इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बिपाेरजॉय चक्रीवादळाने राजस्थानमध्ये हाहाकार घातला आहे. या वादळानंतर आता तेथे पावसाचे थैमान माजले आहे. सुमारे १०० वर्षापेक्षा अधिक काळाचा विक्रम या राज्यात पावसाने मोडीत काढला आहे, असा पाऊस यापूर्वी कधीही झालेला नाही, असे जुने जाणते लोक सांगत आहेत. पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी देखील स्वतः पाणी करून प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. वास्तविक हे कमी पावसाचे राज्य म्हणून ओळखले जाते परंतु इतका पाऊस पडल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. चार दिवसांत राज्याच्या अनेक भागांत एवढा पाऊस पाडला की, मान्सूनचा कोटा पूर्ण झाला. बाडमेर, पाली, राजसमंद, भिलवाडा, अजमेरच्या अनेक भागात पूर आला आहे. अजमेरमध्ये पावसाने १०५ वर्षांचा विक्रम मोडला.
मुख्यमंत्र्यांकडून हवाई पाहणी
गेल्या २४ तासांत पाली येथील मुठाणा येथे तब्बल ५३० मि.मी. म्हणजेच २१.३ इंच एवढा पाऊस झाला. बुंदी, अजमेर, भिलवाडा येथील शेकडो गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. राज्यात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. कोटा, बारां-सवाई माधेपूर येथे हवामान खात्याने मंगळवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याचवेळी जयपूरमध्ये मंगळवारी दुपारनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. बिपाेरजॉय चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी चौहटन आणि सांचौर येथे भेट दिली. तसेच आपण ग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
एकाच दिवसात १३१.८ मि.मी. पाऊस
राजस्थान मधील अनेक भागात नेहमीच दुष्काळ जाणवतो परंतु यंदा मान्सूनच्या सुरुवातीलाच बिपाेरजॉय वादळामुळे पावसाने देखील चांगलाच हाहाकार उडविला आहे. अनेक भागात सरासरीपेक्षा प्रचंड पाऊस झालेला दिसून येतो. अजमेरमधील पावसाचा १०५ वर्षांचा विक्रम मोडला आहे. येथे १७ जून १९१७ रोजी एकाच दिवसात ११९.४ मि.मी. पाऊस पडला होता. तो आतापर्यंतचा सर्वाधिक पावसाचा विक्रम होता. तो १९ जून रोजी मोडला. १८ जून रोजी सकाळी ८:३० ते १९ जून रोजी सकाळी ८:३० या २४ तासांत अजमेरमध्ये १३१.८ मि.मी. पाऊस झाला. अजमेरमधील पाऊस इथेच थांबला नाही. १९ जून रोजी सकाळी साडेआठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत १०० मिमी पावसाची नोंद झाली होती. आता आणखी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे