पुणे – कॉंग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांची प्रकृती स्थिर असून गरज पडल्यास मुंबईत हलवण्याबाबत विचार करु अशी माहिती सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली. सातव यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर पुणे येथील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु आहे. सध्या सातव हे आयसीसीयूमध्ये असून ते व्हेंटिलेटरवर असल्याचेही यावेळी कदम यांनी सांगितले.
राजीव सातव यांच्या प्रकृतीविषयी माहिती देण्यासाठी विश्वजीत कदम आणि जहांगीर रुग्णालयाचे डॉक्टर गील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी कदम यांनी सातव यांच्या प्रकृती विषयी माहिती दिली. सातव यांची इच्छाशक्ती जबरदस्त आहे. जहांगीर हॉस्पिटलचे डॉक्टर त्यांच्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. मला विश्वास आहे की ते यातून लवकर बाहेर येतील असेही त्यांनी सांगितले.