– थेट प्रस्तावात नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय राज्यात सर्वप्रथम
– विभागीय निवड समितीकडील प्रस्तावात जिल्हाधिकारी जळगाव राज्यात प्रथम
– सर्वोत्कृष्ट उपक्रमात जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे प्रथम क्रमांक
– विकास नवाळे, मुख्याधिकारी, एरंडोल नगरपालिका, सर्वोत्कृष्ट अधिकारी
– डॉ मोहसिन युसुफ शेख, मंडळ अधिकारी, तहसील कार्यालय, राहता सर्वोत्कृष्ट कर्मचारी
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा 2022-23 या वर्षाच्या स्पर्धेचा निकाल आज घोषित करण्यात आला असून याबाबतचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. या अभियानातंर्गत 13 पैकी 7 पारितोषिके नाशिक विभागाला मिळाली आहेत. या स्पर्धेत नाशिक विभागाने आघाडी मारली आहे.
प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता आणण्याकरिता तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्याकरिता राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत राज्यातील सर्व मुख्यालयाच्या कार्यालयातून थेट येणाऱ्या प्रस्तावात नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना व व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करुन राज्यात प्रथम क्रमांक मिळवून दहा लाख रुपयांचे पारितोषिक मिळविले आहे.
तर विभागीय स्तरावरील निवड समित्यांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावात जिल्हाधिकारी जळगाव यांनी संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान घरपोच वाटप करुन राज्यात प्रथम क्रमांक मिळवून दहा लाख रुपयांचे पारितोषिक मिळविले आहे. तसेच सर्वोत्कृष्ट उपक्रमात जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे यांनी भूसंपादन प्रक्रियेत महाराष्ट्र रिमेट सेन्सींग ॲप्लीकेशन सेंटर, नागपूर यांचेकडून प्राप्त उपग्रह छायाचित्रांचा वापर करण्यात प्रथम क्रमांक मिळवून 50 हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले.
त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट अधिकारी गटात विकास नवाळे, मुख्याधिकारी, एरंडोल नगरपालिका यांनी बचतगटांना फळझाड प्रकल्पाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन दिल्याबद्दल प्रथम क्रमांक मिळाला असून त्यांना 50 हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. तर पद्मनाभ शिवाजी म्हस्के, तालुका कृषि अधिकारी, कर्जत, अहमदनगर यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी महाडीबीटी मेळाव्याच्या माध्यमातून केल्याबद्दल त्यांना द्वितीय क्रमांकाचे 30 हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे.
तसेच शासकीय कर्मचारी गटात डॉ मोहसिन युसुफ शेख, मंडळ अधिकारी, तहसील कार्यालय, राहता, अहमदनगर यांना महसूल अर्धन्यायिक निकालपत्रात क्यूआर कोडचा राज्यातील प्रथम नाविन्यपूर्ण प्रयोग केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट कर्मचारी म्हणून प्रथम क्रमांकाचे 50 हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. तर राजू मोहन मेरड, तलाठी आणि श्रीमती वैशाली सदाशिव दळवी, मंडळ अधिकारी, माणिकदौंडी, ता. पाथर्डी, अहमदनगर यांनी आदिवासी समाजासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, बॅंक पुस्तिका इ. प्रदान केल्याबद्दल द्वितीय क्रमाकाचे 30 हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. येत्या नागरी सेवा दिनी 21 एप्रिल, 2023 रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.
Rajiv Gandhi Gatimanta Abhiyan Nashik Division Awards