इंडिया दर्पण विशेष लेखमाला
रामायण यात्रा दर्शन (भाग – २०)
लंकेकड़े कूच करण्यापूर्वी
श्रीराम सेनेचा पहिला मुक्काम
|| दशरथ रामेश्वर मंदिर ||
माल्यावंत पर्वतावरील गुहेत चार महिने राहिल्या नंतर पावसाळा कमी होताच श्रीराम वानर सेना घेऊन लंकेकडे निघाले. “किष्किंधा’ या नगरी पासून सुमारे 863 किमी अंतर चालून ‘कोडी कराई’ येथे श्रीरामाची वानरसेना गेली. येथे श्रीरामाने सर्वप्रथम मोठ्या संख्येने वानर सेनेने संगठण केले. या मोठ्या प्रवासात श्रीराम व लक्ष्मण यांनी आपल्या असंख्य वानरसेने सोबत अनेक ठिकाणी मुक्काम केले. या प्रवासातील पहिले पडावाचे ठिकाण होते दशरथ रामेश्वर मंदिर.
शेवटचे गाव
किष्किंधा उर्फ हंपी पासून जवळच असलेल्या ‘हिरियर’ आणि ‘होसदुर्ग’ पासून हे ठिकाण 30 किमी अंतरावर तर ‘चित्रदुर्ग’ या ऐतिहासिक शहरापासून ९० किमी अंतरावर दशरथ रामेश्वर हे पवित्र स्थान आहे. दोन उंच पर्वतांच्या मध्यभागी दशरथ रामेश्वर हे स्थान वसले आहे. या भागातले हे शेवटचे गाव आहे. येथून पुढे रस्ताच नाहीये. स्थानानंतर मोठ मोठे डोंगर दरयाआणि घनदाट जंगल सुरु होते. दशरथ रामेश्वर येथे दर्शन घेऊन पुन्हा आलेल्या मार्गानेच यूटर्न घेउन परत फिरावे लागते.
दशरथ रामेश्वर मंदिर परिसरात प्रवेश करताच एक नक्षीदार लाकडी रथ आपले लक्ष वेधून घेतो. महाशिवरात्री आणि इतर उत्सव काळात याच रथातून भगवान शंकरांची मिरवणूक काढली जाते. मंदिराच्या सुरुवातीच्या भागातच पाण्याचा एक मोठा ओढा किंवा पाण्याचा प्रवाह आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना पायर्या व घाट बांधलेले आहेत. हा सर्व परिसर हिरव्यागार घनदाट झाडींनी शोभिवंत झालेला दिसतो. येथे सर्वत्र मनःशांती आणि शांतता अनुभवता येते. येथील श्रीराम वन गमन मार्ग दशरथ रामेश्वर या बोर्ड जवळच मंदिराची कमान आहे. येथे अनेक नवीन आणि जुन्या धर्मशाळा आहेत. अनेक प्राचीन मंदिरंही या परिसरात आहेत.
रामायण काळातील महत्वाचे स्थान असलेल्या दशरथ रामेश्वर या स्थानाचे महत्व रामजन्मा आधीच्या एका घटनेशी जोडलेले आहे.
श्रीरामाच्या जन्मा पूर्वी अयोध्येचे महाराज राजा दशरथ यांनी सरयु नदीच्या काठी शब्दवेधी बाण सोडल्याने एका मातृपितृभक्त असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्याचे नाव होते श्रवण कुमार किंवा श्रावण बाळ. श्रवणकुमार आपल्या अंध व वृद्ध मातापित्यांना कावाडीत बसवून तीर्थयात्रा करायला निघाला होता. पण मध्येच दशरथ राजाच्या बाणाने त्याचा मृत्यू झाला. श्रवणकुमारचा मृत्यू झाल्याचे दशरथ राजाकडून समजल्यावर त्याच्या अंध व वृद्ध माता पित्याने मुलाच्या वियोगाने देहत्याग केला. परंतु मरण्यापूर्वी त्यांनी दशरथ राजाला शाप दिला.
‘ हे राजा, जसे आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगाने मृत्यू पावतो आहोत तसा तू देखील तुझ्या पुत्रांच्या वियोगाने मरण पावशील.’
या घटनेचा फार मोठा मानसिक धक्का दशरथ राजाला बसला होता. राजा दशरथ जेंव्हा दक्षिण भारतात तीर्थयात्रा करायला निघाला होता तेव्हाही श्रवण कुमारच्या आक्रोश करणाऱ्या माता पित्यांचा शाप त्याला सतत भेडसावत होता. त्यावेळी वसिष्ठ ऋषी आणि इतर जेष्ठ गुरुजनांनी दशरथ राजाला सांगितले, ‘हे राजन, शोकाकूल ब्राह्मणांचा शाप तर कधीच वाया जाणार नाही मात्र भगवान शंकराची आराधना केली तर त्या शापाची तीव्रता थोडी कमी होऊ शकेल.’
वसिष्ठ ऋषींच्या सांगण्यानुसार दशरथ राजाने येथील गुफेत शिवलिंगाची स्थापना करून भगवान शिवाची आराधना केली. आणि आपण केलेल्या चुकीचे प्रायश्चित घेण्याचा प्रयत्न केला. हे तेच ठिकाण आहे जेथे भगवान श्रीराम लंकेला जातांना आले होते. पावसाळ्याचे चारमहिने माल्यवंत पर्वतातील गुहेत घालविल्या नंतर श्रीरामाने वानरसेनेचे गठन केले आणि लंकेवर स्वारी करण्यासाठी ते माल्यवंत पर्वतावरू निघाले. हजार मैलांच्या या वाटचालीत त्यांचा पहिला पाडाव याच दशरथ रामेश्वर मंदिरात पडला होता. काय योगायोग असतो पहा. चाळीस पन्नास वर्षांपूर्वी राजा दशरथ राजाने ज्या गुहेत शिवलिंगाची स्थापना करून भगवान शिवाची आराधना केली होती. त्याच शिवलिंगाची पूजा दशरथ राजाच्या पुत्राने श्रीरामाने येथे केली.
दशरथ राजाने स्थापन केलेले शिवलिंग
मंदिर परिसरांत प्रवेश केल्यावर एका मोठ्या खडकावार एक विशाल वडाचे झाड दिसते. या वटवृक्षाने या डोंगर कडयाला आणि येथील गुहेला जणू आपल्या कवेत घेतलं आहे असे वाटते. काही पायऱ्या चढून गुफेच्या प्रवेशव्दाराशी पोहोचता येते. येथे गुफेच्या तोंडाशी लोखंडी ग्रीलचा दरवाजा बनविण्यात आला आहे. आत मध्ये भव्य गुफा आहे. या गुफेत मध्यभागी शिवलिंग आणि त्याच्या समोर नंदीची स्थापना करण्यात आलेली आहे. हे शिवलिंग दशरथ राजाने स्थापन केले होते म्हणून या स्थानाला ‘दशरथ रामेश्वर’ असे म्हणतात.
येथे श्रीरामांनी केला अभिषेक
श्रीरामाच्या वनवास गमन मार्गावर हे एकमेव मंदिर आहे जेथील शिवलिंगाची स्थापना रामाने नाही तर त्यांच्या पिताश्रींनी केली होती. वानरसेनेसह लंकेवर स्वारी साठी जातांना श्रीरामांनी याच गुहेतील शिवलिंगाची भक्तीभावाने पूजा केली आणि अभिषेक केला. आणि दशरथ राजाच्या आत्म्याला शांती मिळवून दिली.
या गुटेतील शिवलिंगा समोर बसल्यावर प्राचीन काळी साक्षात प्रभू रामचंद्र या ठिकाणी बसले होते आणि त्यांनी या शिवलिंगाची पूजा केली होती या विचाराने मन प्रसन्न होते अंगावर रोमांच उभे राहतात.
दशरथ रामेश्वरम येथील गुटेत शिवलिंग स्थापन करून आराधना केल्यामुळे राजा दशरथा ला मिळालेल्या शापाचा प्रभाव थोडा कमी झाला असे म्हणतात. चार पुत्राचा वियोग होण्या ऐवजी त्याला फक्त दोनच पुत्रांचा म्हणजे श्रीराम आणि लक्ष्मण यांचाच वियोग सहन करावा लागला. भरत आणि शत्रुघ्न तर त्याच्या जवळच राहिले होते ना?
रामायण काळातील दोन महान योध्दे राजा दशरथ आणि प्रभू श्रीराम या दोघांनी येथील शिवाची आराधना केली होती त्यामुळे या स्थानाचे महत्त्व अतिशय वाढलेले आहे.
स्थानिक भाविकांचे श्रद्धास्थान
आजही येथे हजारो भाविक श्रध्देने येतात.त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असा अनुभव आहे. या गुफे जवळच पाण्याचे नैसर्गिक कुंड आहे.या कुंडातील पाणी अतिशय स्वच्छ आणि शीतल आहे. याच कुंडातील पाण्याने श्रीरामाने येथील शिवलिंगाला अभिषेक केला होता.
स्थानिक लोकांची दशरथ रामेश्वरावर नितांत श्रद्धा आहे. नवविवाहित दम्पती येथे विवाहानंतर शिवाचा आशीर्वाद घेतात तर नवजात बालकांना देखील येथे दर्शनासाठी आणले जाते.
श्रवण कुमारचे एकमेव मंदिर
या परिसरात असंख्य वानरे आजही फिरतात. मंदिराच्या प्रवेशव्दारापाशी श्रवण कुमार आपल्या वृद्ध माता पित्यांना कावडीत बसवून तीर्थयात्रा घडवित असल्याची मूर्ती आहे. श्रवण कुमारचे असे मंदिर देशात एकमेव असावे. राम वन गमन मार्गावरील या स्थानाचे शासनाने नुकतेच नूतनीकरण केले आहे. प्रशस्त रस्ता आणि घाट येथे आहेत. मंदिरे हजार पंधराशे वर्षांपूर्वीची असली तरी व्यवस्थित आहे आणि इथली गुफा आणि शिवालिंग तर रामाच्या ही आधी पासून येथे आहे. त्यामुळेच रामायण काळातील दशरथ रामेश्चम मंदिराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. दशरथ राजाने स्थापन केलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेऊन श्रीराम आणि त्यांची वानरसेना पुढे लंकेकडे निघाली.
येथे जाणाऱ्यांसाठी महत्वाची सूचना –
दशरथ रामेश्वरम येथे रात्री निवासा साठी किंवा भोजनासाठी एकटी हॉटेल किंवा लॉज नाही. काही धर्मशाळा आहेत परंतु रात्रीचा मुक्काम करणे सुरक्षित नाही. मंदिराभोवती घनदाट झाडी असून हिंस्र प्राण्यांचा वावर होण्याची शक्यता वर्तविली जाते. त्यामुळे भाविक किंवा पर्यटक दिवसा उजेडीच या स्थानाचे दर्शन घेऊन पुन्हा ३० किमी वरील हिरियुर किंवा होसदुर्ग येथे जातात. येथून चित्रदुर्ग (90 किमी) अंतरावर आहे तेथे निवास व भोजनासाठी उत्तम व्यवस्था होवू शकते.
-विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७
Ramayan Yatra part20 Dshrath Rameshwar Temple By Vijay Golesar