नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विधानपरिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीत बुधवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे आज त्यांची अधिकृत निवडीची घोषणा होणार आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात १९ डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याचे नमूद केले होते.
माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सभापतीपद रिक्त आहे. या पदासाठी १९ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी १८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. त्यात प्रा. राम शिंदे यांचा एकमेव अर्ज आला.
विधानपरिषदेत ७८ सदस्यांपैकी भाजपचे १९, काँग्रेस ७, शिवेसना ठाकरे गटाचे ७, शिवसेना शिंदे गटा ६, राष्ट्रवादी शरद पवार गट व अजित पवार गट यांचे प्रत्येकी पाच आणि तीन अपक्ष सदस्यांचा समावेश आहे.