इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजकारण या क्षेत्राविषयी फारसे चांगले बोलले जात नाही, परंतु राजकारणाचे आकर्षण बहुतांश जणांना असते. राजकारणी व्यक्तीवर टीकाही होत असते, परंतु हेच राजकीय व्यक्ती समोर आल्यावर सर्व जण त्यांना हात जोडून नमस्कार करतात.परंतु बहुतांश राजकारणी यांच्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांमध्ये कायमच एक प्रकारे आकस किंवा भीतीची भावना असते. राजकारण या क्षेत्रात दिसून येणारा भ्रष्टाचार निश्चितच सर्वांना तापदायक वाटतो. मात्र राजकारणात देखील काही चांगल्या व्यक्ती असल्याचा प्रत्यय आजच्या काळात देखील येतो. केंद्र सरकारचा विचार केल्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राजनाथसिंह अशी नावे समोर येतात, कारण या व्यक्ती प्रसिद्धीपासून लांब राहून त्यांची कार्य तत्परतेने पार पाडत असतात आणि जनतेला मदत करतात.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या बाबतीत असाच एक प्रत्यय आला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पूर्वांचलमधील बलिया येथे पोहोचले. येथील जाहीर सभेत दोनदा अशी संधी आली की, राजनाथ यांनी जनतेची मने जिंकली. त्याचा साधेपणा आणि दातृत्व पाहून सगळेच त्यांचे कौतुक करत आहेत.
बलियाच्या सिकंदरपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक सभेदरम्यान राजनाथ सिंह त्यांना मिळालेला चांदीचा मुकुट स्वीकारून त्यांनी ता मुकुट परत केला. एका शाळेच्या प्रांगणात निवडणूक सभेचे आयोजन करण्यात आले होते. राजनाथ सिंह सभेत पोहोचताच त्यांच्या स्वागताला सुरुवात झाली. दरम्यान, शाळेच्या व्यवस्थापकाने त्यांना चांदीचा मुकुट भेट दिला. राजनाथ यांनी मुकुट स्वीकारला पण तो लगेच मंचावरूनच परत केला. राजनाथ सिंह म्हणाले की, मी हा चांदीचा मुकुट स्वीकारतो आणि तो परत करतो, कारण निवडणूक संपल्यानंतर गरीब कुटुंबातील मुलगी लग्न करून सासरी जात असेल आणि तिच्या पायात चांदीची पैंजण नसेल तर हा मुकुट तोडून तिच्यासाठी चांदीची पैंजण बनवावी.
एवढेच नाही तर भाषण सुरू असताना जमावातील एका तरुणाने सैन्यात भरतीची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली. यावर राजनाथ यांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कोरोनामुळे सैन्य भरतीला होत असलेला विलंब स्पष्ट केला. यानंतरही त्यांनी अखिलेश जिंदाबादच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. घोषणाबाजी होताच भाजपच्या कार्यकर्त्यासह पोलिसांनी त्या तरुणांना पकडले. मात्र त्यावर राजनाथ सिंह यांनी मंचावरूनच त्या मुलाला अटक करू नका आणि त्याच्यावर कारवाई करू नका, अशा स्पष्ट सूचना दिल्या. मात्र, पोलिसांनी नंतर शांतता भंगाच्याखाली त्याला तंबी दिली, व लेखी प्रतिज्ञा घेऊन सोडून दिले.