इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
र्मोरोक्कोचे राष्ट्रीय संरक्षण मंत्रीस्तरीय प्रतिनिधी अब्देलतिफ लौदीयी यांच्या निमंत्रणावरून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह २२ -२३ सप्टेंबर २०२५ दरम्यान मोरोक्कोचा दोन दिवसांचा अधिकृत दौरा करणार आहेत. भारत व मोरोक्कोमधील वाढत्या धोरणात्मक एकत्रीकरणावर प्रकाश टाकणारा, संरक्षणमंत्र्यांचा उत्तर आफ्रिकी राष्ट्राचा हा पहिलाच दौरा असेल.
बेरेचिड येथील टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स मारोकच्या व्हील्ड आर्मर्ड प्लॅटफॉर्म (WhAP) 8×8 साठीच्या नवीन उत्पादन सुविधेचे उद्घाटन हे या भेटीतील एक प्रमुख आकर्षण आहे. ही सुविधा म्हणजे आफ्रिकेतील पहिलाच भारतीय संरक्षण उत्पादन कारखाना असणार आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाअंतर्गत
भारताची संरक्षण उद्योगातील वाढती जागतिक पदचिन्हे प्रतिबिंबित करणारा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या भेटीदरम्यान, संरक्षण मंत्री लौदीयी यांच्याशी संरक्षण, धोरणात्मक व उद्योग सहकार्य मजबूत करण्यासाठी द्विपक्षीय बैठक घेतील. औद्योगिक सहकार्याच्या संधी पडताळण्यासाठी ते मोरोक्कोचे उद्योग व व्यापार मंत्री रियाद मेझौर यांचीही भेट घेतील. राजनाथ सिंह त्यांच्या भेटीदरम्यान रबाटमधील भारतीय समुदायाशी देखील संवाद साधतील.
या भेटीत दोन्ही बाजूंनी संरक्षण क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करार (एमओयू) होण्याची अपेक्षा आहे. या करारामुळे द्विपक्षीय संरक्षण संबंधांचा विस्तार व सखोलता वाढेल, ज्यामध्ये देवाणघेवाण, प्रशिक्षण तसेच औद्योगिक संबंध यांचा समावेश असेल. अलीकडच्या वर्षांत भारतीय नौदलाची जहाजे कॅसाब्लांका येथे नियमित पोर्ट-कॉल करत आहेत व हा करार अशा संबंधांना आणखी दृढ करेल.
२०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर भारत व मोरोक्कोमधील संबंधांना वेग आला आहे. आगामी भेटीमुळे या भागीदारीला, विशेषतः संरक्षण तसेच धोरणात्मक क्षेत्रात, नवीन ऊर्जा मिळण्याची अपेक्षा आहे.