रामायण यात्रा दर्शन (भाग – १५)
श्रीराम वन गमन मार्ग
पंम्पा सरोवरकाठी सीतेचा शोध
|| हाच आहे शबरीचा खरा आश्रम! ||
शबरी ही श्रीरामाची परमभक्त होती हे तर सर्वश्रुत आहे. शबरीने भक्तीभावाने अर्पण केलेली उष्टी बोरं भगवान श्रीरामांनी आवडीने खाल्ली ही गोष्ट आपण लहानपणी वाचली ऐकली आहे. रामभक्त शबरीचा आश्रम नेमका कुठे मात्र अनेकांना ठावूक नाही. तस पाहिलं तर यूपी, छतीसगड ,मध्यप्रदेश, गुजरात अशा अनेक ठिकाणी शबरीचा आश्रम किंवा शबरी धाम असल्याचं सांगितलं जातं. या सर्व ठिकाणी शबरी आणि श्रीराम भेट यांच्या मोठ मोठ्या मूर्ती व मंदिरं देखील आहेत. परंतु शबरीचा खरा आश्रम कुठे आहे हे नक्की माहित नाही. ‘इंडिया दर्पण’च्या श्रीराम वन गमन मार्ग / रामायण यात्रा दर्शन या विशेष लेखमालेत आज आपण मूळ शबरी आश्रमाची माहिती घेणार आहोत.
शबरीचा हा आश्रम कर्नाटकातील हंपी पूर्वीचे किष्किंधा नगरी जवळ तुंगभद्रा नदीच्या काठवरील पंपा सरोवरा जवळ आहे. रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर सीता वियोगाने दुःखी झालेले श्रीराम लक्ष्मणासह सीतेचा सर्वत्र शोध घेऊ लागले. वाटेत त्यांना सर्वप्रथम जटायू भेटला. नाशिक जवळच्या इगतपुरी तालुक्यात टाकेद नावाचे ठिकाण आहे. येथे सर्वतीर्थटाकेद नावाचे जटायूचे प्राचीन मंदिर आहे. जटायूचे अंत्यसंस्कार करून जटायूने दाखविलेल्या दिशेने श्रीराम व लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ पुढे निघाले.
कर्नाटकातील रामदुर्ग शहरापासून सुमारे 15 किमी अंतरावर ‘शबरी कोला’ नावाचे ठिकाण आहे. येथेच शबरीची झोपडी किंवा आश्रम होता. मातंग ऋषींच्या आश्रमाजवळच हे ठिकाण आहे. याच ठिकाणी शबरीने संपूर्ण आयुष्यभर श्रीरामाची वाट पाहिली.ग्रेनाईट दगडांच्या उंचच उंच डोंगरांच्या मध्यभागी शबरीचा आश्रम आहे. येथेच तरुणपणा पासून वृध्दावस्थेपर्यंत शबरीने श्रीरामांची श्रध्देने वाट पाहिली.
मंदिराचा परिसर भरपूर मोठा आहे. येथे चार चाकी वाहनं आरामात येऊ शकतात. पार्किंगपासून थोडं पुढे गेलं की एका विशाल वटवृक्षा समोर भगवान शंकरांचे दोन अडीचशे वर्षा पूर्वीचे मंदिर आहे. रामचरणदास नावाच्या साधूने हे मंदिर स्थापन केले. येथे शबरी आणि श्रीराम व लक्ष्मण यांच्या भेटीची भव्य प्रतिमा असून साधू रामचरण यांची मूर्ती देखील आहे. रामचरणदास यांनी 21 वर्षे एका पायावर उभ राहून या वटवृक्षाखाली तपश्चर्या केली होती असे सांगतात.
मंदिराच्या गाभा-यातील चौथ-यावर श्रीराम, लक्ष्मण, हनुमान आणि माता शबरी यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. शबरीचे मूळ नाव श्रमणा होते. तिचा जन्म भिल्ल जातीत झाला होता.लहानपणा पासून शबरी मतंग ऋषीच्या आश्रमात लहानची मोठी झाली. तेथेच आश्रमाच्या साफ सफाई सह पूजाअर्चेच्या सर्व कामांत ती मदत करीत असे.मतंग ऋषीची तिच्यावर विशेष कृपा होती. मतंग ऋषींनी आपल्या अंतसमयी शबरीला आदेश दिला, ” तू येथेच भगवान श्रीरामाची वाट पहा.येथे श्रीराम येतील तेव्हा तू त्यांचे स्वागत कर. श्रीरामांचे दर्शन झाल्यावर तुझा उध्दार होईल.’ गुरुच्या आज्ञेचं शबरीने तंतोतंत पालन केलं. अनेक वर्षे पहाटे उठून सडा, संमार्जन करून ती आश्रमाच्या वाटेवर फुलं पसरून ठेवायची. तसेच श्रीरामांना अर्पण करण्यासाठी जंगलातून ताजी पिकलेली फळ व बोरं आणून ठेवायची
अखेर तो शुभदिन आला. प्रभू राम लक्ष्मणा सह सीतेचा शोध घेत शबरीच्या आश्रमापर्यंत आले. शबरीने त्यांना पाहिलं. मतंग वनाची शोभा न्याहाळीत श्रीराम आणि लक्ष्मण वनश्रीने सुशोभित झालेल्या आश्रमाकडे हळूहळू येत होते शबरी सिद्ध तपस्वीनी होती. त्या दोन भावांना आश्रमात आलेले पाहून तिने त्यांना हात जोडले. त्यांच्या चरणाना वंदन केले. कमळा सारखे सुंदर नेत्र, विशाल बलदंड बाहू, डोक्यावर जटांचा मुकूट आणि गळ्यात वनमाला धारण केलेल्या सुंदर सावळ्या श्रीरामांच्या आणि गोर्यापान लक्ष्मणाच्या चरणाशी शबरी लिन झाली.
श्रीरामांनी दोन्ही हातानी तिला उठविले आणि प्रेमळ स्वरात विचारले, ” हे चारुभाषिणी, तू गुरुजनांची जी सेवा आजवर केली ती सफल झाली ना?
श्रीरामांच्या या विचारण्यावर शबरी म्हणाली, ‘हे रघुनंदन, आज आपलं दर्शन झाल्याने माझी तपस्या सफल झाली आहे. माझा जन्म सार्थक झाला आहे गुरुजनांची उत्तम पूजा केल्याचे फळ मला मिळाले आहे. यानंतर शबरीने अतिशय भक्ती भावाने श्रीराम व लक्ष्मण यांना पादय, अर्ध्य आणि आचमनीय आदि सामग्री समर्पित केली. अतिशय वात्सल्य भावनेने मायेने तिने श्रीरामांना विविध प्रकारची कंद मुळे आणि फळ अर्पण केली. श्रीरामांनी अत्यंत प्रेमाने शबरीने दिलेली फळं आणि उष्टी बोरे खाल्ली. ही फळं खुपच रुचकर आणि गोड़ असल्याचे राघवाने तिला पुन्हा पुन्हा सांगितलं. अशा प्रकारे श्रीरामाचा आदर सत्कार केल्यावर शबरी श्रीरामाला म्हणाली. ” हे सौम्य! मानद! आपली सौम्य दृष्टी माझ्यावर पडल्याने मी परम पवित्र झाले आहे. हे शञूदमन, आपल्या कृपेने मी आता अक्षय लोकांत जाईन.” त्यानंतर हात जोडून ती उभी राहिली.
त्यावेळी श्रीराम म्हणाले, ‘ हे भामिनी! मी तर फक्त भक्तीचाच संबंध मानतो. जात, पात, कुळ, धर्म, मोठेपण, घन- बल, कुटुंब, गुण आणि चातुर्य हे सगळं असून भक्ती नसलेला मनुष्य जलहिन ढगासारखा असतो. श्रीरामांनी शबरीला नवविधा भक्तीचा उपदेश केला, म्हणाले माझी भक्ती नऊ प्रकारे केली जाते. 1) संत संगती अर्थात सत्संग, 2) श्रीराम कथे विषयी प्रेम 3) गुरुजनांचे सेवा, ४) निष्कपट भावाने हरिचे गुणगाण संपूर्ण विश्वासाने श्रीराम नाम जप ६) इंद्रिय तसेच वैराग्यपूर्ण कर्म ५) सर्वामध्ये श्रीरामाला पाहणे, ८) जे मिळेल त्यात संतुष्टी ९) छळरहित सरळ स्वभावाने हृदयातील प्रभूवर विश्वास अशा प्रकारे एक जरी भक्ती केली तरी ती व्यक्ती मला प्रिय होते आणि तुझ्यात तर या नऊ भक्ती अतिशय दृढ आहेत. त्यामुळे योगी यांना सुध्दा दुर्लभ असलेली गती तुला सुलभ झाली आहे. यामुळेच आज तुला माझे दर्शन झाले. यामुळे तू सहज स्वरूपात विलिन होशील.’
एवढं बोलून श्रीरामांनी शबरीला जानकी विषयी विचारले. शबरीने त्यांना पंपा सरोवराकडे जाण्यास सांगितले. आणि म्हणाली, तिथे आपली वानरराज सुग्रीव आणि आपले प्रिय भक्त हनुमान यांची भेट होईल.. हे रघुवीर ते सर्व तुम्हाला सांगतील. आपण अंतर्यामी असूनही मला का विचारता ? नंतर ती म्हणाली, हे रघुनायका ज्यांचा हा आश्रम आहे. त्यांच्या चरणाची मी सदैव दासी आहे.त्या पवित्रात्मा महर्षिकडे मला आता जायचे आहे. भक्ती भावात रंगलेल्या शबरीने पुन्हा झुकून श्रीरामांच्या चरणांचे दर्शन घेतले. श्रीरामांच्या चरणांचे ध्यान करीतच तिने योगाग्नी व्यारे शरीराचा त्याग केला. अशाप्रकारे शबरी श्रीरामांच्या चरणी लीन झाली.
भगवद् प्रेमाचे, भगवद् भक्तीचे जे स्वरूप शबरीने प्रस्तुत केले ते कुणाच्याही हृदयात प्रेम भक्तीचा संचार करण्यास सर्वथा सक्षम आहे यात मुळीच शंका नाही. शबरी श्रीरामाला वात्सल्य भावनेनं पाहत होती आणि श्रीरामानेही माता कौशल्ये प्रमाणेच तिच्यात मातृभाव पाहिला. रामायणातील मनाला स्पर्श करणारा हा प्रसंग पंपा सरोवरा जवळ घडला. पंपा सरोवरा जवळ माता शबरीची गुफा आहे. याच परिसरात शबरीचे गुरू मतंग ऋषी यांचा आश्रम होता. येथील वनाला मतंगवन म्हणतात. पपा सरोवराजवळ पश्चिमेला पर्वतावर काही मंदिरांचे अवशेष आजही शबरीच्या भक्तीची गाथा कथन करीत आहेत.
शबरी कोल्ला किंवा शबरी आश्रम येथील शबरीचे मंदिर खूपच विशाल रंगीत आणि सुशोभित आहे. मंदिराचे सभागृहाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे हा सर्व परिसर मनमोहक आणि आकर्षक दिसतो. मुख्य मंदिराच्या गर्भगृहात माता शबरीची काळया पाषाणाची सुमारे ३ फूट उंचीची मूर्ती आहे. मुख्य मंदिराच्या मागे एक प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंग 2 फूट उंच आहे. स्थानिक लोकांची या मंदिरावर विशेष श्रदा आहे. मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम व उत्सव आयोजित केले जातात
मंदिराच्या आवारात एक लहानसा तलाव आहे. या तलावातील पाणी डोंगरांतून झिरपत येतं असल्यामुळे अतिशय स्वच्छ आहे. पाण्यातील दहा पंधरा फूटा वरील मासेही स्पष्ट दिसतात. हे मंदिर ग्रेनाईट पर्वतांच्या मध्यभागी वसलेलं आहे. मतंग ऋषींच्या साधनेचा प्रभाव या भागात आजही जाणवतो
कबंध राक्षसाचे मंदिर
रामायणातील शबरी बद्दल तर सर्वांना ठाऊक आहे पण येथून १० किमी अंतरावर असलेल्या कबंध राक्षसाची गुफा किंवा समाधी विषयी कुणालाही माहिती नाही. कबंध राक्षसाचे मूळ नाव धनू होते. त्याचा जन्म गंधर्व जमातीत झाला होता. स्थूलशिरा ऋषीच्या शापामुळे त्यांचे मुख राक्षसाचे झाले तर त्याचे हात एक योजन लांब झाले. इंद्राशी युध्द करताना इद्राच्या वज्राच्या आघातामुळे त्याचे शरीर कबंधा सारखे झाले. तो आपले एक योजन लोब हात फैलानून पशु पक्षी पकडून खात असे.
श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात येथे आले तेव्हा कबंधने त्यांना आपल्या पंजात जखडण्याचा प्रयत्न केला होता पण लक्ष्मणाने त्याच्या दोन्ही हाताचे पंजे तलवारीने छाटून टाकले. श्रीरामांनी कबंधच्या अंतिम इच्छेनुसार त्याचे अंत्यसंस्कार करून त्याला मुक्ती मिळवून दिली.दूरदर्शन वरील लोकप्रिय रामायण मालिकेत हा प्रसंग दखाविल्याचे अनेकांना आठवत असेल.
रामदुर्ग बदामी हायवेवर सरजी गुडा गावाजवळ कबंध राक्षसाची समाधी आहे. स्थानिक लोकाशिवाय इतर कुणालाही या स्थाना विषयी माहिती नाही ही समाधी जमीनी पासून बरीच खोलवर भागात आहे. त्यामुळे काही पाय-या उतरून गेल्यावर एका लहानशा दगडी छतरीखाली पांढाया रंगाचा ओबड घोबड दगड आहे. त्याचं तोड राक्षसा सारखे आहे ही आहे कबंध राक्षसाची समाधी!
येथे संगमरवरी चौथर्यावर पादुका आहेत. कन्नड भाषेत येथील संगमरवरी दगडावर कबंध राक्षराच्या समाधी विषयी लिहिलेले आहे कबंध राक्षसाने पुन्हा गंधर्व रूपात आल्यावर श्रीरामांना शबरीच्या मतंग आश्रमाचा तसेच किष्किंधा नगरीचा मार्ग दाखविला .तसेच सुग्रीवाशी मित्रता करावी असा सल्लाही त्याने श्रीरामाना दिला. शबरीच्या आश्रमा पासून सुमारे दहा-बारा किमी अंतरावर हे स्थान आहे परंतु स्थानिक लोकांशिवाय इतर कुणालाही या स्थानाची विशेष माहिती नाही. स्थानिक लोक मात्र कबंध राक्षसाच्या या समाधीची नित्यपूजा करतात.
कुठे आहे शबरी आश्रम
कर्नाटकातील रामदुर्ग शहरांपासून सुमारे १५ किमी अंतरावर शबरी कोला नावाचे ठिकाण आहे. येथे रामाच्या काळात शबरीची झोपडी होती.आजही एक गुफा येथे पहायला मिळते. येथे शबरी राहत होती असे सांगितले जाते.
शबरी आश्रम संपर्क- बेलगाव पासून १०२ किमी अंतरावर रामदुर्ग आहे.रामदुर्गच्या उत्तरेला 14 किमी अंतरावर गुन्नगा नावाच्या गावाजवळ सुरेवन म्हणजेच शबरी वन हे ठिकाण आहे. येथे बोरीची अनेक झाडं आहेत.
विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७
Ramayan Yatra part15 Shabari Ashram Pampa Lake by Vijay Golesar