मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
राज्यसभा निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कोणीही माघार न घेतल्यामुळे राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात निवडणूक अटळ आहे. दोन्ही पक्षांची मदार आता अपक्ष आमदारांवर आहे. लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांनी आपली भूमिका जाहीर न केल्यामुळे ते कोणाच्या बाजूने मतदान करणार याची उत्सुकता आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपची धडधड वाढली आहे.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जून रोजी मतदान होणार आहे. महाविकास आघाडीकडे तांत्रिकदृष्ट्या १७२ आमदारांचा पाठिंबा आहे. महाविकास आघाडीला दहा लहान पक्ष आणि आठ अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. शिवसेनेच्या एका आमदाराचे निधन झाले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे दोघेही कोठडीत आहेत. ते मतदान करू शकणार आहेत की नाही हे न्यायालय ठरवणार आहे. त्यामुळे सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीला आता अपक्ष आमदारांवर अवलंबून राहावे लागणार आहे.
महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. मतदारसंघात झालेल्या विकासाकामाचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या पक्षाचा एक आमदार महाविकास आघाडीलाच मत देणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनीसुद्धा अद्याप पत्ते उघडलेले नाहीत. सरकारने मुस्लिमांसाठी कल्याणकारी योजना राबविल्या नाहीत अशी नाराजी अबू आझमी यांनी व्यक्त केली आहे.
शिवसेनेकडून अपक्ष आमदारांचा घोडेबाजार होणार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यावर चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आक्षेप घेतला आहे. अपक्ष आमदारांसाठी घोडेबाजार हा शब्द वापरू नये अन्यथा वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. सद्सदविवेक बुद्धीने मतदान करू असेही त्यांनी सांगितले. मीरा-भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी नंतर शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेला मतदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा हे भाजपला मतदान करणार आहेत. तर मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार हे राष्ट्रवादीला पाठिंबा देणार आहेत. असदुद्दिन ओवेसी यांच्या एमआयएमची भूमिका अद्याप अस्पष्ट आहे. तर कार्यकर्ते आणि पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून मतदान करेल अशी भूमिका डहाणूचे भाकपचे आमदार विनोद निकोले यांनी जाहीर केली आहे. मनसेचे राजू पाटील हे एकमेव आमदार आहेत. मनसे कोणाला मतदान करणार हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अद्याप जाहीर केलेले नाही.