मुंबई – १९९० च्या दशकात एक दांपत्य असेच बाजारात फिरण्यासाठी निघाले होते. त्यांच्यासाठी तो परिसर नवीन होता. त्यामुळे सहाजिकच कोणता रस्ता कुठे जातो याबद्दल ठाऊक नव्हते. कोणत्या रस्त्याने आपण जात आहोत हेसुद्धा या दांपत्याला ठाऊक नव्हते. ही ती वेळ होती जेव्हा या दांपत्याच्या डोक्यात डिजिटल नकाशाची कल्पना आली. स्मार्टफोनबद्दल कोणालाच जास्त माहिती नव्हती असा तो काळ होता. या काळात डिजिटल मॅपिंग नावाचा प्रयोग नवा होता. हा प्रयोग केला राकेश आणि रश्मी वर्मा यांनी. या दांपत्याची मॅप माय इंडिया या डिजिटल मॅपिंग कंपनीच्या सीई इन्फो सिस्टिम लिमिटेड या मूळ कंपनीने भारतीय शेअर बाजारात लिस्टिंग केले आहे.
पहिल्याच दिवशी प्रतिसाद
पहिल्या दिवशी १,०३३ रुपये जारी केलेल्या किमतीच्या तुलनेत ३५ टक्क्यांच्या वाढीसह मॅपमायइंडियाचा व्यवसाय बंद झाला. तत्पूर्वी कंपनीचा शेअर ५३ टक्के उसळी घेऊन सूचिबद्ध झाला होता. सीई सिस्टिम लिमिटेडचा शेअर मुंबई शेअर बाजारात व्यवसायाच्या पहिल्या दिवशी जारी केलेल्या ५३.०४ टक्के किमतीपेक्षा वाढून १,५८१ रुपयांवर सूचिबद्ध झाला. त्यानंतर ५३.६१ टक्के वाढून १,५८६.८५ रुपयांवर पोहोचला. अखेरीस तो ३५ टक्क्यांच्या वेगासह १,३९४.५५ रुपये प्रति शेअरवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात तो ५१.५० टक्के वाढून १,५६५ रुपयांवर सूचिबद्ध झाला. नंतर तो ३३.१० टक्क्यांच्या वाढीसह १,३७५ रुपये प्रति शेअर बंद झाला.
दांपत्याच्या संपत्तीत वाढ
मॅप माय इंडियाच्या शानदार लिस्टिंगमुळे कंपनीचे संस्थापक राकेश आणि रश्मी वर्मा यांची एकूण मालमत्ता ५८६ लाख डॉलर म्हणजेच जवळपास ४,४०० कोटी रुपये इतकी झाली आहे. राकेश आणि रश्मी वर्मा यांच्याकडे आयपीओनंतर कंपनीचा जवळपास ५४ टक्के भाग आहे. मॅप माय इंडियाच्या लिस्टिंगपूर्वी राकेश वर्मा म्हणाले होते, की जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा मॅपिंग डेटाबद्दल कोणालाच माहिती नव्हती. आता २५ वर्षांनंतर मॅपिंग डेटा आता व्यवसाय, उद्योग, सरकारच्या मालकीच्या कंपन्या आणि मंत्रालयांमध्ये पोहोचला आहे.