मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलचं तापल्याचे दिसून येत आहे. एकीकडे सहाव्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाल्याचे समोर येत असतानाच आता आणखी एक उमेदवार राज्यसभेच्या रिंगणात उतरला आहे. विशेष म्हणजे या उमेदवाराने “जो आमदार मला मत देईल त्याला मी टाटा सफारी गाडी भेट म्हणून देईल”, अशी ऑफर दिली आहे.
राज्यसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांकडून आमदारांची मतं मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. जो – तो उमेदवारा आपापल्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहे. अशातच आता राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अध्यक्ष अरुण निटूरे यांनी मुंबई विधानभवन येथे राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राज्यसभेत जो आमदार मला मतं देईल त्याला टाटा सफारी गाडी देण्यात येईल अशी ऑफर राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अध्यक्ष निटूरे यांनी आमदारांना दिली आहे.
राज्यसभा निवडणुकीत निटूरे यांना आमदारांनी सहकार्य केल्यास त्यांना प्रत्येकी एक टाटा सफारी गाडी भेट म्हणून देणार असल्याची घोषणा केल्याने सगळीकडेच हा चर्चेचा विषय बनला आहे. निटूरे यांनी ४५ सफारी गाड्यांचे कोटेशन सुद्धा घेतले असून प्रती गाडी २६ लाखप्रमाणे ११ कोटी ८१ लाख खर्च ते करणार आहेत. निटूरे यांनी त्यांच्या या ऑफरबाबत फेसबुक व इतर माध्यमातून पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्यांच्या या ऑफरला कसा प्रतिसाद मिळतो हे बघणं महत्त्वाचे ठरणार आहे. याआधीही निटूरे यांनी वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करुन निवडणूक लढवली होती.
निवडणुकीसाठी संख्याबळ असे..
या निवडणुकीत कोणाकडे किती संख्याबळ आहे यावरदेखील मोठी चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीकडे १६९ आमदार, शिवसेना ५५, राष्ट्रवादी ५४, काँग्रेस ४४ अशी त्या १६९ची विभागणी आहे. तर इतर पक्षांकडे ८ आणि अपक्ष ८ असे महाविकास आघाडीचे संख्याबळ आहे. भारतीय जनता पक्षाकडे ११३ आमदार आहेत. भाजपचे १०६ आमदार, रासप १, जनसुराज्य १ आणि अपक्ष ५ आमदार अशी त्याची विभागणी आहे. त्यामुळे कोण कोण या निवडणुकीत बाजी मारतं याकडे लक्ष लागले आहे.