इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजस्थानात गर्भवती महिलेची नग्न धिंड काढण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. तसेच, यावरुन देशभरात खळबळ उडाली आहे. राजस्थान सरकारवर कठोर टीका होत आहे. या सर्व प्रकाराची गंभीर दखल मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी घेतली आहे. प्रतापगड जिल्ह्यातील धारियावाडमध्ये नग्न धिंड केलेल्या महिलेशी त्यांनी संवाद साधला. यावेळी पीडितेचे पालकही त्यांच्यासोबत होते. मुख्यमंत्र्यांनी पीडितेला १० लाख रुपये आणि सरकारी नोकरीची घोषणा केली आहे.
या घटनेवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, अशा गुन्हेगारांना सुसंस्कृत समाजात स्थान नाही. महिलेने रात्री उशिरा पोलिसांत तक्रार केली. यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्यात १० जणांची नावे आहेत. पोलिसांनी आतापर्यंत ७ जणांना अटक केली आहे. ही अत्यंत दुःखद घटना असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मी रात्रीच पोलीस महासंचालक आणि एडीजी क्राईम यांना घटनास्थळी पाठवले होते. गावात माहितीची सुविधा नसतानाही त्या भागातील आमदार, पोलिस स्टेशन अधिकारी, पोलिस अधिक्षक यांनी गांभीर्याने काम केले आहे. सात आरोपींना अटक करण्यात आली असून, इतर आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल.
खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल
अशोक गेहलोत म्हणाले की, या प्रकरणाशी संबंधित गुन्हेगारांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल. त्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा दिली जाईल. महिलांवरील गुन्हे थांबवणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. अशा घटना आणि त्यात गुंतलेल्या गुन्हेगारांना सुसंस्कृत समाजात स्थान नाही. अशा दु:खद आणि अमानवी घटनांचा एकाच आवाजात निषेध व्हायला हवा, असेही ते म्हणाले.
Rajasthan Pregnant Women Naked Parade CM Ashok Gehlot
Crime Molestation Sexual Abuse