इंडिया दर्पण विशेष लेखमाला
रामायण यात्रा दर्शन (भाग – १६)
सीतेचा शोध ऋषीमुख पर्वत, किष्किंधा
|| श्रीराम सुग्रीव भेट ||
पंपा सरोवरा पासून 2 किमी अंतरावर हनुमनहली गावा पासून स्थानिक लोकांनी तयार केलेला नदीवरील एक छोटा दगडांचा पूल ओलांडून ओहळ किंवा झरा पार करावा लागतो.पुढे डोंगरातली मातीची पाऊलवाट आहे. येथे तुंगभद्रा नदीच्या तटावर विजयनगर साम्राज्यातील दगडी अवशेष मोठ्या प्रमाणात विखुरलेले आहेत.डोंगरातील पाऊलवाट पार केली की तुंगभद्रा नदीचे विशाल पात्र गोल होडीतून ओलांडून ऋष्यमुख पर्वता जवळ जाता येते.
लहानसे टेकाड चढून गेल्यावर डोंगरांच्या आतल्या बाजूला एक मोठे पठार लागते. पठारावर सुरुवातीलाच एक विष्णु मंदिर आहे. मंदिराचा बाहेरील भाग हल्ली तयार केलेला आहे. मोठ मोठ्या दगडात मंदिर आहे. विष्णु मंदिरा समोर गाभार्यातील चौथरयावर एक चतुर्भुज हनुमान मूर्ती आहे. हनुमान हे भगवान शिवाचे अवतार आहेत हे आपणांस ठावूक आहे. परंतु हनुमानाची चार हात असलेली मूर्ती दुर्मिळच म्हणावी लागेल .हनुमानजीने चारी हातात शंख, चक्र, ग्रंथ आणि गदा धारण केलेली आहे.
ऋष्यमुख पर्वत म्हणजे एकच मोठा डोंगर नाहीये तर लहान लहान दगडी टैकडयांच्या समूहाला ऋष्यमुख पर्वत असे म्हणतात. येथे सर्वत्र लालसर नारंगी रंगाचे लहान- मोठे, अती मोठे दगड गोटे सर्वत्र नजर पोहोचेल तिथवर विखुरलेले दिसतात. ड्रोन मधून पाहिल्यावर दगडी गोट्यांच्या या पर्वतावून तुंगभद्रा नदी वाहतांना दिसते आणि तिच्या सभोवती हिरवी झाडे आणि शेत दूरवर पसरलेली दिसतात. येथे एक तलाव आहे त्याला ‘सीता सेरगू’ किंवा ‘सीता तलाव’ असे म्हणतात.
रावण सीतेला विमानातून या मार्गाने घेऊन जात असतंना सितेने आपल्या साडीच्या पदरात आपले काही दागिणे बांधून ती पोटली खाली टाकली. त्यावेळी या तलावात स्नान करीत असलेल्या हनुमानाच्या ओंजळीत ही दागिण्यांची पोटली पडली. पुढे श्रीरामाची भेट झाल्यावर हनुमानाने हे दागिणे श्रीरामाला दाखविले. हे दागिणे सीतेचेच असल्याचे श्रीरामांनी ओळखले. यामुळे रावणानेच सीतेचे हरण केले असून तो या मार्गानेच त्याच्या राज्यात म्हणजे लंकेत गेला असेल याची खात्री पटली. त्यामुळे पुढच्या सीताशोधाला एक दिशा मिळाली.
सीता तलावा जवळच एक विशाल चट्टान आहे. या चट्टान जवळ प्राचीन नृसिंह लक्ष्मी मंदिर आहे मंदिर अतिशय भव्य आणि सुस्थितीत आहे. पौराणिक ग्रंथानुसार भगवान विष्णुचा अवतार असलेले नृसिंह आणि माता लक्ष्मी यांचा विवाह येथे झाला होता असे मानले जाते.
येथे जवळच दगडाच्या टेकडीखाली सुग्रीव गुफा आहे ऋषीमुख पर्वत म्हणजे सर्वत्र विखुरलेले मोठमोठे दगड किंवा दरडी. हा सगळा परिसर ऋषीमुख पर्वत म्हणूनच ओळखला जातो. मातंग ऋषींच्या शापामुळे वाली ऋषीमुख पर्वतावर येऊ शकत नव्हता. युषी मुख पर्वताच्या जवळ आला तर तो मरेल असा शाप मतंग ऋषीने दिला होता. हे माहित असल्यामुळेच सुग्रीव आपल्या मंत्री गणासह या पर्वतावर लपून छपून राहत होता. याच ठिकाणी आहे- सुग्रीव
गुफा!
सुग्रीव गुफा मोठ मोठ्या अजस्त्र दगडां पासून बनलेली आहे. आजही ती रामायण काळात होती त्याच नैसर्गिक अवस्थेत आहे. याच ठिकाणी श्रीराम व लक्ष्मण सुग्रीव ला भेटले होते. या ठिकाणी साक्षात प्रभुरामचंद्र आले होते. राहिले होते या विचारानेच अंगावर रोमांच उभे राहतात. मन भरून येते. दोन विशाल खडकांच्या मधून गुफेत जाण्याचा रस्ता आहे. ही गुफा आतमध्ये भरपूर मोठी आहे. आठ ते दहा व्यक्ती येथे आरामात बसू शकतात.
गुफेच्या बाहेरच्या भिंतीवर राम लक्ष्मण यांची चित्रं कोरलेली आहेत. याच गुफेत श्रीराम आणि सुग्रीव यांची भेट झाली होती. रामायणा मध्ये श्रीराम सुग्रीव भेटीला खूप महत्त्व आहे. कारण येथूनच सीतेच्या शोधाची योग्य दिशा श्रीरामाला मिळाली होती.शिवाय हनुमानासारखा भक्त आणि हजारो वानरांची सेना त्याच्या मदतीसाठी सज्ज झाली होती. ही गुफा बरीच मोठी पण सरकारने तिचा मोठा भाग लोखंडी जाळया लावून बंद केला आहे.
‘डेटिंग द इरा ऑफ लॉर्ड रामा’ या पुष्कर भटनागर यांच्या शोध ग्रंथात रामायणाचा कालखंड सात ते आठ हजार वर्षापूर्वी होऊन गेल्याचे लिहिले आहे. या ग्रंथातील हिस्ट्रानॉमिकल संशोधना नुसार श्रीरामाचा जन्म इसवीसनापूर्वी 5114 वर्षापूर्वी झाला होता असे सांगितले जाते.
ऋष्यमुख पर्वत येथील सुग्रीव व वाली यांच्या गुफा आणि हा सगळा परिसर पाहिल्यावर रामायण ही कल्पित कथा नव्हती तर रामायणातील सर्व प्रसंग व घटना खरोख्रर घडल्या होत्या याची खात्री पटते.
दक्षिण किष्किंधा नगरी पासून दिड-दोन किमी अंतरावर दुर्गा देवीचे प्राचीन मंदिर आणि ‘वाली’ ची गुफा आहे. दुर्गादेवी मंदिर पहाडावर आहे. येथे खाजगी वाहन वर पर्यंत येवू शकतात. येथे पार्किंगची चांगली व्यवस्था उपलब्ध आहे. पार्किंग पासून 50-60 दगडी पायया चढून मंदिरा पर्यंत जाता येते. थोडया पाय-या चढल्यावर प्राचीन हनुमान मंदिर आहे .येथून दगडी प्रदेशदवारातून देवी मंदिरात प्रवेश करता येतो.
दुर्गामाता मंदिराचे प्रांगण खूप मोठं आहे. येथे वर्षभर भाविकांचा राबता असतो. मंदिरा समोर एक मोठे झाड आति. या झाडाला हजारो रंगीत कापडात नारळं बांधून ठेवलेली दिसतात. रंगीत कपडयांत बोधलेली नारळं छान दिसतात. मंदिरात दुर्गा मातेची चतुर्भुज मूर्ती रामायणानुसार वाली या दुर्गा मातेचा अनन्य भक्त होता तो नियमित पणे या दुर्गादेवीची पूजा करीत असे. विजयनगरचे सर्वच शासक कोणत्याही मोहिमेवर जाण्यापूर्वी या दुर्गामातेचे दर्शन करूनच निघत असत. हल्ली काही दिवसापासून वाली गुफे जवळ अस्वले आणि वानरे यांनी माणसांवर हल्ले केल्यामुळे प्रशासनाने वाली गुफेचे मार्ग आणि प्रवेशद्वार बंद केले आहेत.
– विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७
Ramayan Yatra part16 Kishkindha Nagari by Vijay Golesar