मनीश कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जूनला मतदान होणार असून, सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अतिरिक्त मतांची जुळवाजुळव करण्यासाठी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. सर्व पक्षांनी आपापल्या आमदारांच्या बैठका घेऊन रणनीती ठरविण्यास सुरुवात केली आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. आमदारांची फूटाफूट होऊ नये म्हणून शिवसेनेसह महाविकास आघाडीचे सर्व आमदार मुंबईत दाखल होत आहेत. त्यांना आपापल्या पक्षासोबत बसून रणनीती आखून दिली जाईल. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सायंकाळी आमदारांची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना मुलूंड येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. शिवसेनेच्या आमदारांना हॉटेल रिट्रिटमध्ये ठेवण्यात आले आहे.
कोरोनाची लागण झाल्यामुळे विलगीकरणात असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस फोन करून आमदारांना रणनीती समजवून सांगत आहेत. महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची मुंबईतील नरिमन पॉइंट येथील हॉटेल ट्रायडंट येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे मार्गदर्शन करणार आहेत.
लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांनी महाविकास आघाडीवर दबावाचे राजकारण सुरू केले आहे. सरकारला पाठिंबा देणाऱ्या बहुजन विकास आघाडीने अद्याप निर्णय घेतला नसला तरी स्थानिक पातळीवर हितेंद्र ठाकूर यांचा शिवसेनेशी संघर्ष आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडीला मत देणार नसल्याचे बोलले जात आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही मतदानाचा निर्णय शेवटच्या पाच मिनिटात घेणार असल्याचे सांगितले.
निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने पाच उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. परंतु यापैकी चार उमेदवारांना ४२ मतांचा अधिकृत कोटा आहे. किमान २ मते अतिरिक्त देऊन ४४ मतांचा सुरक्षित कोटा मिळावा यासाठी आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. भाजपनेसुद्धा अतिरिक्त मते मिळविण्यासाठी गणित मांडण्यास सुरुवात केली आहे.