इंडिया दर्पण विशेष लेखमाला
रामायण यात्रा दर्शन (भाग-१०)
दंडकारण्यातील असुर मर्दन
||सुतीक्ष्ण आश्रम, सारंगधर धाम ||
देशभर हिऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे मध्य प्रदेशातील शहर धार्मिक क्षेत्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. खजुराहो पासून 63 किमी अंतरावर असलेल्या पन्ना जिल्ह्यात सारंगधरधाम नावाचे प्रासिद्ध धार्मिक ठिकाण आहे. निसर्गसंपन्न दऱ्या खोऱ्यांनी समृद्ध असलेले सारंगधर धाम श्रीरामांच्या वनगमन भागातील प्रमुख ठिकाण आहे. हा सर्व प्रदेश पूर्वी दंडकारण्यात मोडत होता.
वाल्मीकि रामायणानुसार राक्षसांचा संपूर्ण नाश केल्यानंतर भगवान श्रीराम सर्वप्रथम सारंगधाम येथे पोहोचले. या ठिकाणी यांनी प्रथमच आपल्या खांदयावरील धनुष्य उतरून जमिनीवर ठेवले. यामुळेच या स्थानाचे नाव सारंगपूर असे पडले आहे. आज देखील येथील दगडावर भगवान श्रीरामांच्या धनुष्याची आकृती तयार झालेली पाहता येते. धनुष्याकृती आकार असलेल्या पहाडांच्या पायथ्याशी एक आश्रम आहे. या आश्रमात अगस्त्य मुनींचे शिष्य सुतीक्ष्ण मुनी यांनी अनेक वर्षे तपश्चर्या केली. सुतीक्ष्ण मुनीं समोर भगवान श्रीरामांनी असूरांच्या संपूर्ण संहाराचा संकल्प याच ठिकाणी केला होता असे म्हणतात.
सुतीक्ष्ण मुनींच्या आश्रमात भगवान श्रीरामांचे भव्य मंदिर भाविकांच्या श्रद्धेचे ठिकाण आहे. येथे भगवान श्रीरामांप्रमाणेच माता सीता आणि लक्ष्मण यांच्याही देखण्या मूर्ती आहेत. त्याच प्रमाणे सारंग धाम येथे लक्ष्मण कुटी, हजार दिव्यांचा भव्य खांब आणि सुतीक्ष्ण मुनींची समाधी आहे. रामचरित मानस मध्ये सारंगधाम चे सविस्तर वर्णन तुलसीदासांनी केले आहे. सारंगधाम येथे प्रभू राम आले होते याचे अनेक दाखले दिले जातात. ज्या विशाल वतवृक्षाच्या शितल छायेत श्रीरामांनी विश्रांती घेतली तो वटवृक्ष, रामकुंड, सीताकुंड आणि सीतेची गुहेतील रसोई आजही येथे पहायला मिळते.
बुंदेलखंडातील लोकांसाठी सारंगधाम केवळ एक पर्यटन स्थळच नाही तर धार्मिक तीर्थ स्थान देखील आहे. येथील रामकुंडातोल पाणी पिले तर पोटाचे कोणतेही विकार पूर्णपणे बरे होतात आणि मनोकामना पूर्ण होतात अशी श्रध्दा आहे. भगवान श्रीराम वनवास काळात ज्या ज्या ठिकाणी गेले होते तिथे आता पवित्र धार्मिक तीर्थस्थानं झालेली आहेत. मध्यप्रदेशात अशी अनेक ठिकाण आहेत. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्यात पन्ना पासून 23 किमी अंतरावर सारंग मंदिर किंवा सारंग धाम नावाचे तीर्थस्थान प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे.
येथे एक विशाल वटवृक्ष आहे या वटवृक्षा खाली अगस्त्य ऋषीचे शिष्य सुतीक्ष्ण नावाच्या ऋषीला श्रीरामांनी दर्शन दिले. त्यावेळी या परिसरांत अनेक असूर व राक्षस ऋषी मुनींच्या धार्मिक कृत्यात सतत व्यत्यय आणत. एवढेच नाही तर ते ऋषी मुनींना ठार मारत असतं. ऋषी मुनींच्या अस्थींचा एक डोंगरच येथे निर्माण झाला होता. सुतीक्ष्ण मुनींच्या विनंतीवरून श्रीरामाने या ठिकाणी सर्व असूरांचा व राक्षसांचा विनाश करण्याची प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर या परिसरातील सर्व राक्षसांचा संहार केल्या नंतर श्रीरामाने आपले धनुष्य म्हणजे सारंग येथे ठेवले त्यामुळे इथले डोंगर धनुष्याच्या आकाराचे झाले आहेत.
येथे श्रीरामाचे विशाल मंदिर आहे .त्याची स्थापना छत्रसालचे वंशज पन्ना राज घराण्याचे महाराज हरिवंशराय यांनी केली होती. त्यांनीच या ठिकाणाचे नाव सारंग म्हणजे श्रीरामाचे धनुष्य असे ठेवले. येथे मंदिराच्या प्रवेशव्दारावर धनुष्याची प्रतिकृती पहायला मिळते. मंदिराचे प्रमुख प्रवेशव्दारच धनुष्याकृती बनविण्यात आले आहे. येथे मंदिराच्या गाभार्यात श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्या सुबक मूर्ती आहेत. त्याच प्रमाणे समोर हनुमानाची मूर्ती आहे. चित्रकुट येथील कामदगिरी मंदिरा भोवती अनेक मंदिरे आहेत तसेच सारंगधाम येथील राम मंदिरा भोवती 52 लहान मोठी मंदिरे आहेत. हा संपूर्ण परिसर विंध्य पर्वताच्या तळहातावर उभारलेले आहे असे मानतात आणि या पर्वतावर सर्वत्र विविध प्रकारच्या औषधी वनस्पती उगवतात. ज्या इतर कुठेच आढळत नाहीत. या आश्रमात रामकुंड नावाचे एक कुंड आहे. या कुंडातले पाणी कधीच अटत नाही तसेच या कुंडाची खोली देखील नेमकी किती आहे ते आजही समजलेले नाही. मात्र या कुंडातील पाणी औषधी आहे.
सारंगधर धाम येथे श्रीरामाचे प्राचीन मंदिर आहे. मंदिरा भोवती लहान लहान मंदिरात 12 शिवलिंग स्थापन केलेले आहेत. मंदिर प्रांगणात अध्यात्म केंद्र स्थापन करण्यात आले आहे यानंतर सारंग पहाड सुरू होतो. यापहाडावर 25 ते 30 फूट उंचीवर सुतीक्ष्ण मुनींचे मंदिर आहे. या मंदिरा जवळच सुतीक्ष्ण मुनींचे गुरु अगस्त्य मुनी आणि बिहारी जू यांचे दर्शनीय मंदिर आहे. सुतीक्ष्ण मुनींच्या मंदिरात नवग्रह मंदिर बनविण्यात आले आहे.
येथे एक वैशिष्ट्य पूर्ण वटवृक्ष आहे या वटवृक्षाची पाने द्रोणाचा आकार घेतात. येथे आपल्या मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रध्दा आहे. आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी दीपदान केले जाते. सुतीक्ष्ण मुनीच्या या आश्रमा समोर हजार दिव्यांचा दिपदान स्तंभ देखील आहे.
वाल्मिकी रामायणात अश्वमुनीच्या आश्रमाचे वर्णन केलेले आहे. सुतीक्ष्ण आश्रमापासून पिंपरावन, मरवा – सिलहा मार्गाने ८ किमी अंतरावर घनदाट जंगलात हा आश्रम आहे. येथे राम-लक्ष्मण कुंड, श्रीरामाने बाण मारून निर्माण केलेला गरम पाण्याचा झरा, अश्वमुखी देवीचे मंदिर,सूर्य कुंड, दूध मनिया कुंड इत्यादि रामायण काळाशी संबंधित ठिकाण आहेत.
अश्वमुनी आश्रमापासून 44 किमी अंतरावर मार्कण्डेय आश्रम आहे. मारकुण्डी स्टेशन पासून मार्कण्डेय आश्रम 1 किमी वर आहे.
वाल्मीकि रामायणात एक प्रसंग आहे. विराध नावाच्या राक्षसाशी राम लक्ष्मण यांनी प्रदीर्घ लढा दिला. शेवटी त्याचा नाश झाला. विराधच्या रक्ताने दोघांचे आयुधं आणि वस्त्र रंगून गेले. त्यावेळी टिकरिया आणि मारकुंडी यांच्या मध्ये असलेल्या विशाल पुष्करणीत राम लक्ष्मण यांनी आपली वस्त्रं व आयुधे घुतली असे म्हणतात. त्यानंतर मारकुंडी येथील भगवान शंकराच्या मंदिरात रामाने शिवाची पूजा केली.
मार्कण्डेय आश्रमा पासून 12 किमी अंतरावर पुष्करणी आहे. येथे श्रीराम, सीता माता, आये मुनी आणि सती अनसुया यांची भेट झाली होती. सती अनसूयाच्या तपस्ये मुळे येथे गंगा मंदाकिनीच्या रूपाता 100 धारांनी प्रकट झाली होती. आजही आपण हे दृश्य येथे पाहू शकतो.
-विजय गोळेसर ९४२२७६५२२७
Ramayan Yatra Part10 Dandakaranya Sarangdhar Dham by Vijay Golesar