मुंबई – देशात सर्वात वेगाने धावणार्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये आता पहिली खासगी रेल्वे तेजस एक्स्प्रेससारखा आनंद घेता येणार आहे. पश्चिम रेल्वेतर्फे दिल्ली-मुंबई राजधानी एक्स्प्रेसमध्ये तेजस ट्रेनसारखेच अत्याधुनिक स्मार्ट सुविधांनी युक्त आकर्षक शयनयान (स्लिपर) कक्षाचे रॅक लावण्यात आले आहेत.
चमचमत्या सोनेरी रंगाच्या या बोगी बाहेरून जितक्या सुंदर दिसतात, आतूनही तितक्याच स्मार्ट आहेत. रेल्वेतर्फे प्रवाशांना प्रवासात चांगला अनुभव देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. सोमवारपासून या आकर्षक ट्रेनचा प्रवास सुरू होणार आहे.
स्मार्ट बोगींमध्ये इंटेलिजेंट सेंसर बसविण्यात आले आहेत. संकेत दिल्यानंतर रेल्वेची पुढील स्थानकावर स्वच्छता करण्याची व्यवस्था केली जाते. जीएसएम नेटवर्कने या बोगींना जोडण्यात आले आहे. प्रवाशांबद्दलच्या सूचना आणि कोच कॉम्प्युटिंग युनिटद्वारे (पीआयसीसीयू) बोगींना सज्ज करण्यात आले आहे.
रेल्वेच्या बोगींमध्ये पॅनिक स्विचसह अग्निविरोधी आलार्म यंत्रणा लावण्यात आलेली आहे. बोगींच्या आतमध्ये वायू गुणवत्ता आणि चोक फिल्टर सेंसर लावण्यात आला आहे. बोगीमध्ये दोन एलसीडीसुद्धा आहेत. त्यामध्ये गंतव्य स्थानकाच्या माहितीसह पुढील स्थानकाच्या अंतराची माहितीही मिळणार आहे. आपत्कालीन वैद्यकीय आणि सुरक्षेसाठी टॉक बँकवर बोलण्याची सुविधासुद्धा या बोगींमध्ये उपलब्ध आहे.