इंडिया दर्पण विशेष लेखमाला
रामायण यात्रा दर्शन भाग -४
जनकपुर : रामाची सासुरवाडी!
रामायणात अयोध्ये एवढेच महत्व असलेले दुसरे ठिकाण म्हणजे सीतेचे माहेर असलेले जनकपुर. रामायण काळात अयोध्ये एवढेच मोठे राज्य होते मिथिलेचे आणि या राज्याचे राजे होते महाराज जनक आणि त्यांची राजधानी होती जनकपुर! आज जनकपुर हे नेपाळमधील सुप्रसिद्ध धार्मिक ठिकाण आहे. नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडूपासून हे ठिकाण दक्षिण-पूर्वेला ४०० किमी अंतरावर आहे.
सीतेचे बालपण येथेच गेले. जनकपुरच्या राजमहालत सीता लहानची मोठी झाली आणि श्रीरामाशी तिचा विवाह देखील येथेच झाला.
स्वयंवर झाले सीतेचे!
वाल्मिक रामायणानुसार मिथिलेचा राजा जनक हा अतिशय धर्मपरायण राजा होता. महाराज जनक हे भगवान शंकराचे परम भक्त होते. भगवान शंकराने प्रसन्न होवून त्यांना एक धनुष्य दिले होते. हे शिव धनुष्य अतिशय जड़ होते. अतिशय शक्तिवान व्यक्तीला देखील हे धनुष्य उचलने अवघड होते. जनक राजाची कन्या सीता देखील लहानपणापासून अत्यंत धर्मपरायण होती.ती नित्यनेमाने राज महालातील पूजा स्थानाची सफाई स्वत: करायची.
एकदा जनक महाराज पूजा करण्यासाठी आले तेंव्हा त्यांनी पहिलं की भगवान शिवने दिलेले अवजड शिवधनुष्य एका हाताने उचलून सीता दुसर्या हाताने साफ सफाई करीत आहे. हे पाहून जनक महाराज स्वत:च चकित झाले. एवढं अवजड शिवधनुष्य या कोमल मुलीने कसे एकाच हाताने सहजगत्या उचलले आहे याचे त्यांनादेखील आश्चर्य वाटले. त्याच वेळी त्यांनी निश्चय केला की जो या धनुष्याला प्रत्ययंचा चढविल त्यालाच सितेशी विवाह करता येईल.
आपल्या या कल्पनेनुसार सीता वयात आल्या नंतर जनक राजाने सीतेच्या स्वयंवर साठी ‘धनुष यज्ञा’चे आयोजन केले. सीतेच्या स्वयंवरासाठी देशोदेशींचे राजे, महाराजे, राजकुमार आणि वीर पुरुषांना आमंत्रित करण्यात आले.
या स्वयंवरासाठी गुरु विश्वामित्र यांना विशेष आमंत्रण असल्याने त्यांचे सोबत श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघे बंधू देखील आले होते.
शिव धनुष्यावर प्रत्ययंचा चढविण्याचा प्रयत्न अनेक राजे, महाराजे आणि राजकुमारानी केला. परंतु त्यापैकी कुणालाही शिवधनुष्याला प्रत्ययंचा चढविणे तर दूरच पण शिवधनुष्य उचलता देखील आले नाही. हे पाहून जनक महाराज काळजीत पडले.आपल्या कन्येला योग्य वर मिळेल की नाही याची त्यांना चिंता वाटू लागली. त्याप्रसंगी बंधू लक्ष्मण याचा आग्रह आणि गुरु विश्वामित्र यांची आज्ञा घेवून प्रभु श्रीराम पुढे झाले.
श्रीरामने अत्यंत लीलया ते अवजड शिवधनुष्य उचलले आणि त्याला तितक्याच सहजपणे प्रत्ययंचा देखील जोडली परंतु त्याचवेळी ते शिवधनुष्य ३ तुकडे होवून मोडून पडले. अशा प्रकारे श्रीरामांनी सीता स्वयंवराची अट पूर्ण केली. सितेने श्रीरामाच्या गळ्यात वरमाला घातली. त्यानंतर जनकपुरच्या राजमहालात श्रीरामाचा सितेशी विवाह झाला ही कथा सर्वश्रुत आहे.जनकपुरच्या राम-जानकी मंदिरांत हा प्रसंग घडला हे आठवल्यावर अंगावर रोमांच उभे राहतात. माघ शुक्ल पंचमी या दिवशी प्रभु रामचंद्राचा विवाह सीतेशी झाला म्हणून हा दरवर्षी दिवस जनकपुरच्या सीता-राम मंदिरात विवाह पंचमी म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
कालांतराने त्रेतायुगातील जनकपुर देखील काळाच्या ओघात नष्ट झाले. त्यानंतर हजारो वर्षे गेली. आजपासून सुमारे साडे तीनशे वर्षापूर्वी बैरागी परंपरेतील महात्मा सुरकिशोर दास यांनी जनकपुर आणि येथील जानकी राम विवाह स्थानाचा शोध लावला. या ठिकाणी इ.स. १६५७ मध्ये केलेल्या उत्खननात सीतेची सुवर्ण मूर्ती सापडली होती. सूरकिशोरदास यांनी येथे राम सीतेची मूर्ती स्थापन करून पूजा अर्चेला सुरुवात केली. आता तर जनकपुर हे नेपाळ मधील केवळ धार्मिक ठिकाणच नाही तर आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणूनही विकसित करण्यात आले आहे. दरवर्षी करोडो भाविक आणि पर्यटक जनकपुरला भेट देतात.
राम जानकी उर्फ नौलखा मंदिर
जनकपुर येथे श्रीराम आणि जानकी यांची अनेक मंदिरं आहेत. परंतु या सर्वांत प्रमुख मंदिर आहे ते नौलखा मंदिर! टीकमगढ संस्थानची महारानी वृषभानु कुमारी बुंदेला यांनी पुत्रप्राप्ती व्हावी यासाठी हे मंदिर बांधले असे म्हणतात. पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी अयोध्येत देखील ‘कनक भवन’ ची निर्मिती जेकी होती.परंतु पुत्रप्राप्ती न झाल्याने गुरुंच्या आज्ञेने त्यांनी जनकपुर येथे राम-जानकी मंदिराची निर्मिती केली. या मंदिराची निर्मिती सुरु झाल्यावर वर्षभराच्या आतच महाराणीला पुत्रप्राप्ती झाली. जानकी मंदिर निर्माण करण्यासाठी १६ वर्षे लागली. या मंदिरासाठी नऊलाख रूपये खर्च आला म्हणून या मंदिराला नौ लखा मंदिर म्हणतात असे सांगितले जाते.
हे मंदिर अतिशय भव्य आणि देखने आहे. हजारो भाविक आणि पर्यटक या मंदिरात दररोज येतात परंतु इथली स्वच्छता आणि व्यवस्थापन अतिशय चोख असते. या मंदिरांत इ.स. १८९४ मध्ये मुर्तींची स्थापना करुण नित्यपूजा सुरु करण्यात आली होती. इ.स. १८९५ मध्ये या मंदिराचे बांधकाम सुरु झाले आणि इ.स १९११ मध्ये मंदिर बांधून झाले. या मंदिराचे क्षेत्रफळ ४८६० चौरस फुट आहे. या मंदिरावर परमानंदी सम्प्रदायाच्या बैरागी साधुंचे प्रभुत्व आहे. श्री रामतपेश्वर दास वैष्णवजी हे या मंदिराचे महंत आहेत. पूर्वीच्या राजे महाराजा आणि शासकांनी या मंदिराला उत्पन्नासाठी खूप मोठ्या प्रमाणात जमीनी दान दिलेल्या आहेत.तेच या मंदिराच्या आमदानीचे प्रमुख स्त्रोत आहे.
मंदिर परिसरांत जानकी मंदिराच्या उत्तरेला अखंड किर्तन भवन असून येथे इ.स. १९६१ पासून अखंड सीता-राम नाम संकीर्तन सुरु आहे.
जानकी मंदिर परिसरांत लक्ष्मण मंदिर देखील आहे.जानकी मंदिरापेक्षा लक्ष्मण मंदिर प्राचीन आहे असे म्हणतात. या मंदिर परिसरातच राम जानकी विवाह मंडप आहे.मंडपाच्या खांबांवर १०८ प्रतिमा आहेत.
विवाह मंडप (धनुषा)
याच विवाह मंडपात माघ शुद्ध पंचमी या दिवशी लाखो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने राम जानकी विवाह संपन्न केला जातो. जनकपुरच्या रहिवाशांचे एक वैशिष्ट्ये सांगितले जाते ते म्हणजे इथले लोक रामाला देव न मानता आपल्या गावचा जावाई मानतात आणि राम जानकी विवाह प्रसंगी आपल्या लाडक्या लेकीला आपल्या पासून दूर नेतो म्हणून त्याला कृतकोपाने शिव्या देखील देतात!
जनकपुरी पासून 14 किमी अंतरावर ‘उत्तर धनुषा’ नावाचे ठिकाण आहे. प्रभु रामचंद्रानी सीता स्वयंवराच्या वेळी याच ठिकाणी शिव धनुष्य तोडले होते असे सांगितले जाते. येथे दगडाचे काही अवशेष दाखवितात तेच शिव धनुष्याचे तुकडे असल्याचे सांगितले जाते.
जनकपुर परिसरांत एकुण ७० मंदिरं आणि ११५ तलाव आहेत. या प्रत्येक तलावा मागे काही ना काही कथा सांगितली जाते. येथील विहार कुंड नावाच्या तलावा भोवती ३०-४० मंदिरं आहेत.येथे एक संस्कृत विद्यालय आणि विश्वविद्यालय देखील आहे. या विद्यालयाला ज्ञानकूप असे म्हणतात. मंडपाच्या चारी दिशांना चार छोट्या छोट्या देवळया आहेत. यामध्ये ‘सीता-राम’, ‘मांडवी-भरत’, ‘उर्मिला -लक्ष्मण’ आणि ‘श्रुतकीर्ति -शत्रुघ्न’ यांच्या प्रतिमा आहेत. सीता आणि राम यांच्या बरोबरच भरत,लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचे देखील विवाह सीतेच्या बहिणीशी झाले होते या प्रसंगाची आठवण या मंदिरा मुळे होते.
कसे जावे?
नेपाळची राजधानी काठामांडू पासून जनकपुर ४०० किमी अंतरावर आहे. नेपाळच्या धनुषा नावाच्या जिल्ह्यात जनकपुर आहे.
मात्र भारतातील बिहारच्या दरभंगा,मधुबनी आणि सितामढी येथून जनकपुरला बस मार्गाने सहज जाता येते.पटना पासून जनकपुर १४० किमी अंतरावर आहे. तर अयोध्ये पासून जनकपुर ३६९ किमी अंतरावर आहे. जनकपुर हे धार्मिक क्षेत्र तसेच पर्यटन स्थान असल्याने येथे निवास व भोजनासाठी अनेक धर्मशाळा आणि होटेल्स उपलब्ध आहेत.
-विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७
Ramayan Yatra Janakpur by Vijay Golesar