सातपुर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विविध मागण्यासाठी सिटू यूनियन, किसान सभा व महाराष्ट्र शेतमजुर युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सीटूभवन येथे राज्यस्तरीय कामगार-शेतकरी-शेतमजूर परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सीटूचे राज्यअध्यक्ष डॉ.डी.एल.कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खुटवडनगर येथील सीटूभवन येथे शनिवारी सकाळी ११ ते ५ या वेळेत आयोजित राज्यस्तरीय कामगार-शेतकरी-शेतमजूर परिषदेत किसान सभेचे अखिल भारतीय महासचिव विजू कृष्णन,शेतमजुर युनियनचे अखिल भारतीय सचिव विक्रम सिंग व सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी.एल.कराड हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच किसान सभेचे ज्येष्ठ नेते जे.पी.गावित, राज्यअध्यक्ष उमेश देशमुख, सिटूचे राज्यउपाध्यक्ष नरसय्या आडम मास्तर, सीटूचे राज्य सरचिटणीस एम.एच.शेख,शेतमजुर युनियनचे राज्यअध्यक्ष बळीराम भुम्बे,राज्य सरचिटणीस मारुती खंदारे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.परिषदेत कामगार-शेतकरी-शेतमजुरांच्या प्रश्नावर चर्चा करुन राज्यव्यापी व देशव्यापी आंदोलनाचा निर्णय घेण्यात येणार आहे.परिषदेत राज्यातील दोनशेहून अधिक जिल्हा प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. अशीही माहिती डॉ.कराड यांनी दिली.यावेळी सीताराम ठोम्बरे,संतोष काकड़े, कल्पना शिंदे आदि उपस्थित होते.परिषदेपूर्वी ३ फेब्रुवारी रोजी किसान सभा व सीटूची राज्य कार्यकारिणीची बैठक सीटू कामगार भवन येथे आयोजित करण्यात आली आहे.
या आहेत परिषदेतील मागण्या :-
•दरमहा 26 हजार रुपये किमान वेतन लागू करा,
•सर्वांना 10 हजार रुपये पेन्शन द्या.
•कामगार विरोधी चार श्रमसंहिता रद्द करा .
•वीज विधेयक मागे घ्या.
•शेतमजुरांना दर वर्षी 200 दिवस रोजगार हमी मार्फत काम द्या.
•600 रुपये प्रतिदिन मजुरी द्या.
•रोजगार हमी योजना शहरी भागासाठी लागू करा.
•गरीब व मध्यम शेतकरी आणि शेतमजुरांचे संपूर्ण कर्जमाफ करा.
•सार्वजनिक उद्योगांचे व सेवांचे खाजगीकरण रद्द करा .
•नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईनचे धोरण मागे घ्या .
•अग्निपथ योजना रद्द करा.
•महागाई रोखा व सार्वजनिक वितरण व्यवस्था मजबूत करा.
•श्रीमंतांवर कर लागू करा.
•स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे शेतमालाला उत्पनाच्या दीडपट हमी भावाचा कायदा करा.
•शेतमजुराला गाव तेथे काम व किमान वेतनाप्रमाणे दाम द्या.