नवी दिल्ली – क्रूझ ड्रग पार्टीत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर ड्रग्ज हा विषय सध्या देशभरात गाजत आहे. असे असतानात ज्येष्ठ वकील आणि राज्यसभेचे खासदार केटीएस तुलसी यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. ते म्हणाले की, ड्रग्जचा संतुलित वापर ही जीवनाची गरज आहे. त्यामुळे दारू, गुटखा, तंबाखू यासारखे ड्रग्ज सेवन करण्यास परवानगी द्यावी, अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची देशभरात जोरदार चर्चा होत आहे.
खासदार तुलसी म्हणाले की, ड्रग्ज हे सध्याच्या काळात प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग बनत चालला आहे, विशेषतः तरुण मुले ड्रग्ज घेतातच आणि अनेक प्रसंगी ड्रग्ज ही आयुष्यातील वेदना कमी करतात. दारू, तंबाखू, गुटखा यामुळेही नुकसान होते. मात्र कर भरून या ड्रग्जच्या सेवनाला परवानगी आहे. मग ड्रग्जच्या खुल्या विक्रीला परवानगी का नाही? कर संकलनानंतर ड्रग्जचा वापर करण्यास परवानगी आहे. काहीवेळा ड्रग्ज ही औषधाच्या स्वरूपात घ्यावी लागतात. मग ती गरज असेल तर वापरण्यास परवानगी का देत नाही ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
मादक पदार्थांचा वापर संयतपणे करण्याचा सल्ला देताना, तुलसी म्हणाले की, सध्याच्या आधुनिक काळात एनडीपीएस कायदा 1985 मध्ये सुधारणा केली पाहिजे कारण यामुळे कधीकधी काही व्यक्तींचे त्यामुळे शोषण होते. ते पुढे म्हणाले की, एनडीपीएस कायद्याचा अनेकदा लहान किंवा जास्त डोसमध्ये ड्रग्जचा उपयोग करताना गैरवापर केला जातो. त्यामुळे एनडीपीएस कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. त्यामुळे केवळ संसदेतच नव्हे तर देशभरातच त्याचे पडसाद उमटत आहेत.
विशेष म्हणजे आर्यन खान सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये बंद आहे. बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या मुलाला दि. ३ ऑक्टोबर रोजी ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर एनसीबीच्या पथकाने दि. २ ऑक्टोबरला ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी आतापर्यंत दोन नायजेरियन नागरिकांसह एकूण २० जणांना अटक करण्यात आली आहे.