ लागले. त्याच जागेवर आता भद्राचलम येथील श्रीसीता रामस्वामी मंदिर उभे आहे.
भद्राचलम येथील श्री सीता राम स्वचंद्र स्वामी मंदिरात दररोज किमान 5 हजार भाविक दर्शनार्थ येतात.
मंदिर कुठे आहे?
भद्राचलम शहरा पासून 35 किमी अंतरावर हे मंदिर आहे. येथे श्रीराम, सीता, लक्ष्मण यांचे प्रमाणेच हनुमान, गणपती, देवी, शिव पार्वती भगवान विष्णु, नृसिंह इत्यादि अनेक देवदेवतांची मंदिरं आहेत. रामनवमीला येथे खूपच मोठा उत्सव असतो लाखो भाविक यावेळी महाचलम येथे श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी येतात. दसऱ्याला देखील येथे दहा दिवस लाखो भाविक दर्शन घेतात.
कसे जावे?
तेलंगणाची राजधानी हैद्राबाद पासून ३१२ किमी अंतरावर तर विजयवाडा पासून १८२ किमी अंतरावर आहे. येथील बस मार्ग अतिशय चांगला आहे. भद्राचलम पासून ३२ किमी अंतरावर ‘पर्णशाला’ नावाचे ठिकाण आहे. स्थानिक मान्यते नुसार श्रीराम आपल्या वनवास काळातील काही भाग येथे झोपडी बांधून राहिले. येथूनच रावणाने साधुच्या वेशात सीता हरण केले असे सांगितले जाते. येथे येणाऱ्या पर्यटकांना पर्णशालेतील सीता मातेची पावलं तसेच सुवर्ण हरिण बनून आलेल्या मारीच आणि साधू वेशातील रावणाच्या प्रतिमा दाखविल्या जातात.
– विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७
Ramayan Yatra South Ayodhya Unique Temple by Vijay Golesar