इंडिया दर्पण विशेष लेखमाला
रामायण यात्रा दर्शन (भाग -१३)
रामायणातील टर्निंग पॉइंट
|| पंचवटी, नाशिक ||
भगवान श्रीरामाच्या वनवास काळात पंचवटीला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. रामायणातील टर्निंग पॉईंट पंचवटी येथे घडला. महाराष्ट्रातील नाशिक येथे पंचवटी आहे. रामायण काळा पासून धार्मिक तीर्थ क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले औद्योगिक महानगर म्हणून जगाच्या नकाशावर चमकत आहे.
दंडकारण्यात साडे अकरा वर्षे राहिल्या नंतर अनेक ऋषी मुनींचे आशिर्वाद घेत तसेच असुरांपासून त्यांचे संरक्षण करीत अनेक नद्या, तलाव, डोंगर, पर्वत आणि घनदाट वनांतून पायी चालत प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण नाशिक येथे अगस्ती मुनीच्या आश्रमात आले त्रेता युगात नाशिक पंचवटी परिसरात अगस्ती आश्रम होता हे तेच अगस्ती ऋषी होते ज्यांनी एकाच आचमनात साक्षांत समुद्रच गिळून टाकला होता. श्रीराम अगस्ती मुनींना भेटले. त्यांचे आशीर्वाद घेतले. अगस्ती मुनींनी त्यांच्या अग्निशाळेत निर्माण केलेली आयुधं आणि शस्त्रं श्रीरामांना भेट दिली असे म्हणतात.
रामायण कालातील अनेक खुणा आजही पंचवटीत सुस्थित आहेत. येथे गोदावरीच्या काठावर रामकुंड, सीताकुंड, लक्ष्मण कुंड आहेत. येथील रामकुंड येथेच दूर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. त्यावेळी रामकुंडात स्नान करण्यासाठी देशभरातील साधु संत महंत आणि लाखो भाविक येतात. पंचवटीतील कपालेश्वर, सुंदर नारायण, नारोशंकर,नीलकंठेश्वर अशी अनेक लहान मोठी मंदिरं गोदावरीच्या तीरावरच आहेत.
पंचवटीत पांच वडांचा एक समूह आहे. हे पाच वड रामाच्या वेळेपासून आहेत त्यामुळे या भागाला पंचवटी म्हणतात. येथेच सीता गुंफा नावाची एक लहानशी गुफा आहे. यात वाकून किंवा बसून जावं लागतं. येथे राम,सीता,आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. तसेच शिवलिंग आहे.या पांच वटवृक्षांखालीच सितेचा संसार देखील पहायला मिळतो. येथून, २५-३० फुटांवरच नाशिकचे सुप्रसिद्ध काळाराम मंदिर आहे.
काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटीत हे एक काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे. गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर १७७८-१७९० मध्ये बांधले. येथे सीता व लक्ष्मण यांच्याही मूर्ती आहेत. मंदिरात नियमित पूजाअर्चा होत असते. मंदिरावरील कोरीवकाम पाहण्यासारखे आहे. मंदिरासमोर भव्य सभामंडप आहे. मंडपात प्रवचने व कीर्तने होत असतात. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे.
मंदिरातील श्रीरामाची मूर्तीही काळ्या दगडातीलच आहे. म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात. राममंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की सध्या जेथे राममंदिर आहे तेथे पूर्वी नागपंथीय राहात असत. काही नागपंथीय साधूंना गोदावरीच्या पात्रात राम-लक्ष्मण-सीता यांच्या मूर्ती अंतरा-अंतरावर सापडल्या जेथे राममूर्ती सापडली ते रामकुंड, लक्ष्मणाची मूर्ती सापडली ते लक्ष्मणकुंड, सीतेची मूर्ती सापडली ते सीताकुंड होय. या मूर्ती स्वंयभू म्हणून ओळखल्या जातात.
काळाराम मंदिर
पंचवटीमधील हे प्रमुख मंदिर असून रंगराव ओढेकर यांनी इ.स .१७८० साली त्याचा जीर्णोद्धार केला. या मंदिराचा दगड हा रामशेज डोंगरातून आणला गेला. प्रत्येक दगड उकळत्या दुधात टाकून बराच वेळ तो तसाचा ठेवला जाई. जो दगड तडकला नाही तोच दगड मंदिरासाठी वापरला गेला असे सांगतात. या मंदिरावर कलाकुसर फारशी नाही. आहे तो भव्यपणा आणि डोळ्यात भरण्यासारखा नितळपणा. मंदिराभोवती चिरेबंदी कोट असून त्याच्या आत चारही दिशांना यात्रेकरूंसाठी अग्रशाला बांधलेल्या आहेत. गोदावरी नदीच्या घाटापासून याचे अंतर पायी चालत जाण्याइतके आहे.
काळाराम मंदिरा पासून ५ किमी अंतरावर तपोवन आहे. येथे श्रीरामाची झोपडी असून लक्ष्मणाचे मोठे मंदिर आहे. वनवासाच्या काळात राम सीता लक्ष्मण या भागात झोपडी बोधून रहात होते. येथेच लक्ष्मणाने रावणाची बहिण शूर्पणखा हिचे नाक कापले त्यामुळे पंचवटीला नाशिक म्हणू लागले असे मानतात येथेच राम-लक्ष्मण यांनी खर व दूषण यांच्याशी युद्ध केले याच पंचवटीत सीतेला सोनेरी हरण दिसले. श्रीरामाने याच परिसरात सोनेरी हरणाचे रूप घेऊन आलेल्या मारीच राक्षसाचा वध केला याच ठिकाणी लक्ष्मणाने झोपडी भोवती रेषा आखली. तिला लक्ष्मण रेखा’ म्हणतात ते स्थान तसेच लक्ष्मण रेखा या नावाचे मंदिरही पंचवटीत आहेत.
येथेच रावणाने साधूच्या वेशात येऊन सीतेचे अपहरण केले. रावण सीतेला त्याच्या विमानातून घेऊन जात असताना जटायू नावाच्या गरुडाने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला पण रावणाने जटायूचे पंख तलवारीने कापले त्यामुळे नाशिक पासून 50-55 किमी अंतरावर असलेल्या टाकेद येथे जटायू गतप्राण होऊन पडला वाल्मीकि रामायणातील हे सर्व प्रसंग नाशिकच्या पंचवटीतच घडलेले आहेत. आणि त्याच्या सर्व स्मृती ,आठवणी येथे आजही पहायला मिळतात. त्यामुळेच नाशिक येथे लाखो भाविक आणि पर्यटक वर्षभर येतात
कसे जावे
नाशिक हे महाराष्ट्रातील प्रमुख शहर आहे. नाशिक पासून 21 किमी वर नाशिक एअरपोर्ट आहे. तसेच मध्य रेल्वेचे प्रमुख रेल्वे स्टेशन नाशिकरोड आहे. मुंबई पासून नाशिक 170 किमी असून बस मार्गी आयंत चांगल्या स्थितीतआहे. भाविक व पर्यटकोच्या निवास व भोजनासाठी अनेक हॉटेल्स उपलब्ध आहेत.
– विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७
Ramayan Yatra Part13 Turning Point Panchavati Nashik by Vijay Golesar