मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यसभा निवडणुकीत आज दुपारी मतदान पार पडले आहे. नियमानुसार सायंकाळी ५ वाजता मतमोजणी सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, चार आमदारांच्या मतदानावरुन सध्या गोंधळ सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या मतदानावर भारतीय जनता पक्षाने आक्षेप घेतला आहे. तर, काँग्रेसने भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे मतमोजणी थांबली आहे.
आव्हाड, ठाकूर आणि कांदे यांनी मतपत्रिका दाखविल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर, मुनगंटीवार यांनी मतपत्रिका भाजप नेते आशिष शेलार यांच्या हातात दिल्याचे म्हटले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याची दखल घेतली असून यासंबंधी तत्काळ व्हिडिओ सादर करण्याची विनंती आयोगाने केली आहे. या आक्षेपांवर सध्या सुनावणी सुरू आहे. साक्षी पुरावे यांची पडताळणी झाल्यानंतर मतमोजणी सुरू होणार आहे. त्यामुळे निकाल केव्हा हाती येईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.