इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगाव जिल्ह्यातील कोथळी गावात संत मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर रक्षा खडसे यांच्या सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरुन मुक्ताईनगरमध्ये पोलिसांनी चार तरुणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, मंत्री रक्षा खडसे यांचे सुरक्षा रक्षक त्यांच्या परिवारासोबत कोथळी गावाची यात्रा बघण्यासाठी गेले होते. यावेळी काही तरुण परिवाराचे चित्रण करत असल्याचा संशय आला. या संशयावरुन त्यांनी या तरुणाच्या हातातील मोबाईल हस्तगत करुन त्याची पडताळणी केली. या घटनेचा राग येऊन चारही तरुणांनी सुरक्षा रक्षकासोबत झटापट झाल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संताप व्यक्त करत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यात महिला सुरक्षेची स्थिती दिवसेंदिवस खालावत असून मुक्ताईनगर येथे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या मुलीसोबत घडलेला प्रकार निंदनीय आहे. टवाळखोरांनी शासकीय सुरक्षा असतानाही मुलींची काढलेली छेड हे प्रशासनाच्या नाकर्तेपणाचे लक्षण नाही का? इतकं होत असतानाही सरकार मात्र निव्वळ राजकीय पतंगबाजी करण्यात व्यस्त आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अद्दल घडेल अशाप्रकारची कारवाई करावी व राज्यभरात महिला सुरक्षेबाबत सरकारने कठोर उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे.