इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नोकरशाहीला लागलेली भ्रष्टाचाररूपी कीड नवीन नाही. देशात लोकशाही असली तरी खऱ्या अर्थाने नोकरशाही संपूर्ण यंत्रणा चालवित असतात. या यंत्रणेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या अनेक सुरस कथा आपण आजवर ऐकल्या आहेत. अशाच एका भ्रष्ट महिला अधिकाऱ्याची गोष्ट पुढे आली असून तिने भ्रष्टाचाराची अक्षरश: हद्द गाठली आहे.
ज्योती भारद्वाज असे या महिला अधिकारीचे नाव आहे. जयपूर सचिवालयात कार्यरत असलेल्या अधिकारी ज्योती भारद्वाज शासन सचिव पदावर कार्यरत आहेत. अलवरमध्ये त्या जिल्हा कोषाधिकारी आणि मत्स्य विद्यापीठात आर्थिक नियंत्रक पदावर कार्यरत राहिल्या आहेत. कर्मचाऱ्यांना दरवर्षी त्यांच्या संपत्तीची माहिती सरकारला द्यावी लागते. त्यामध्ये ज्योती भारद्वाज यांनी तीन घरांचा उल्लेख केला होता. यातील एक त्यांच्या पतीच्या नावावर होते. या घरासाठी पतीने कर्ज घेतले आहे. तर अन्य दोन घरे त्यांनी स्वतःच्या नावावर दाखवली होती. दुसरीकडे सब रजिस्टर कार्यालय जयपूरमध्ये ४, ५ मार्च २०२२ रोजी २६ फ्लॅट्सची नोंदणी झाली आहे. ज्याची किंमत ४ कोटी ७१ लाख रुपये आहे. सध्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.
१५ फ्लॅट्सची नोंदणी
गेल्या वर्षभरात ज्योती भारद्वाज यांनी २६ फ्लॅट्स खरेदी केले. त्यातील १५ फ्लॅट्सची नोंदणी त्यांच्या स्वतःच्या नावावर असून उर्वरित ११ फ्लॅट्स त्यांचा मुलगा रोशन वशिष्ठ याच्या नावावर आहेत. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच बिल्डरने आपली फसवणूक झाल्याचा दावा केला. तसेच प्रकरण कोर्टात असल्याचं सांगितलं. महिला अधिकाऱ्याशी याबाबत अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही.
Rajasthan Women Officer Corruption Flats Registration