नाशिक – रक्षाबंधनसाठी आलेल्या महिलेचे हरवलेले सोन्याचे दागिने व पैशांची बॅग सरकारवाडा पोलीसांनी काही तासातच मिळून दिले. त्यामुळे या महिलेचा रक्षाबंधनही गोड झाला. शनिवारी सकाळी ११:३० वाजता मुंबई येथील मनीषा प्रकाश मेहता या नाशिक ठक्कर बझार बस स्टँडला उतरून रिक्षाने कस्तुरबा नगर येथे गेल्या. पण, येथे उतरल्यानंतर सदर महिलेला सोन्याचे दागिने व रोख रक्कम असलेली बॅग रिक्षा मध्येच विसरल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशमध्ये ही माहिती दिली. त्यानंतर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पवार व डीबी पथकाचे टीमने त्र्यंबक नाका सिग्नल या ठिकाणी जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर सदर रिक्षेचे वर्णन व रिक्षा चालकाचे वर्णन वरून सदर रिक्षा नाशिक रोड हद्दीत जाऊन शोध घेतला. त्यानंतर तक्रारदार महिला यांना त्यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असलेली बॅग ताब्यात सुरक्षित दिली आहे. ही महिला रक्षाबंधनसाठी माहेरी आल्या होत्या, दागिने हरविले म्हणून सासरी काय सांगायचे या टेन्शन मध्ये होत्या खूप रडत होत्या. शेवटी बँग मिळाल्यानंतर त्या आनंदित झाल्या. त्यांची आई सांगत होती आयुष्यात पहिल्यांदाच पोलीस ठाण्यात आली आहे. वरीष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांचे मार्गदर्शनाखाली ही शोध मोहिम घेण्यात आली.