इंडिया दर्पण विशेष लेखमाला
रामायण यात्रा दर्शन (भाग -१६)
पंम्पा सरोवर काठी
|| श्रीराम हनुमान भेट ||
रामायणातील महत्वाचा प्रसंग म्हणजे श्रीराम आणि त्याचा प्रिय भक्त हनुमान यांची भेट. वाल्मीकि रामायणानुसार रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधार्य फिरत असताना पम्पा सरोवरापाशी असलेल्या मतंग ऋषीच्या आश्रमात शबरीला भेटले. शबरीने श्रीरामाला पंपा सरोवर येथे जाण्यास सांगितले तसेच तेथे प्रथम हनुमान आणि त्यानंतर ऋश्यमुख पर्वतावर महाराज सुग्रीव यांची भेट होईल असे सांगितले. त्यानुसार श्रीराम आणि लक्ष्मण पंपा सरोवराच्या दिशेने निघाले. रामायणात वर्णन केलेले पंपा सरोवर कर्नाटकातील हंपी पासून जवळ आहे. रामायण काळांत हंपीचे नाव किष्किंधा असे होते.
प्राचीन काळी पंपा सरोवर किष्किंधा नगरीचाच एक भाग होता. पंपा सरोवरा जवळून तुंगभद्रा नदी वाहते. येथे ऑटो रिक्षा किंवा खाजगी वाहतून वर्षभर कधीही येता येते. नदी पार करून केवळ 10 ते 15 मिनिटांत पंपा सरोवरापाशी जाता येते. मात्र रस्ते मार्गाने हे अंतर सुमारे 15 किमी आहे. पंपा सरोवर हंपी पासून 15 किमी वर आहे. येथे बोर्ड आहे- श्री राम वन गमन मार्ग पंपासर. अनेगुंडी गावाजवळ पंपा सरोवर आहे.
हिंदू धर्मातील पांच प्रमुख सरोवरात पंपा सरोवराचा समावेश होतो. याची निर्मिती ब्रह्मदेवाने केली. पौराणिक ग्रंथा नुसार ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करताना सर्वप्रथम 5 सरोवरांची निर्मिती केली होती असे मानतात. हिमालयातील कैलास मानसरोवर, राजस्थान मधील पुष्कर सरोवर, गुजरात मधील बिंदू सरोवर आणि नारायण सरोवर आणि कर्नाटकातील पंपा सरोवर यांचा समावेश होतो. प्राचीन काळी येथे माता पार्वतीने तपश्चर्या केली होती. पार्वतीचेच एक नाव पंपा आहे. यावरून या सरोवराचे नाव ‘पंपा सरोवर’ असे पडले आहे.
पंपा सरोवर खूप मोठे असून चारी बाजूंनी पायऱ्या बांधलेल्या आहेत. पंपा सरोवराच्या काठावर अनेक मंदिरे आहेत. सर्व परिसर नीट बांधलेला व स्वच्छ आहे. पूर्वीच्या काळी या सरोवरा जवळूच मतंग ऋषींचा आश्रम होता. येथेच मतंग ऋषींची शिष्या आणि रामभक्त माता शबरी राहत होती . आश्रमात राहून शबरी आश्रमाची आणि सरोवराची स्वच्छता ठेवायची.मतंग ऋषींनी आपल्या अंत्यसमयी शबरीला येथे राहून श्रीरामाची वाटू पाहण्याची आज्ञा केली. मतंग ऋषींच्या निर्वाणा नंतर शबरी जवळच असलेल्या ‘शबरी कोल्ला’ नावाच्या ठिकाणी गेली. याच ठिकाणी माता शबरीची भगवान श्रीराम यांच्याशी भेट झाली होती.
शबरीच्या सल्ल्यानुसार भगवान श्रीराम व लक्ष्मण सुग्रीव महाराज व वानरराज हनुमान यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आले होते
त्यावेळी बालीच्या भितीने सुग्रीव आपल्या मंत्र्यांसह ऋष्यमुख पर्वतावर लपून रहात होते. श्रीराम व लक्ष्मण आल्याचे समजल्यावर सुग्रीवाने हनुमानाला वेष बदलून हे नेमके कोण आहेत ? आपले शञू की मित्र याची गुप्तपणे माहिती घेण्यास पाठविले. होता.
हनुमान ब्राह्मणाच्या वेषात पंपा सरोवरा जवळ आले आणि याच ठिकाणी त्यांची श्रीरामांशी प्रथम भेट झाली. हे दोघे दशरथ पुत्र श्रीराम व लक्ष्मण असल्याची खात्री झाल्यावर हनुमानाने आपल्या मूळ रूपांत येऊन श्रीरामाचे चरण धरले त्यानंतर या दोघांना आपल्या खांदयांवर बसून आकाश मार्गाने दोन तीन किमी अंतरावर असलेल्या ऋष्यमुख पर्वतावर घेऊन गेले. पंपा सरोवरा पासून सुमारे ३ किमी अंतरावर ऋष्यमुखी पर्वत आहे आजही आपल्याला पंपा सरोवराच्या काठी मतंग ऋषींचा आश्रम व मंदिर पहायला मिळते.
येथे मुख्य मंदिर लक्ष्मी देवीचे आहे. तसेच बाजूला शिव मंदिर आणि पंपा देवीचे म्हणजे पार्वती मातेचे मंदिर आहे. सरोवराच्या तीन बाजूंना मोठ मोठे दगड असलेले उंच उंच पहाड आहेत. या ठिकाणी पूर्वी वानरांचे राज्य होते असे म्हणतात ते खरंच आहे. कारण आजही हजारो वानर या ठिकाणी मुक्तपणे फिरतांना, खेळतांना, बागडताना दिसतात.
इथली सर्व मंदिर हजार पंधराशे वर्षापूर्वी विजयनगरचे साम्राज्य असताना महाराज कृष्णदेवराय यांनी निर्माण केलेली आहेत. येथील शंकराचे मंदिर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरा सारखे दगडी बांधणीचे आहे. मंदिर आजही सुस्थितीत आहे. येथे नित्यपूजा पाठ केले जातात.
येथील पंपादेवीचे मंदिर पाहण्यासारखे आहे. पंपा देवीची मूर्ती काळ्या पाषाणातील असून कोल्हापूरच्या अंबाबाई सारखीच ही पंपादेवी म्हणजे माता पार्वती दिसते. आश्रमाच्या मागच्या बाजूला शबरीची गुफा आणि श्रीरामाच्या चरण पादुकांचे मंदिर आहे आहे.
मतंग ऋषीच्या आश्रमातच शबरीची गुफा आहे. मतंग जिवंत ऋषी असतांना माता शबरी याच गुफेत रहात असे. आश्रमाच्या एका कोपयात वरच्या भागात ही गुफा आहे. गुफे बाहेर प्राचीन काळी बांधकाम झालेले आहे. परंतु शबरीची मूळ गुफा मात्र तिच्या नैसर्गिक अवस्थेत म्हणजे दगडांचीच आहे. शबरीच्या गुफे शेजारीच श्रीराम पादुकांचे मंदिर आहे. याच ठिकाणी श्रीराम व हनुमान यांची प्रथम भेट झाली होती असे येथील पुजारी सांगतात.
मंदिरात श्रीरामाच्या चरण पादुका असून श्रीराम व हनुमान भेटीचा फोटो ठेवलेला आहे. रामचरण पादुका मंदिरा भोवती हजारो वानरे फिरत असतात. उड्या मारतात पण एकही वानर कधीच राम मंदिरात जात नाही असे म्हणतात वानर ही रामाची सेना आहे. आणि ते मंदिरा बाहेर राहूनच श्रीरामाचे रक्षण करतात असे म्हटले जाते.
सरोवरा जवळ एका दगडी चौथरयावर श्रीगणेशाची प्राचीन मूर्ती आहे. ही गणेशमूर्ती शेंदूरचर्चित असून एका झाडाखाली उघड्यावर आहे
येथे सरोवराचे दोन वेगळे भाग आहेत. सरोवरा भोवती हिरवी झाड सर्वच मोठ्या प्रमाणात आहे सरोवर आणि आसपासचा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला आहे. दुरून हे दृश्य पाहिले तरी मन आणि डोळे हिरव्यागार वातावरणामुळे शांत व प्रसन्न होते
-विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७
Ramayan Yatra Darshan Shriram Hanuman Meet by Vijay Golesar