इंडिया दर्पण विशेष लेखमाला
रामायण यात्रा दर्शन (भाग २४)
श्रीलंका पर्यटन मंत्रालय संशोधित
||अशी आहे रावणाची लंका||
रामायणा मध्ये लिहिलेल्या राम वनगमन मार्गाचे संशोधन करून ज्या ज्या ठिकाणी श्रीराम गेले त्या स्थानांचा शोध लावण्यात आला आहे. भारतात तर अयोध्ये पासून रामेश्वरम पर्यंत अनेक ठिकाणं सापडली आहेत. वाल्मीकि रामायणात केलेले वर्णन आणि ही स्थान यांचा मेळ बसला आहे. परंतु रावणाने सीतेचे हरण करून तिला विमानातून लंकेत नेले, अशोक वाटिकेत बंदी बनवून ठेवले हे समजल्यावर श्रीराम- लक्ष्मण आणि प्रचंड मोठी वानरसेना लंकेला गेली. त्यावेळी त्यांच्या मार्गात येणाऱ्या सागरावर ‘रामसेतू’ उभारला आणि लंकेत जावून रावणाशी युद्ध देखील केले.
अनेक विद्वान आणि इतिहास संशोधक यांनी प्रत्यक्ष श्रीलंकेत जावून रामायणातील युध्दाशी संबंधित ठिकाणांचा शोध लावला. मूळ रामायणातील माहिती नुसार ही स्थाने सापडली देखील आहेत. श्रीलंकेच्या ९ प्रांतात ५० ठिकाणं रामायणाशी निगडीत आहेत. यातील काही स्थानांचा परिचय ‘इंडिया दर्पण’च्या रामायण यात्रा दर्शन या विशेष मालिकेत प्रथमच मराठीतून करुन देण्यात येत आहे.
श्रीलंका इंटरनॅशनल रामायण रिसर्च सेंटर आणि श्रीलंका पर्यटन मंत्रालय यांनी श्रीलंकेत रामायणा काळाशी संबंधित ५० ठिकाण शोधली आहेत. रामायणात उल्लेख असलेली ही ठिकाण पुरातत्व वेत्ते आणि इतिहास तज्ञ यांनी देखील खरी असल्याचे सांगीतले आहे.
श्रीलंकेत जेथे रावणाची सोन्याची लंका होती ; अशोक वाटिका जेथे रावणाने सीतेला लपवून ठेवले होते. राम रावण यांचे युद्ध झाले ती भूमी, रावणाची जमिनी खाली ८०० फूटावर असलेली गुफा, रावणाची चार विमानतळं, रावणाचा अभेदय ९०० खोल्यांचा महाल एवढच नाही तर रावणाचे शव देखील सापडले असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही सर्व ठिकाणं आता पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. यातील बहुतेक स्थान श्रीलंकेच्या मध्यभागी असलेल्या नुवारा एलिया या शहराजवळच आहेत.
रामबोडा पर्वत : राम-रावण युद्धातील रामाचे सैन्य तळ!
श्रीलंकेच्या मध्यभागात ‘नुवारा एलिया’ नावाच्या श्रीलंकेतील सुप्रसिद्ध हिल स्टेशन जवळ रामायणाशी संबंधित अनेक ठिकाण आहेत. याठिकाणी ‘अशोक वाटिका’, ‘रावण गुफा’, ‘रावण वाटरफ़ॉल’, ‘हनुमानाची पावलं’, ‘रावणपुत्र इंद्रजीत उर्फ मेघनाद याचे तपश्चर्या स्थळ तसेच राम-रावण युध्दाशी संबंधित अनेक ठिकाणं सापडली आहेत.
आपल्या कडच्या सिमला सारखे ‘नुवारा एलिया’ हे श्रीलंकेतील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. समुद्रसपाटी पासून ६००० फुटांपेक्षा उंच पर्वतावर ते वसलेले आहे. श्रीलंकेतील याच परिसरात रामबोड़ा नावाचा पर्वत प्रसिद्ध आहे. सीता मातेचा शोध घेत सर्वप्रथम जेंव्हा हनुमान लंकेत आले ते प्रथम याच पर्वतावर उतरले होते असे मानले जाते.
या ठिकाणी एका प्रचंड खड्कावर भली मोठी पावलं उमटलेली आहेत. ही पावलं हनुमानजींची आहेत असे सांगितले जाते. चिन्मय मिशन या धार्मिक संस्थेने या पर्वतावर हनुमानाचे मोठे सुबक मंदिर बांधले असून सुमारे 18 फूट उंचीची हनुमान मूर्ती या मंदिरात स्थापन केलेली आहे. अशोक वाटिके पासून हे ठिकाण सुमारे ३८ किमी अंतरावर आहे.
रावण बोडा पर्वत रावण बोडा पर्वत रावणाची सैन्य भूमी
राम रावण यांचे युद्ध झाले तो सर्व प्रदेश मोठ मोठया पर्वतांनी मिळून तयार झालेला आहे. श्रीराम व लक्ष्मण आपल्या वानर सेने सह लंकेत आले ते प्रवास करत एका पर्वतावर पोहोचले तेथेच त्यांनी आपला डेरा टाकला या पर्वताला नंतर ‘रामबोडा’ असे नाव पडले.
रावणाने आपले सर्व सैनिक रामबोडा पर्वताच्या समोर असलेल्या पर्वतावर जमा केले रावणाचे सैन्य ज्या पर्वतावर होते त्या पर्वताला ‘रावण बोडा’ पर्वत असे म्हणतात
रामबोडा आणि रावणबोडा हे दोन्ही पर्वत जरी एकमेकां समोर असले तरी एका पर्वतावरून दुसऱ्या पर्वतावर सहजगत्या जाता येत नाही कारण या दोन्ही पर्वताच्या मध्ये महावेली गंगा नदीचे विशाल नदी पात्र आहे. राम-रावण युध्दाचा प्रारंभ याच ठिकाणी झाला. रावणबोडा पर्वतावर रावणाने आपल्या मायावी शक्तीने अनेक मोठ मोठया गुहा आणि अदृश्य बोगदे तयार करून सर्व सैन्य त्या बोगद्यात लपवून ठेवले. अनेक दिवस राक्णाच्या सेनेने मायावी युद्ध केले. विशेष म्हणजे रावणबोडा पर्वताकडे दुरून पाहिल्यावर जणू हनुमान निद्रिस्त झाल्या सारखे दिसतात. असं येथे आल्यावर दाखविले जाते.
मंदोदरीचा भव्य महाल
वाल्मिकी रामायणात श्रीराम, सीता व हनुमान यांच्या संबंधातील लंकेतील अनेक स्थानांचे वर्णन आहे. श्रीलंकेत गुरुलूपोधा नावाचे ठिकाण ‘नुवारा एलिया’ पासून सुमारे १०५ किमी तर कॅन्डी पासून ६५ किमी अंतरावर हे स्थान आहे. येथे ‘सीता कोटुवा’ नावाचे स्थान आहे ‘उवा ‘प्रांताच्या घनदाट जंगला ‘गुरुलू पोधा ‘नावाचे गाव आहे. या ठिकाणी रावणांची पत्नी मंदोदरी हिचा महाल होता तसेच रावणाच्या चार विमानतळांपैकी ‘गुरुलूपोथा’ हे एक विमानतळ देखील होते.
सीतेचे पंचवटीतून हरण केल्यानंतर रावण थेट’ गुरुलूपोथा’ येथे आपल्या विमानाने आला. त्याने सीतेला मंदोदरीच्या महालात ठेवले.
मंदोदरीने रावणाला सांगितले, ” तुम्ही साक्षांत महालक्ष्मीला आणले आहे. ती रामची पत्नी आहे. तिला परत पाठवा अन्यथा लंकेचा सर्वनाश अटळ आहे. श्रीराम क्षमाशिल आहेत. ते तुम्हाला क्षमा करतील, परंतु अहंकारी रावणाने तिचे ऐकले नाही.सीतेला काही दिवस मंदोदरीच्या महालात ठेवल्यावर रावणाने सीतेला अशोक वाटिकत शिफ्ट केले. गुरुलुपौधा गावापासून दीड किमी अंतरावर मंदोदरीचा महाल आहे. महालाच्या चारी दिशांना घनदाट जंगल आहे. या खंडहरच्या दक्षिणेला ५० पायऱ्या आहेत. त्याच्या खालच्या बाजूने एक नदी वाहते. तेथे सीता स्नान करीत असे सांगितले जाते.
अभेद्य पहाडावरील रावणाचा महाल
श्रीलंकेतील सिगिरिया नावाच्या ठिकाणी एका उंच डोंगरावरील अति विशाल कातळावर रावणाचा महाल होता. नुवारा एसीया पासून सिगिरिया सुमारे दोनशे किमी अंतरावर आहे. रावणाचं साम्राज्य श्रीलंकेत बदुल्ला, अनुराधापुरा, कॅन्डी, पोलोन्नुरुवा पासून नुवारा एलिया पर्यंत पसरलेले होते. रावण स्वतः सिगिरिया येथे रहात होता. सिगिरियाचा हा महाल देखील कुबेराने बनविला होता असे म्हणतात.
आजही सिगिरिया येथील पर्वतावरील दंगडी पहाडावर एका विशाल महालाचे अवशेष आणि खुणा पहायला मिळतात. भक्कम तटबंदी, पायऱ्या पायऱ्यांचे बगीचे, अनेक तलाव, पाण्याचे ओहोळ, अनेक कुंड, पाण्याचे कारंजे यांचे अवशेष आहेत. येथे रावणाची वैयक्तिक विमानं उतरत असत.
सुरुवातीचे काही दिवस रावणाने सितेला येथे ठेवले होते नंतर दुसरी कडे शिफ्ट केले. या महालाचे वैशिष्ट्ये म्हणजे एवढ्या उंचावरही पाण्याचे भरपूर साठे होते. आज आठ नऊ हजार वर्षांनंतरही पाण्याने भरलेले तलाव येथे पहायला मिळतात. रावणाच्या महालात त्याच्या सर्व राण्यांसाठी वेगवेगळे महाल आणि बागा तयार केलेल्या होत्या. रावणाचा महाल ९०० खोल्यांचा होता असे म्हणतात. हा सर्व परिसर आजही घनदाट झाडी आणि जंगलांनी व्यापलेला आहे. त्यावेळी येथे किती दाट अरण्य असेल आणि हा परिसर किती दुर्गम असेल याची कल्पनाही करवत नाही.
रावणाच्या या महालात एक हजार पाय-यांवर एक मोठा हॉल होता. तेथे जाण्यासाठी लिफ्ट होती. असे म्हणतात आणि ते खरेही असेल. ज्या रावणाकड़े विमानं होती . त्याच्याकडे लिफ्ट देखील असेलच की! या महालात अनेक गुप्त गुफा होत्या. यातीलच एका गुफेत सीतेला ठेवले होते. गुफाच्या भिंतीवर त्यावेळची रामायण युगातली चित्र आजही चमकताना दिसतात.
विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७
Ramayan Yatra Part24 Srilanka Ravan Mahal by Vijay Golesar