नवी दिल्ली – भारतीय विमान उड्डाण क्षेत्रात आणखी एका नवीन विमान कंपनीने प्रवेश केला आहे. शेअर बाजारातील दिग्गज असलेले राकेश झुनझुनवाला यांच्या आकासा एअरलाइन्सला नागरी उड्डयन मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. विशेष म्हणजे झुनझुनवाला यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर लगेच झुनझुनवाला यांच्या कंपनीला परवानगी मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आकासा विमान कंपनी आता 2022 पासून नागरी उड्डयन महासंचालनालयाकडून विमान चालवण्याचा परवाना मिळवण्याची प्रक्रिया सुरू करेल. या संदर्भात राकेश झुनझुनवाला यांनी पंतप्रधान मोदी यांचीही भेट घेतली. विनय दुबे यांची कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे, त्यांनी या पुर्वी जेट एअरवेजमध्येही काम केले आहे.
आकासा एअरलाइन्सच्या उपक्रमासाठी एअरबस या युरोपीयन विमान कंपनी सोबत विमान खरेदीच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. त्यानंतर आता 2022 च्या उन्हाळ्यात विमान सेवा सुरू करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. झुनझुनवाला हे चार वर्षांत नवीन एअरलाईन उपक्रमासाठी 70 एअरक्राफ्ट्स बनवण्याची योजना आखत होते, मात्र आता त्यांनी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु झुनझुनवाला नवीन विमान कंपनीमध्ये सुमारे 35 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत.