नाशिक : उपासनेचे पवित्र पर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘रमजान पर्व’ला शनिवारी (दि. १) संध्याकाळी चंद्रदर्शन घडताच प्रारंभ झाला. शहर व परिसरातील सर्व मशिदींमध्ये रात्री ‘तरावीह’च्या विशेष नमाज पठणाला प्रारंभ करण्यात आला. रविवारी पहाटेपासून अबालवृद्धांकडून पहिला निर्जळी उपवास (रोजा) केला जाणार आहे. यंदा कोरोनाचे सावट नसल्यामुळे मुस्लीम बांधवांमध्ये रमजान पर्व निर्बंधमुक्तपणे साजरा करण्यात येणार आहे. यामुळे अमाप उत्साह बघावयास मिळत आहे.
इस्लामी कालगणनेतील आठवा महिना शाबानच्या २९ तारखेला शनिवारी शहरात आकाश निरभ्र राहिल्याने सर्वांना चंद्रदर्शन घडले. यामुळे शाही मशिदीमध्ये शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय चांद समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला विविध धर्मगुरू, उलेमा उपस्थित होते. शहरात सर्वत्र चंद्रदर्शन घडल्यामुळे रमजान पर्वला प्रारंभ झाल्याची औपचारिक घोषणा खतीब यांनी केली. समाजबांधवांनी पारंपरिक पद्धतीने रमजान पर्व पार पाडावे. रमजान काळात उपवास करण्यासोबत आपल्या दिनचर्येत बदल करत अधिकाधिक वेळ अल्लाहच्या उपासनेकरिता कसा देता येईल, यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन खतीब यांच्यासह विविध धर्मगुरूंकडून करण्यात आले आहे.
रमजान पर्व काळात मुस्लीम बांधवांकडून महिनाभर निर्जळी उपवास केले जातात. मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटाखाली रमजान पर्व पार पडले. विविध निर्बंध असल्यामुळे रमजान काळातसुद्धा धार्मिक कार्यक्रम घरातच आटोपते घ्यावे लागले होते. प्रार्थनास्थळेदेखील बंद ठेवण्यात आली होती. यावर्षी मात्र चित्र पालटल्यामुळे रमजान पर्वचा उत्साह अधिक पाहावयास मिळत आहे. शनिवारी संध्याकाळी मुस्लिमबहूल भागात चंद्रदर्शन बघण्यासाठी अबालवृद्धांनी घरांचे टेरेस गाठले होते. चंद्रदर्शन घडताच एकमेकांना ‘चांद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या. तसेच सोशल मीडियावरसुद्धा शुभेच्छांच्या लघुसंदेशांची देवाणघेवाण केली जात होती.