मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेअर बाजारामध्ये चढ – उतार हे सुरूच असतात. कधी शेअरचे भाव उच्चांकी स्थितीला पोहचतात, तर कधी ते गडगडतात, त्यामुळे गुंतवणूकदारांना कधी प्रचंड नफा तर कधी कधी मोठा तोटा सहन करावा लागतो. यामध्ये मोठी गुंतवणूक मोठ्या गुंतवणूकदार यांना देखील याला सामोरे जावे लागते.
दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांना एप्रिलच्या अस्थिर बाजाराचा मोठा झटका बसला आहे. एप्रिलमध्ये आतापर्यंत राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओ मूल्यात सुमारे 1,100 कोटी रुपयांची घट झाली आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालात ट्रेंडलाइनवर उपलब्ध असलेल्या डेटाच्या संदर्भाने हे सांगण्यात आले आहे. ताज्या शेअरहोल्डिंगनुसार, राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 35 सूचीबद्ध कंपन्यांमध्ये 1 टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे.
पोर्टफोलिओ मूल्य आता 32,667 कोटी रुपये :
13 एप्रिल 2022 पर्यंत, राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांचे पोर्टफोलिओ मूल्य 32,667 कोटी रुपये होते. मार्च तिमाहीच्या अखेरीस पोर्टफोलिओ मूल्य 33,754 कोटी रुपये होते. म्हणजेच झुनझुनवाला कुटुंबाच्या पोर्टफोलिओच्या मूल्यात 1084 कोटी रुपयांहून अधिक घट झाली आहे. राकेश आणि रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 31 डिसेंबर 2021 रोजी टायटन कंपनीमध्ये 5.1 टक्के हिस्सा आहे. टायटन कंपनीचे शेअर्स या वर्षात आतापर्यंत 3 टक्क्यांनी घसरले आहेत. राकेश आणि रेखा झुनझुनवाला यांच्या टायटनमधील स्टेकची किंमत 11,106.90 कोटी रुपये आहे.
स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीत 17.5 टक्के हिस्सा :
राकेश झुनझुनवाला आणि रेखा झुनझुनवाला यांच्याकडे स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीत 17.5 टक्के हिस्सा आहे. या महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांची वाढ झाली आहे. दि. 16 मार्च रोजी कंपनीच्या समभागांनी 20 टक्क्यांनी उसळी घेतली होती आणि 609.25 रुपयांची पातळी गाठली होती. झुनझुनवाला कुटुंबाच्या कंपनीतील स्टेकचे मूल्य 7,392.3 कोटी रुपये आहे. रेखा झुनझुनवाला यांचा मेट्रो ब्रँड्समध्ये 14.4 टक्के हिस्सा आहे. मेट्रो ब्रँडचे शेअर्स या महिन्यात 2.9 टक्क्यांनी घसरले आहेत. डिसेंबर 2021 च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे मेट्रो ब्रँड्समध्ये 2360.8 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत.
टाटा मोटर्समधील बिग बुलचा हिस्सा :
डिसेंबर 2021च्या तिमाहीअखेर 1.2 टक्क्यांवर होता. या महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टाटा मोटर्सचे 1698.20 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत. 31 डिसेंबर 2021 पर्यंत झुनझुनवाला यांच्याकडे 5.5 टक्के हिस्सा होता, त्यांच्या स्टेकची किंमत 1,339 कोटी रुपये आहे. एप्रिलमध्ये क्रिसिलच्या शेअर्समध्ये 2.5 टक्क्यांची वाढ झाली आहे.