इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट असून विरोधी पक्षांनी सत्ताधारी विरोधात मोर्चा उघडला आहे. आज सर्वपक्षीय नेते दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत असतांना राणे समर्थक आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये तुफान राडा झाला.
राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी आज आदित्य ठाकरे, जयंत पाटील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार महाविकास आघाडीचे नेते आले होते. त्याचवेळी स्थानिक खासदार आणि भाजपा नेते नारायण राणे हे त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत पोहोचले होते. यादरम्यान, दोन्ही गट किल्ल्यामध्ये आमने सामने आले आणि वादाची ठिणगी पडली.
यावेळी दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भिडल्यानं परिस्थिती चिघळली व किल्ल्यावर राडा झाला. महाविकास आघाडीचे नेते किल्याची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. त्यानंतर काही वेळातच स्थानिक खासदार नारायण राणे देखील किल्ल्यावर आले. त्यांच्यासोबत माजी खासदार निलेश राणे आणि भाजप कार्यकर्ते उपस्थितीत होते. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात संवाद झाला. दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केले. त्यानंतर राणे पुढे गेले.
महाविकास आघाडीच्या नेत्यांना सकाळी साडे दहा वाजता पोहोचणार होते. तर नारायण राणे दुपारी १२ वाजात किल्ल्यावर येणार होते. त्यामुळे ठाकरे – राणे येण्याची सुतराम शक्यता नव्हती. पण, आदित्य ठाकरेंना पोहोचायला उशीर झाला. त्यामुळे हे दोन्ही नेते आमने सामने आले.