इंडिया दर्पण विशेष विशेष लेखमाला
रामायण यात्रा दर्शन – भाग -५
सीता समाहिता मंदिर, भदोही
खरं म्हणजे रामायणातील सर्वच प्रसंग आणि स्थळं महत्वाची आहेत. भदोही जिल्ह्यात सीता समाहिता नावाचे स्थान आहे. समाहिता म्हणजे समाधी .ज्या ठिकाणी सीता माता स्वत:च धरणीमातेच्या कुशीत विसावली ते हे स्थान. अलाहाबाद आणि वाराणशी यांच्या मध्ये जंगीगंज बाजार पासून 11 किमी अंतरावर गंगेच्या किनार्यावर हे स्थान आहे.

मो. ९४२२७६५२२७
रामायणातील सर्वात जास्त हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग या ठिकाणी घडला. रावणाचा वध केल्यानंतर अग्निदिव्य केलेल्या सीता व लक्ष्मण श्रीराम वनवासाची मुदत पूर्ण झाल्यावर अयोध्येला परत आले.त्यानंतर श्रीरामाचा राज्याभिषेक झाला.राम आणि सीता राजा राणी म्हणून अयोध्येवर राज्य करू लागले. त्यावेळी एका नागरिकाने घेतलेल्या संशया वरून श्रीरामने सीतेचा त्याग केला, लक्ष्मणाने पवित्र, निरपराध सीतेला दूर वनात सोडून दिले.
भदोही जिल्ह्यातील हेच ते ठिकाण आहे जेथे सितामातेने दुसरा कठोर वनवास एकटीने भोगला. येथेच वाल्मिक ऋषिंनी सीतेला आपल्या आश्रमात आश्रय दिला. येथेच सितेने लव आणि कुश यांना जन्म दिला. वाल्मिक ऋषिच्या आश्रमात लव-कुश लहानाचे मोठे झाले. वाल्मिक ऋषिनीच त्यांना वेदांचे आणि धनुर्विद्या यांचे शिक्षण दिले. त्याच वेळी अयोध्येत सार्वभौम होण्यासाठी श्रीरामने अश्वमेघ यज्ञाचे आयोजन केले. अश्वमेघ यज्ञाचा घोडा जेव्हा येथे वाल्मीकिच्या आश्रमाजवळ आला तेव्हा लव-कुशानी तो घोडा पकडला. एवढेच नाही तर या घोड्याचे रक्षण करणार्या हनुमानाला त्यांनी बंदी बनविले आणि आपल्या माते समोर म्हणजे सीतेसमोर आणले.
हे जेंव्हा अयोध्यापती श्रीरामांना समजले तेव्हा ते स्वत: येथे आले. लव-कुश, सीता आणि श्रीराम यांची भेट झाली. त्यानंतर अयोध्येला परत न जाता सीता देवीने धरणी मातेला आपल्या कुशीत घेण्याची प्रार्थना केली आणि धरणीमातेने देखील सीता देवीला आपल्यात सामावून घेतले. जामिनीतून जन्मलेली सीता पुन्हा धरणी मध्ये समाहित झाली. हा संपूर्ण प्रसंग येथे घडला अशी मान्यता आहे. या ठिकाणी सीता मातेचे अतिशय सुंदर आणि भव्य मंदिर आहे.
वाल्मीकि आश्रम
सीता समाहिता स्थला पासून जवळच वाल्मिक ऋषिचा आश्रम आहे. येथे लव-कुश यांच्या बाल मूर्ती आहेत. आश्रमाच्या प्रवेशद्वाररावर लव आणि कुश यांनी हनुमानाला दोरीने बांधले असून जवळच अश्वमेघाचा अश्व त्यांनी पकडला आहे अशा प्रतिमा आहेत.
भदोही हा उत्तर प्रदेशातील एक जिल्हा आहे. ज्ञानपुर हे या जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण आहे. प्रयागराज आणि वाराणशी यांच्या मध्ये हे ठिकाण आहे. भदोही पेक्षा सीतामढ़ी म्हनुनच हे ठिकाण अधिक प्रसिद्ध आहे. वाल्मीकि रामायण आणि तुलसीदास यांच्या कवितावली यांत या स्थानाचे सविस्तर वर्णन केलेले आहे.
आपल्या दुसर्या वनवासात सीता मातेने येथे अनेक कष्ट भोगले. जनक राजाची राजकन्या आणि साक्षांत भगवान श्रीरामाची अर्धांगिनी, स्वत:ही साक्षांत लक्ष्मीचे रूप असलेल्या सीतेला एवढे कष्ट भोगावे लागले.असंख्य अडचणी आणि त्रास सहन करावा लागला पण तिने ते तक्रार न करता भोगले. केवढा मोठा धडा सीतामाईने जगाला दिला. उगाच नाही सीतेला जगत्जननी म्हणत!
सीता केश वाटिका
लव कुश आणि सीता माता येथे राहिल्याच्या अनेक खुणा येथे पहायला मिळतात. या भागात विशिष्ट प्रकारचे गवत उगवते. जे दुसरीकडे कुठेही पहायला मिळत नाही. या वैशिष्ट्यपूर्ण गवताची एक अतिशय सुंदर बाग येथे विकसित करण्यात आली आहे. या वाटिकेला सीता केश वाटिका असे म्हणतात.
एकशे दहा फुट उंच हनुमान
या ठिकाणचे दुसरे प्रमुख आकर्षण म्हणजे येथील अतिशय विशाल, भव्य हनुमान मूर्ती. लव-कुश यांनी येथे बजरंगबलीला बंदी बनविले होते या घटनेचा आधार घेवून जगातील सर्वांत उंच हनुमान मूर्ती येथे तयार करण्यात आली आहे.
मंदिर परिसरात प्रवेश केल्याबरोबर दुरूनच ११० फुट उंचीची हनुमान मूर्ती भाविकांचे लक्ष्य वेधून घेते. या परिसरातील ही सर्वांत उंच हनुमान मूर्ती आहे असे म्हणतात. या उंच हनुमान मूर्ती खाली असलेल्या मोठ मोठ्या दगडाखाली एक भुयार आहे. या भुयारात हनुमानाचे मंदिर आहे. सगळा परिसर अतिशय वेल डेव्हलप केलेला आहे. या भुयारातील हनुमान मंदिर देखील सुंदर टाइल्स लावून सुशोभित केलेले आहे. मन प्रसन्न करणारे वातावरण येथे अनुभवता येते.
जवळच भगवान शंकराची मूर्ती आणि उंच पायर्यांवर पाण्याचा मोठा कृत्रिम धबधबा तयार केलेला आहे. येथे सतत पाणी वाहत असते. येथून थोड्या अंतरावर सीतेचे अतिशय सुदंर आणि भव्य दुमजली मंदिर आहे. मंदिरा भोवती मोठा जलाशय आणि त्याच्या कडेला चारीबाजूंनी घनदाट झाड़ी.अतिशय निसर्गरम्य असे हे स्थान आहे.
मंदिर संगमरवरी आहे. भव्य आहे. मंदिरातील भिंतीवर श्रीराम आणि सीता यांच्या जीवनात घडलेले रामायणातील जवळ जवळ सर्व प्रसंग मधुबनी पद्धतीच्या पेंटिंगने चित्रित केले आहेत. मंदिराच्या वरच्या मजल्यावर सीतेचे राजसी रूप साकारलेले आहे.
मंदिराच्या खालच्या मजल्यावर किंवा तळघरात धरणीच्या कुशीत जाणारी सीता मातेची संगमरवरी मूर्ती आहे. हे ठिकाण असे आहे येथे एक दोन मिनिट शांत उभं राहिल्यावर सीता मातेचे सर्व चरित्र आठवते आणि सीतादेवी याच ठिकाणी धरणीच्या कुशीत गेली या विचाराने अंगावर शहारे आणि डोळयात अश्रु येतात. मन भारावून जाते.आपण जणू त्या क्षणांचे साक्षीदार होतो.
भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती कै. शंकर दयाळ शर्मा यांच्या पत्नी कै. विमलजी शर्मा यांच्या हस्ते १९९७ मध्ये या सीता समाहिता मंदिराचे लोकार्पण करण्यात आले होते.
https://twitter.com/uptourismgov/status/1156087829807525888?s=20
– विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७
Ramayan Yatra Sita Samahita Temple Bhadohi by Vijay Golesar