मुंबई – कोरोनामुळे देशातील अनेक प्रकल्पांना फटका बसला आहे. अनेकांची कामे रखडली आहेत, तर अनके प्रकल्प सुरू होतानाच अडथळा निर्माण झाला आहे. अशात बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माण कार्यातही अडथळा आला आहे. ३० महिन्यांमध्ये राम मंदिराचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. पण हा कालावधी लांबणार असल्याचे दिसत आहे.
मुख्य म्हणजे तसेही राम मंदिराचे निर्माण कार्य सुरू होणे हे आव्हानात्मक होते. कोरोनाच्या संकटात कामगार उपलब्ध नाहीत आणि देशाच्या विविध भागांमधून साहित्य पोहोचायलाही मर्यादा आल्या आहेत. मंदिर निर्माणाच्या कालावधीची घोषणा ५ ऑगस्टला करण्यात आली होती. त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमीपूजन केले होते. त्यावेळी ३९ महिन्यांमध्ये मंदिर पूर्ण करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. पण त्यानंतर मंदिर उभारण्यासाठी आवश्यक सामग्री ठरविण्यातच बराचवेळ निघून गेला. यावर्षी १५ जानेवारीपासून काम सुरू झाले हे खरे आहे. पण त्यात वारंवार अडथळेही येत गेले. पाया भरणीसाठी तज्ज्ञ कामगारांची संख्या ५० होती, ती दोनशपर्यंत वाढविण्यात येणार होती. मात्र कोरोनामुळे ही योजना संपुष्टात आली. एवढीच समाधानाची बाब आहे की किमान पूर्वीप्रमाणे ५० कामगार नियमीत कामावर आहेत आणि त्यांना कोरोनाने गाठलेले नाही. मात्र त्यांच्या संख्येत वाढ झाली नाही तर एक वर्षात साधा पायाही भरता येणार नाही.
३६० फूट लांब आणि २३५ फूट रुंद असा मंदिराचा पाया आहे. हा पाया एकूण ४४ टप्प्यांमध्ये भरला जात आहे. एक टप्पा पूर्ण करण्यासाठी एक महिना लागला. दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. अर्थात ४४ महिने लागणार नाहीत. पण आगस्टपर्यंत नक्कीच पाया भरून होणार नाही. त्यासाठी या वर्षाच्या अखेरपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.
रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टलासुद्धा हे माहिती आहे की ३९ महिन्यांमध्ये मंदिराचे काम पूर्ण होणे केवळ अशक्य आहे. हवामान आणि परिस्थिती प्रतिकुल राहिले तर काम पुढे वाढत जाईल, याचा उल्लेख ट्रस्टच्या बैठकीत वारंवार झालेला आहे.