रामायण यात्रा दर्शन (भाग -२२)
साक्षात श्रीरामाने स्थापन केलेले
||रामेश्वरमचे शिवलिंग||
रामायणात हंपीचा उल्लेख वानरांचे राज्य किष्किंधा राज्याची राजधानी म्हणून आला आहे. मलय पर्वत अन चंदनाची वने पार करत श्रीराम व लक्ष्मण ऋष्यमुक पर्वताकडे गेले. ह्या ठिकाणी त्यांची हनुमान व सुग्रीवाशी भेट झाली. हनुमान आणि सुग्रीवला भेटल्यानंतर श्रीरामांनी सेना जमवली आणि त्यांनी लंकेकडे प्रस्थान केले. मलय पर्वत, चंदन वन, अनेक नद्या , धबधबे आणि वने पार केल्यानंतर श्रीराम व त्यांच्या सेनेने समुद्राकडे प्रस्थान केले.
श्रीरामांनी त्यांच्या सेनेला कोडीकरई येथे एकत्रित केले. कोडीकरई हे ठिकाण वेलंकनीच्या दक्षिणेला आहे. ह्या गावाच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला पाल्क स्ट्रीट आहे. ह्या ठिकाणी आल्यानंतर श्रीराम व त्यांच्या सेनेच्या असे लक्षात आले की ह्या ठिकाणहून समुद्र ओलांडून जाणे शक्य नाही आणि येथे पूल सुद्धा बांधला जाऊ शकत नाही म्हणूनच श्रीराम त्यांच्या सेनेसह रामेश्वरमला गेले.
रामेश्वरमला समुद्र शांत आहे. म्हणूनच येथे पूल बांधणे किंवा इथून समुद्र ओलांडणे सोपे होते. वाल्मिकी रामायणानुसार श्रीरामांनी तीन दिवस शोध घेतल्यानंतर त्यांना रामेश्वरमच्या पुढे समुद्रात असे स्थान सापडले जिथून लंकेला जाणे सोपे होते. त्यांनी नल व नीलच्या मदतीने लंकेपर्यंत पूल बांधला. छेदुकराई तसेच रामेश्वरांच्या आजूबाजूला ह्या घटनेच्या संदर्भातील अनेक स्मृतिचिन्हे आजही आहेत. येथील नाविक धनुषकोडीहुन लोकांना रामसेतूचे अवशेष आजही दाखवयाला नेतात. ह्या ठिकाणी समुद्राची खोली नदीइतकीच आहे आणि काही काही ठिकाणी तळ दिसतो.
खरे तर येथे एक पूल बुडाला आहे. १८६० मध्ये हा पूल स्पष्ट दिसला आणि तो हटवण्यासाटी अनेक प्रयत्न केले गेले. इंग्रज लोक ह्या पुलाला ऍडम ब्रिज म्हणत असत म्हणून ह्या ठिकाणी हेच नाव प्रचलित झाले. ३० मैल लांब आणि सव्वा मैल रुंद असा हा रामसेतू ५ ते ३० फूट पाण्यात बुडाला आहे. श्रीलंका सरकारला ह्या बुडालेल्या पुलावर भू मार्ग तयार करण्याची इच्छा आहे तर भारत सरकारला नौवहनासाठी सेतुसमुद्रम हा प्रोजेक्ट तयार करायचा आहे.
तामिळनाडूच्या रामनाथपुरममध्ये स्थित रामेश्वरम ज्योतिर्लिंग हिंदू धर्मात एक विशेष स्थान आहे. येथे स्थापन केलेले शिवलिंग बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याचे मानले जाते. रामेश्वरम हे एक सुंदर बेट आहे जे चेन्नईपासून 425 मैल दक्षिण-पूर्वेला आहे, ज्याच्या सभोवताल हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर आहे. प्राचीन काळी हे बेट थेट भारताशी जोडलेले होते. नंतर, हळूहळू समुद्राच्या मजबूत लाटांनी तो कापला, ज्यामुळे हे बेट चारही बाजूंनी पाण्याने वेढले गेले. मग ब्रिटिशांनी एका जर्मन अभियंत्याच्या मदतीने रामेश्वरमला जोडण्यासाठी रेल्वे पूल बांधला.
रामायणातील कथा
दक्षिणेकडील रामेश्वरम मंदिर जितके प्रसिद्ध आहे तितकेच त्याला दीर्घ इतिहास आहे. असे म्हटले जाते की जेव्हा भगवान श्रीराम रावणाचा वध करून आणि सीतेला कैदेतून मुक्त करून अयोध्येला जात होते, तेव्हा त्यांनी वाटेत गन्धमादन पर्वतावर थांबून विश्रांती घेतली. त्यांच्या आगमनाची बातमी ऐकून ऋषी-महर्षी त्यांचे दर्शन घेण्यासाठी तेथे पोहोचले. ऋषींनी त्याला आठवण करून दिली की त्याने पुलस्त्य कुळाचा नाश केला आहे, ज्यामुळे त्याच्यावर ब्रह्महत्येचे पातक लागले आहे. पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी ऋषींच्या विनंतीवरून श्री रामाने ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी हनुमानाला कैलास पर्वतावर जाण्याची आणि शिवलिंग आणण्याची विनंती केली, परंतु शिवलिंगाच्या स्थापनेची निश्चित वेळ जवळ येईपर्यंत हनुमान परत येऊ शकला नाही. त्यानंतर सीताजींनी त्यांच्या मुठीत समुद्र किनाऱ्याची वाळू बांधून शिवलिंग बनवले. श्रीराम प्रसन्न झाले आणि त्यांनी या वाळूचे शिवलिंग स्थापित केले. या शिवलिंगाला रामनाथ म्हणतात. नंतर हनुमानाच्या आगमनानंतर त्यांनी आणलेले शिवलिंग त्याच्यासोबत स्थापित करण्यात आले. भगवान रामांनी या लिंगाला हनुमंदीश्वर असे नाव दिले.
रामेश्वर मंदिराची रचना
रामेश्वरम मंदिर भारतीय वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिर एक हजार फूट लांब, साडेसहा फूट रुंद आहे. चाळीस फूट उंचीच्या दोन दगडांवर, चाळीस फूट लांब एक दगड इतक्या नाजूकपणे ठेवण्यात आला आहे की भाविक चकित होतात. हे मंदिर विशाल दगडांनी बांधलेले आहे. असे मानले जाते की हे दगड श्रीलंकेमधून बोटींवर आणले गेले होते.
रामेश्वरम ज्योतिर्लिंग: तमिलनाडु में भगवान राम द्वारा स्थापित होने के कारण ही इस ज्योतिर्लिंग को रामेश्वरम कहा गया है। भगवान श्री रामनाथस्वामी को मुख्य रुप से शिवलिंग के रुप में पूजा जाता है। pic.twitter.com/EuG8DplH8i
— डीडी न्यूज़ (@DDNewsHindi) November 3, 2021
भव्य मंदिर
हे मंदिर प्रचंड असून विस्तार आणि भव्यता यांच्या संदर्भात त्याच्याशी बरोबरी करणारे दुसरे मंदिर भारतात नाही. मंदिर द्राविड शिल्पपद्धतीने बांधलेले आहे. मंदिराचे क्षेत्रफळ १५ एकर भूमी एवढे आहे. मंदिराचे आवार उत्तुंग भिंतींनी बंदिस्त आहे. या आवाराची पूर्व-पश्चिम लांबी ८२५ फूट आणि दक्षिणोत्तर रुंदी ६५७ फूट आहे.
मंदिराच्या चारही बाजूंना चार गोपुरे आहेत. त्यांपैकी पूर्वद्वारावरील गोपुराला दहा माळे (मजले) असून, पश्चिम द्वारावरील गोपुराला सात माळे (मजले) आहेत. चारही गोपुरांवर असंख्य मूर्ती कोरलेल्या आहेत. आतील मंदिरात तीन विस्तीर्ण दालने असून ती भव्य स्तंभांच्या रांगांनी विभागलेली आहेत. या दालनांची उंची इतकी आहे की, देवाच्या उत्सवमूर्तीच्या मिरवणुकीतील हत्ती अंबारीसह चालला, तरी छताच्या हंड्या-झुंबरे, दिवे यांना अंबारीचा धक्काही लागत नाही. प्रत्येक दालनाची लांबी ४०० फूट असून, रुंदी १७ ते २१ फूट आहे. या दालनांच्या घडणीत वापरलेल्या अनेक शिळा चाळीस-चाळीस फूट लांबीच्या आहेत.’
हे मंदिर व त्याच्या परिसरातील लहान-मोठी मंदिरे द्राविड वास्तुशिल्पशैलीत, पूर्व-पश्चिम २५१·५ मी. लांब व दक्षिणोत्तर २०० मी. रुंद अशा सहा उंच प्राकारांत ग्रॅनाइट व वालुकाश्मात बांधली आहेत. यांतील रामेश्वरम् (रामलिंगस्वामी) मंदिर हे भव्यता व विस्तार दृष्टींनी अद्वितीय आहे. मंदिराच्या चारी दिशांना भव्य व उंच गोपुरे पूर्णतः वालुकाश्मात बांधली असून त्यांतील दोन ३८·४ मी. उंच व जास्तीतजास्त दहा मजल्यांची आहेत. गोपुरांवर मूर्तिकाम असून मुख्य मंदिर गर्भगृह, रंगमंडप व सभागृह अशा तीन स्वतंत्र दालनांत विभागले आहे. भिंतींना लागून शिल्पपट्ट आहेत.
येथील मूर्तिकामात भव्यता आहे. पौराणिक प्रतिमांव्यतिरिक्त नृत्यांगना व प्राणी यांची शिल्पे आहेत. उंच व एकसंध दगडी स्तंभावर छत असून रामेश्वरम् लिंगासमोर सुमारे ४ मी. उंचीची नंदीमूर्ती आहे. नंदी जवळ सोन्याच्या पत्र्याच्या मढविलेला गरुडस्तंभ आहे. रामेश्वरम्-व्यतिरिक्त येथे पार्वती, षडानन, गणपती व काशीविश्वेश्वर या देवतांची तसेच सप्तमातृका, नवग्रह, विशालाक्षी, अन्नपूर्णा, नंदिकेश्वर या उपदेवतांची मंदिरे आढळतात.
येथील बहुसंख्य मंदिरे रामनाडच्या पाळेगार सेतुपती घराण्याने बांधली आहेत. त्यांची बांधणी पंधराव्या ते सतराव्या शतकांमध्ये प्रामुख्याने झाली. उदयन सेतुपतीने मूळ मंदिर परराज शेखर या लंकाधिपतीच्या साहाय्याने १४१४ मध्ये बांधले. पुढे याच घराण्यातील सेतुपतींनी त्यात भर घातली. देवस्थानच्या पूजे अर्चेसाठी त्यांनी अग्रहार दिले असून पहिल्या पूजेचा मान या घराण्याकडे आहे. याविषयीचे अनेक शिलालेख मंदिरांत असून काही ताम्रपट उपलब्ध आहेत. येथील उपाध्ये महाराष्ट्रीय ब्राह्मण आहेत.
24 विहिरींचे विशेष महत्त्व
श्री रामेश्वरममध्ये 24 विहिरी आहेत, ज्यांना ‘तीर्थ’ असे संबोधले जाते. असे मानले जाते की या विहिरींच्या पाण्यात स्नान केल्याने व्यक्ती त्याच्या सर्व पापांपासून मुक्त होते. येथील पाणी गोड असल्याने भक्तही ते पितात. मंदिर परिसरातील विहिरींच्या संबंधात, असे मानले जाते की या विहिरी भगवान श्री राम यांनी त्यांच्या अबाधित बाणांनी तयार केल्या होत्या. त्याने अनेक तीर्थक्षेत्रांचे पाणी मागितले होते आणि ते त्या विहिरींमध्ये सोडले होते, त्यामुळे त्या विहिरींना आजही तीर्थक्षेत्र म्हटले जाते.
येथील धार्मिक स्थळांशी हनुमंताचे लंकेला उड्डाण, सेतुबंधन, सीतेचे अग्निदिव्य इ. रामायणातील कथांचा संबंध जोडला जातो. बेटावर सु. २२ तीर्थे असून त्यांपैकी राम, लक्ष्मण, सीता, अग्नी, माधव, गंधमादन, नील तसेच जटा तीर्थ, विल्लूरणी तीर्थ, भैरव तीर्थ ही प्रमुख आहेत. यांशिवाय रामझरोखा (टेकडीवरील मंदिर), साक्षी विनायक, एकांत राम मंदिर, नवनायकी अम्मन मंदिर, कोदंडरामस्वामी मंदिर इ. ठिकाणांनाही धार्मिक महत्त्व आहे. येथे महाशिवरात्र, वैशाखी पौर्णिमा या दिवशी मोठे उत्सव होत असून वसंतोत्सव, नवरात्र व आषाढातील आदी अमावासई (अमावास्या) इ. उत्सवही साजरे होतात. पर्यटकांसाठी येथे धर्मशाळादी सुविधा उपलब्ध आहेत.
कसे पोहोचायचे
मदुराई विमानतळ रामेश्वरमपासून 154 किमी अंतरावर आहे. रामेश्वरम रेल्वे स्टेशन देशातील विविध शहरांशी चांगले जोडलेले आहे. मुंबई येथून थेट गाड्या चालतात.
-विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७
Ramayan Yatra Part22 Rameshvaram Jyotirling by Vijay Golesar