मुंबई – राज्यातील शेतकरी संघटनांच्या नेत्यांना भेटण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळ न दिल्याने नाराज झालेल्या राजू शेट्टी यांनी खासदार शरद पवार यांच्याकडे तक्रार केली आहे. शेट्टींसह मेधा पाटकर व अन्य नेत्यांनी पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
केंद्रीय कृषी कायद्यांसंदर्भात शेतकरी बांधवांच्या भावना राज्य सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी शेतकरी व सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली व मागण्यांचे निवेदन दिले.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करते आणि हे सरकार कायम शेतकऱ्यांच्या बाजूनेच उभे राहील. शेतकरी हिताचे पाऊल उचलण्यात सरकार मागे हटणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चेवेळी शिष्टमंडळाच्या नेत्यांना दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या भेटीच्या वेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कृषिमंत्री दादाजी भुसे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शिष्टमंडळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, एस. व्ही. जाधव, अशोक ढवळे, नामदेव गावडे, सुभाष लोमटे, किशोर ढमाले, सीमा कुलकर्णी, सुभाष काकस्ते, उमेश देशमुख, शकील अस्मेद आदी मान्यवरांचा समावेश होता.